संकलन आणि संपादन – निकिता देवासे
रियाजघर – रियाजघर म्हणजे काय?
-पल्लवी शंभरकर

रियाजघर म्हणजे 9 ते 16 वयोगटातील मुलांना एकत्र आणून शिकवणे, विविध ठिकाणी भेट देणे (exposure visit), तज्ज्ञांना बोलावणं (external visit), पुस्तकं वाचण, खेळणे अशा अनेक क्रियाकलापांचं ठिकाण आहे.
यावेळी रियाजघरचा मुख्य उद्देश मुलांना इंग्रजी शिकवणे होते. मुलांना फोनीक्स, vowels, sentence building यांसारखे विषय शिकवले गेले, तसेच रोज भाषा आणि गणिताचे वर्गही व्हायचे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रियाजघर सुरू करणे सुरुवातीला थोडं आव्हानात्मक वाटत होतं. काही मुले स्थलांतरित झाली होती, त्यामुळे “मुले येतील का?”, “पालकांना कसं समजावू?” अशा विचारांनी मन चिंतेने भरलेलं होतं. पण सर्व फेलोनी एकत्र येऊन पालकांना समजावलं आणि हळूहळू मुलं रियाजघरला येऊ लागली. आश्चर्य म्हणजे या वेळी मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त होती, ज्यामुळे आनंद आणि अभिमान वाटला.
रियाजघरचा दिवस सकाळी ८ वाजेपर्यंत मुलांना स्वतःची कामे पूर्ण करायची ड्युटी देऊन सुरू व्हायचा. त्यानंतर नाश्ता, ९ वाजता भाषा वर्ग, प्रार्थना, फीलिंग शेअरिंग आणि १ वाजेपर्यंत गणित व इंग्रजीचे वर्ग होते. नंतर जेवणाची सुट्टी आणि exposure किंवा external visit. दिवसभरातील अनुभवी मुलांची reflection meeting आणि त्यांच्या आवडीनुसार डान्स, नाटक, पुस्तक वाचन, खेळ, गृहपाठ असे उपक्रम होतात.
मुलांच्या चेहऱ्यावर प्रत्येक दिवशी नवी उमंग आणि उत्साह दिसायचा. त्यांच्या नव्या गोष्टी शिकण्याची जिज्ञासा पाहून मन आनंदाने भरून जात असे. काही मुलं प्रथम थोडी लाजत असत, पण दिवसेंदिवस त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत गेली.
मुलांना विविध ठिकाणी exposure visits दिल्या गेल्या. Alag Angle मध्ये मातीपासून बैल बनवायला शिकवले, मुलांनी आपली creativity दाखवत वेगवेगळ्या प्राणी आणि वस्तू तयार केल्या. Raman Science Center, Parle G कंपनी, पोलीस स्टेशन यांना भेट देऊन मुलांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या. बिस्किट कसे बनतात, पोलीस होण्यासाठी काय शिकावे लागते, शिक्षक कसे बनतात यावर मुलांचे प्रश्न मिटले.
हा अनुभव फक्त शिक्षणाचा नव्हता, तर मुलांच्या मनाला आणि आत्म्याला नवे प्रकाशपुंज देणारा होता. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर वाढत जाणारा आत्मविश्वास आणि आनंद पाहून आपल्या प्रयत्नांना आता दिशा आणि यश दोन्ही मिळालंय.”
प्रयास – एक नवा अनुभव
कोमल गौतम

‘प्रयास’ ही कल्पना मला आधी माहीत नव्हती. परंतु, जान्हवीताईनी आम्हाला याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की ‘प्रयास’ ही अमरावती मधील एक संस्था आहे जी लहान मुलांसाठी शिबिर आयोजित करते.
ते शिबिर मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या साठी होता. त्यांनी आपल्या भारवाड वस्तीतील काही मुलांना अमरावतीला बोलावलं होतं. आमच्याकडून ४ मुलं पाठवण्यात येणार होती. आणि त्यांच्यासोबत एका फेलोने जायचं होतं. जानवीताईंनी आम्हाला विचार करण्यासाठी थोडा वेळ दिला की कोण जाईल?
मी ही जबाबदारी घ्यायचं ठरवलं. हा माझा पहिलाच अनुभव होता, १९ एप्रिलला बेड्यावरील मुलांचे पालक त्यांना नागपूरला घेऊन आले. मी विजय, महेश, राहुल आणि छगन या चार मुलांना घेऊन अमरावतीकडे निघाले. हे माझं पहिलंच असा अनुभव होता जिथे मी मुलांची पूर्ण जबाबदारी घेऊन बाहेर जात होते. मनात थोडी भीती होती, “तिथे पोहोचल्यावर काय होईल?”, “कसं होईल?”, “सगळं नीट पार पाडता येईल का?” पण मुलांचा उत्साह आणि जानवीताईंचं फोनवरचं मार्गदर्शन आणि माझ्या भीतीला मागे टाकत. रात्री ८ वाजता आम्ही ‘प्रयास’मध्ये पोहोचलो.यामुळे सगळं सहज पार पडलं.
तिथे जवळपास ९ ते २० वयोगटातील अनेक मुलं होती. दुसऱ्या दिवशी (रविवारी) सगळ्या मुलांचे पालक त्यांना सोडायला आले. सावजी सरांनी, जे या शिबिराचे आयोजक होते, एक ओळखीची मिटिंग घेतली. त्यांनी ‘प्रयास’ विषयी माहिती दिली हे शिबिर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आयोजित केलं जातं. काही मजेशीर पालक-मुलं अॅक्टिव्हिटीजही झाल्या.
माझी भूमिका तिथे स्वयंसेवक म्हणून होती मुलांना सांभाळणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे माझं मुख्य काम होतं.
दुसऱ्या दिवसापासूनच मुलांची सेशन्स सुरू झाली. दररोज मुलांची वेगवेगळी सेशन्स व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, व्यवसायिक जाणिवा. त्यांनी टरबूज विकलं, पुस्तकं विकली, लहान व्यवसायिकांची मुलाखत घेतली. ३ दिवस मुलांना बाहेर नेलं जायचं जसं जंगल दर्शन, विविध कंपन्यांना भेट इत्यादी. सेशन्समध्ये मुलांना व्यक्तिमत्त्व विकास, व्यवहार कौशल्य यावर मार्गदर्शन मिळायचं. एक उदाहरण म्हणजे मुलांना टरबूज विकायला सांगण्यात आलं. त्यानंतर पुस्तकं विकायला, रस्त्यावर लहान व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घ्यायला, आणि मग अधिकाऱ्यांची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं.
या सर्व अनुभवातून मुलांचा आत्मविश्वास खूप वाढला. त्यांची भीती कमी झाली आणि ते स्वतःहून व्यक्त होऊ लागले. भरवाड वस्तीतील मुलांना नवीन जागा पाहायला मिळाल्या, बाहेरच्या जगाची ओळख झाली. या संपूर्ण अनुभवातून मुलांना समजलं की भविष्यात काय बनायचं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल याची स्पष्ट कल्पना मिळाली.
सर्व टास्क्स त्यांनी पूर्ण केल्या. त्यांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मलाही खूप काही शिकता आलं.या अनुभवांनी त्यांच्यात आत्मविश्वास जागा केला. पहिल्यांदा जे घाबरत होते, ते आता लोकांशी बोलू लागले, प्रश्न विचारू लागले. त्यांचे डोळे आता केवळ बघत नव्हते ते स्वप्नं पाहत होते.
हे केवळ एक शिबिर नव्हतं, तर एक संधी होती स्वतःला शोधण्याची. मुलांचं नाही, तर माझंही व्यक्तिमत्त्व घडवलं. मुलांसोबत काम करताना आलेल्या अनुभवांनी मला शिक्षक म्हणून अधिक सजग, संवेदनशील आणि प्रभावी बनवलं.
– “उमलती जिज्ञासा”
– प्रीतम नेहारे

उन्हाळा आला की जंगलातल्या बेड्यांमध्ये हालचाल सुरू होते. पाण्याची कमतरते मुळे आणि गाईच्या चाऱ्याच्या शोधात अनेक बेडे स्थलांतर करतात. यंदाही तसेच झाले. सर्व बेडे वेगवेगळ्या दिशांनी स्थलांतरित झाले.
त्यामुळे प्रत्येक बेड्यावर पोहोचणे हे एकत्रित शक्यच नव्हते. वेगवेगळ्या दिशांनी जात असल्यामुळे संपूर्ण समुदाय विखुरला गेला होता.
या परिस्थितीत आम्हाला एक दरवर्षी प्रमाणे सर्व बेड्यांमधील मुलांना एकत्र एका ठिकाणी बोलावून, त्यांच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा एक संधी कार्यक्रम आयोजित करण्याची. म्हणूनच, ‘रियाजघर’ नावाच्या आमच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत १५ दिवसांचा निवासी प्रोजेक्ट नागपूरमध्ये आयोजित केला गेला.
या शिबिरात मुलांना रोज नवनवीन अनुभव देण्याचा आमचा उद्देश होता. केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर प्रत्यक्ष अनुभव, कृती आणि निरीक्षण यावर आधारित शिकणं हे आमचं ब्रीद होतं.
दररोज आम्ही मुलांना विविध ठिकाणी भेटीसाठी घेऊन जात होतो. ALG Angle सारख्या क्रिएटिव्ह स्पेसला भेट दिली, जिथे मुलांनी मातीची विविध खेळणी बनवली, वेगवेगळी कला पाहिली. ‘Reading कीडा’ नावाच्या पुस्तकांच्या गोड दुनियेत मुलं हरवून गेली. वाचनाची गोडी निर्माण झाली. Parle-G कंपनीत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया पाहिली.
या सगळ्यांमधील एक विशेष आणि लक्षात राहिलेली भेट होती रमण सायन्स सेंटर. विज्ञानाशी संबंधित प्रत्यक्ष प्रात्यक्षिकं, 3D शो, सौरमंडळ, आकाशगंगा आणि अनेक जिज्ञासा वाढवणाऱ्या गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या. मुलांच्या डोळ्यांत चमक होती. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेची झळाळी स्पष्ट दिसत होती.
ती तिथली भेट काहीशा जादुई होती. मुलं आपापले प्रश्न विचारू लागली.
कान्हा म्हणाला, “ये आकाश में कैसे जाते हैं?”
ऋतु विचारत होती, “हे ग्रह फिरतात कसे?”
त्यांच्या या शब्दांमध्ये नव्या उमेदेची, नव्या उर्मीची सुरुवात होती.
त्यांच्या मनात निर्माण झालेली ही उत्सुकता आमच्यासाठीच एक यश होतं. सौरमंडळ आणि आकाशातील गूढता प्रत्यक्ष पाहून त्यांनी एक नवीन विश्व अनुभवले. या अनुभवाने त्यांचं विचारविश्व विस्तारलं. फक्त निरीक्षण नव्हे, तर अनेक कल्पनाही त्यांच्या मनात उमटल्या.
हा १५ दिवसांचा काळ त्यांच्या आयुष्यात एक सुंदर आठवण म्हणून नक्कीच जपला जाईल. आणि आमच्यासाठी ही होती एक अनुभव, जो त्यांचं भविष्य घडवण्यासाठी पाऊल ठरला.
निवड प्रक्रिया – “शोध… नवे सहकारी, नव्या शक्यता”
निखिल, निकिता

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मी आणि निकिता आमच्या संस्थेसाठी नवीन fellows च्या शोधात होतो. ही संपूर्ण प्रक्रिया learning च्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरली.
बरेच challenges आले, पण त्यांचा सामना कसा करायचा आणि पुढे कसे जायचे, हे शिकायला मिळाले. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन अनुभव, नवे शिकणे आणि जगायला एक नवाच आत्मविश्वास मिळत गेला. हा शोध केवळ फेलोजपुरता मर्यादित नव्हता, तर आमच्या स्वतःच्या वाढीचा होता.
सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये आम्ही नागपूरच्या आसपासच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच साहेब यांची भेट घेतली. त्यांना आमच्या संस्थेबद्दल माहिती दिली, संवाद साधला आणि गावातील होतकरू तरुण-तरुणींना ज्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलेले, शिक्षित, उत्साही तरुणांना याबद्दल माहिती पोहोचवण्याची विनंती केली.
यानंतर गावागावातून पुढचं पाऊल कॉलेजकडे वळलं. आम्ही कॉलेजला भेटी दिल्या, तिथे sessions घेऊन विद्यार्थ्यांना फेलोशिपबद्दल माहिती दिली. फेलोशिपमध्ये सहभागी होण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे registration form भरून नोंदणी करणे त्यामार्फत आम्ही सुरुवात केली.
त्यानंतर, सोशल मीडियाच्या माध्यमातून Facebook आणि Instagram वर फेलोशिपबद्दल माहिती आणि काही फेलो स्टोरीज शेअर केल्या. याचा आम्हाला खूप फायदा झाला. ही माहिती मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली आणि सर्वाधिक registrations सोशल मीडियामधून आले.
यानंतरची दुसरी पायरी होती, नोंदणी केलेल्या उमेदवारांना application form भरण्यासाठी आवश्यक माहिती देणे. त्यासाठी आम्ही सर्व उमेदवारांशी संपर्क साधायचे ठरवले. त्या टप्प्यावर आमच्याकडे एकूण 1765 registration forms आले होते. त्यामुळे आम्ही टीम वाढवायचे ठरवले आणि कॉल्स सर्वांना assign केले.
त्यानंतर आम्हाला भरपूर application forms मिळाले. उमेदवारांना prework दिले गेले. त्यानंतर दोन दिवसांचा workshop घेण्यात आला. आणि शेवटी, ज्या fellows चा आम्ही शोध घेत होतो, ते आम्हाला मिळाले. या प्रक्रियेत interviews झाले आणि योग्य फेलोजची निवड झाली. त्या क्षणी, फक्त उमेदवार नाही मिळाले एक नवीन ऊर्जा मिळाली, एक नवी टीम.
या सर्व प्रक्रियेनंतर जो अनुभव मिळाला, तो खरोखरच आत्मविश्वास वाढवणारा होता.
२०२५-२६ इन्स्टिट्यूट: धाडस, आत्मचिंतन आणि नात्यांमधून स्वतःला शोधण्याचा प्रवास
जान्हवी ,पायल

या वर्षीचं आमचं इन्स्टिट्यूट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं.आमच्या संस्थेची सुरुवात एका नवीन दृष्टिकोनाने झाली. ‘कसं शिकवलं जाईल’ यापेक्षा ‘कसं वाटेल’ यावर लक्ष केंद्रित केलं.
यावर्षीची संकल्पना courage, reflection, relationship या तीन महत्त्वाच्या आधारस्तंभांवर उभी होती. ही रचना डिझाइनपुरती मर्यादित राहिली नाही, तर इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक जागेत, प्रत्येक आठवड्याच्या थीममध्ये, आणि मुलांच्या प्रत्येक अनुभवामध्ये खोलवर रुजली. ज्यामुळे मुलांना समजून घेण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त होण्याची आणि समजून घेण्याची एक अमूल्य संधी मिळाली.
प्रत्येक दिवस एक विचारशील रचना होती:”२ guided spaces, १ reflection आणि १ self-study” असा समतोल होता. मार्गदर्शित जागांमध्ये, विद्यार्थ्यांनी नवीन कल्पनांचा शोध घेतला आणि संभाषणात सहभागी झाले. चिंतनामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवांमध्ये खोलवर पाहण्यास मदत झाली, तर स्व-अभ्यासामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्याचे आणि त्यांच्या आतील आवाजाशी जोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
पूर्वी जे बदल आमच्या लक्षात यायला तीन महिने लागत, ते यावेळी काही आठवड्यांतच स्पष्टपणे जाणवू लागले. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं पूर्वतयारी. यावर्षी आमचं planning, session डिझाईन, energizers आणि content याचं एक ठोस नियोजन आधीपासूनच सुरू झालं. गाणी, अॅक्टिव्हिटीज, वेळ आणि स्ट्रक्चर यासाठी एक फोल्डर तयार केला गेला. सततचा रियाज आणि तयारीमुळे फेलोना आत्मविश्वास मिळाला, आणि त्यांनी त्या spaces आत्मविश्वासाने, संवेदनशीलतेने घेतल्या.Pre-primary आणि primary वयोगटासाठी घेतलेल्या सेशन्समुळे त्यांना लहान मुलांशी संवाद कसा साधायचा, शिकवण्याची रचना कशी असते, जबाबदारी कशी पार पाडायची याची चांगली समज झाली ज्याचा थेट फायदा त्यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्याआधीच झाला.या वर्षी मुलं आणि मुली सम प्रमाणात सहभागी झाले होते, त्यामुळे प्रत्येक अॅक्टिव्हिटीमध्ये समतेचा अनुभव येत होता. दरबार आणि cultural spaces मध्ये त्यांचा सहभाग उत्स्फूर्त, मनापासून आणि सर्जनशीलतेने भरलेला होता.
जेव्हा मुलं इन्स्टिट्यूटमध्ये आली, तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते “इतकी मोठी ट्रेनिंग एका महिन्यात काय देणार?”, “हे खरंच उपयोगाचं आहे का?“ पण इन्स्टिट्यूट संपल्यावर त्यांच्या बोलण्यात, देहबोलीत आणि शेअरिंगमध्ये एक वेगळंच ठसठशीत बदल दिसतो.आणि सगळ्यात महत्वाचं , इथे आल्यावर त्यांना एक जागा मिळते जिथे ते मनमोकळं बोलू शकतात, व्यक्त होऊ शकतात. जिथे कोणतीही भीती, कसलीही शरम न ठेवता स्वतःला शोधता येतं. इथून त्यांना स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा खरा मार्ग मिळतो आणि हीच या इन्स्टिट्यूटची खरी ताकद आहे.