जेव्हा मुलंच वर्गाची प्रेरणा बनतात!
जेव्हा मुलंच वर्गाची प्रेरणा बनतात!

जेव्हा मुलंच वर्गाची प्रेरणा बनतात!

‘Pahal Day Boarding Center’ (An Initiative by Upay Organization) नागपूरमधील  वर्धमान नगर येथे सुरु होवून आठ महिने झाले होते. दररोज नागपूरच्या संत्रा मार्केटमधील मुलांना शिकविण्याचा नित्यक्रम चालू होता. परंतु,काही मुलांचे पालक पोटापाण्याच्या सोयीसाठी नागपूरमधून स्थलांतरित झाले होते. पालकांसोबत मुलेही गेले होते. त्यामुळे आमच्याकडे शिकायला येणाऱ्या मुलांची उपस्थिती कमी झाली. राहीलेल्या मुलांना वर्गात पूर्वीसारखी मज्जा येत नव्हती. आम्ही प्रयत्न करूनही आधीसारखं वातावरण निर्माण करू शकत नव्हतो. संत्रा मार्केटच्या जास्त मुलांचे  स्थलांतर झाल्याने नागपूरमधील सीताबर्डीच्या मुलांना शिकवायला सेंटरवर आणू लागलो. त्यात दक्षिण अंबाझरी मार्गावरील टेडीबिअर विकणाऱ्या कुटुंबातील सीमा (वय आठ वर्ष) आमच्यासोबत सेंटर वर येऊ लागली. आता सीताबर्डीचे आणि संत्रा मार्केटचे असे दोन ठिकाणचे मुले सेंटरवर येत होते. त्यामुळे आम्हाला दोन वर्ग घ्यावे लागत असे. सीमा मात्र संत्रा मार्केटच्या मुलांनसोबत वर्गात एकटीच बसू लागली. वर्गाच्या वातावरणात सीमा हळूहळू मिसळू लागली. सीमा जरी वयाच्या आठव्या वर्षापर्यंत शाळेत गेली नाही, तरी तिचं डोकं अभ्यासात चांगलं चालायचं. तिला वर्गात शिकविलेले जे काही समजायचं ते सगळं माझ्याजवळ सांगत होती. वर्णमालेपासून तिला शिकविण्याचा प्रवास मी सुरु केला. नंतर हळूहळू साधे शब्द कसे वाचायचे, अक्षर जोडून शब्द कसे बनवायचे यावर वर्ग घेतले. परंतु वर्गात सीमा ज्या पद्धतीने अक्षर जोडून वाचत होती, ते पाहून इतर मुले सुद्धा तिचे अनुकरण करत होते. वर्गात बाकी मुलांच्या तुलनेत सीमाला लवकर समजायचं. सोबतच वर्गातील बाकी मुलांना ती मदत करायची. त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने खेळायची. त्यामुळे बाकी मुलांना वर्गात मज्जा येऊ लागली. सगळी मुले तिच्याजवळ अभ्यासाला सोबत बसायचे. आता ते आधीसारखे वर्गात रमू लागले. अभ्यासात मन गुंतवू लागले. सीमाच्या आल्याने वर्गात स्थलांतरामुळे निर्माण झालेली दरी थोडी कमी झाली. सिमामुळे वर्गात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. मुले एकमेकांच्या सानिध्यात शिकतात सोबतच एकमेकांपासून प्रेरणा घेतात, हे सिमाच्या उदाहरणातून खूप जवळून दिसले.  

निशांत मेश्राम & निधी वासनिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *