वेळेची गरिबी
वेळेची गरिबी

वेळेची गरिबी

मोठी गोष्ट 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तीन मित्र कट्ट्यावर चहा पीत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या दोन मित्रांना कुत्सितपणे म्हणाला, “काय मग, तुमच्या लग्नाची वरात सायकल वर निघणार आहे म्हणे?”

दुसऱ्या मित्राला पहिल्याचे ते बोलणे जिव्हारी लागले. तो चडफडत तिथून उठला. त्याने मनातल्या मनात निश्चय केला, “एक दिवस येईल, जेव्हा मी याला दाखवून देईन मैं क्या चीज हूँ. तोपर्यंत याचं तोंड नाही बघणार!” त्याच दृढ निश्चयाने तो घरी गेला. फालतू मित्रांसोबत गप्पा करत वेळ वाया घालवणे त्याने बंद केलं. पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. तीन वर्षाच्या मेहनतीचं फळ म्हणजे तो आपल्या कॉलेज मधून टॉप आला. कॅम्पस मध्ये त्याला आठ लाखाचं पॅकेज भेटलं. मित्राच्या नाकावर टिच्चून जोरदार लग्न केलं, लग्नाच्या वरातीत चक्क स्कॉर्पिओ चा ताफा लावला. घरी बोलून ठेवलं, “एवढं लग्नाचं कर्ज उतरेपर्यंत तेवढं खर्च जपून करू. ६०-७० हजाराची नोकरी आहे. ४ वर्षात फेडून टाकीन पैसे.” १०-१० तास कंपनीत घालवून स्वतःच्या ताकदीवर वर्षाला पुढे गेला. आता फक्त एक गोष्ट राहिली. जुनं घर बोचत होतं. पुन्हा जोरदार तयारी केली. ६०-७० लाख खर्चून दिमाखदार घर उभारलं. वाढलेल्या कामानं, घरी वेळ मिळत नव्हता, पण कुछ पाने के लिये कुछ खोना तो पड़ता है। तो म्हणाला, “८-९ वर्षात कर्ज फेडून टाकू. मग निवांत.” एका दिवशी घरी थोडीफार कुरबुर झाली. त्याला खूप वाईट वाटलं, “मी या लोकांसाठी इतकं करतो, पण यांना किंमत नाही.” त्याला आठवलं, किती दिवस झाले असतील आपण स्वतःसाठी जगलो नाही. त्याने विचार केला, “आज सगळं बाजूला, मी मस्त फिरायला जाणार.” पण कोणासोबत? आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं ज्यांच्यासोबत अशी मज्जा येईल जी कॉलेजात चहाच्या कट्ट्यावर येत होती. दोन-चार फोन फिरवले पण आज कोणी मोकळं नव्हतं. तेवढ्यात ऑफिस मधून फोन आला, “आज एक महत्वाची ऑर्डर आहे. ही संधी आपण नाही घालवू शकत नाही. स्वतःला दाखवून देण्याची हीच संधी आहे. वेळेवर पोहोचशील!” बस्स, आजचा प्लॅन कॅन्सल, बघू नंतर कधीतरी. 

छोटी गोष्ट

तिसऱ्याने थांबवायचा प्रयत्न केला पण दुसरा तडक चालला गेला होता. तिसरा मग खळखळून हसत पहिल्याकडे वळला आणि म्हणाला, “अरे काय सांगू, माझी तर सायकल पण बंद पडली आहे, माझी वरात तर बहुतेक आमच्या घरातल्या गाढवावरच निघणार! बाकी तुझं मस्त आहे यार, तुझ्या घरच्यांनी तर जोरदार तयारी केली आहे म्हणे. कसं मस्त वाटतंय ना?” “हो मग! एकदम! तेवढं ४-५ लाख लागले तर फेडण्याचं टेन्शन आहे यार. पण करून टाकू. तुझं बरं आहे यार, तुझं स्वस्तात निपटत आहे. तुला लोकांच्या बोलण्याचं टेन्शन येत नाही का?”

“हा हा.. अरे बघ, मला काही ४-५ लाख जमवण्याचं टेन्शन नाही. त्याच्यामुळं माझ्या १५-२० हजार पगारात मित्रांना रोज चहा पाजवू शकतो. चहाचं बिल प्रत्येक वेळी मीच देतो. कधीकधी भेळ पण खाऊ घालतो सगळ्यांना, त्याच्यामुळं कोणी आपल्याला काही फार बोलत नाही. ४० रुपयात होणाऱ्या कामासाठी ४ लाखाचं ओझं कशाला घ्यायचं?”

पहिला म्हणाला, “तुझं मस्त आहे यार, अपना लाइफ भी तेरे जैसा होना मँगता, एकदम सॉर्टेड” आणि तिसऱ्याकडे कौतुकाने बघत उठला. 

मित्रांनो, तुम्ही तुमच्या विशीत असाल तर  एक लक्षात ठेवा. आपल्याला शाळेत, कॉलेजात, घरात, पैशाची गरिबी आणि श्रीमंती याबद्दल शिकवले जाते, त्यातून बाहेर कसे पडावे याचे मार्ग सांगितले जातात. पण वेळेची गरिबी हा विषय अजून आपल्याला समजायचा आहे. तो समजायला अजून अवघड जातो, कारण ‘तुझ्याकडे घर नाही’ हा कमीपणाचा, हसण्याचा विषय आहे. पण ‘तू घेतलेल्या घरात तुला तुझ्या लेकरांसोबत, मित्रांसोबत बायकोसोबत घालवायला वेळ नाही, फिरता येत नाही’ हा अजून कमीपणाचा, हसण्याचा विषय बनलेला नाही. पुरेसा स्वतःहून विचार न करता केवळ गर्दीसोबत धावत राहिलो तर पैशाच्या गरिबीपासून धावता-धावता वेळेच्या गरिबीत पोहोचू ही गोष्ट सतत लक्षात ठेवू! त्यामुळे पैसे-पैसे हे एकच तुणतुणे ऐकणे आणि वाजवणे यापेक्षा, “किती पैसे? आणि किती वेळ याबद्दल बोलायला आणि विचार करायला सुरु करूया!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *