पैशाने श्रीमंती येते का?
पैशाने श्रीमंती येते का?

पैशाने श्रीमंती येते का?

दिवाकर मोहनी

जगातल्या अनेक देशांपैकी भ्रष्टाचार ज्या देशांमध्ये अधिक आहे त्यांपैकी आपला एक देश आहे. जे भ्रष्टाचार करतात ते स्वतः श्रीमंत व्हावे म्हणून करतात. भ्रष्टाचाराने श्रीमंती आली नसती किंवा आपल्याला श्रीमंती येते असे वाटले नसते तर भ्रष्टाचार कोणी केला असता काय? 

श्रीमंती दोन प्रकारची असते; पहिली असते वैयक्तिक श्रीमंती आणि दुसरी असते सार्वजनिक श्रीमंती. वैयक्तिक श्रीमंती म्हणजे धन, दौलत, इस्टेट वगैरे. पण वैयक्तिक श्रीमंती असलेली व्यक्ती दरिद्री असू शकते. मला एक कुटुंब माहीत होते. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. पण दोन वेळेच्या जेवण्याचेसुद्धा त्यांना वांधे होते. घरातला मुलगा किराणा दुकानावर गेला की दुकानदार त्याला म्हणे, “आधीची उधारी फेड मग माल घेऊन जा.” त्या मुलाच्या बापाच्या नावावर पुष्कळ जमीन होती. त्यांना ती जमीन विकायचीही होती. पण ती मंडळी संकटात सापडली आहे हे समजल्यामुळे त्या जमिनीला योग्य किंमत मिळत नव्हती. आणि ज्या किंमतीला मागत होते, तितक्या कमी किंमतीला ती विकण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणजे मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी त्यांच्याकडे असूनही अत्यंत दारिद्र्यात त्यांना दिवस काढावे लागत होते.

वैयक्तिक श्रीमंती असूनही दरिद्री असण्याचा आणखी एक प्रकार असा आहे की घरात पैसा आहे, पण त्या पैसेवाल्याला त्याच्या खेड्यातून बाहेर मोठ्या गावी जाण्यासाठी रस्ताच नाही. नाले, ओढे, चिखल वगैरे यांना ओलांडणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसांत नदीतले पाणी गढूळ आणि खराब झाल्याने प्यायला स्वच्छ पाणीही नाही. वैयक्तिक श्रीमंती खूप, पण तिचा उपभोग घेणे शक्य नाही. ह्या गोष्टी किंवा ह्या घटना पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या आहेत. पण आजही त्या असू शकतात.

सार्वजनिक श्रीमंती म्हणजे काय? सार्वजनिक श्रीमंती याचा अर्थ असा की गावामध्ये सगळ्या सोयी आहेत. चांगले रस्ते आहेत. रस्ते सार्वजनिक आहेत. नळाची तोटी फिरवल्याबरोबर हवे तितके पाणी मिळते आहे. मुलांना शिकवण्यासाठी जवळच शाळा आहे. त्याला तेथे अंगात घालायला कपडे मिळतात. दुपारचे जेवण मिळते, वह्या-पुस्तके मिळतात – आणि मास्तर मनापासून शिकवतात. मुलांच्या आई-बापांजवळ किती पैसा आहे याची कोणीही चौकशी करीत नाही. आजारपण येऊ नये म्हणून सार्वजनिक संस्थांमार्फत घटसर्प, देवी, टायफॉईड आणि असे साथीचे आजार मुलांना होऊ नयेत म्हणून योग्य त्या वेळी लसीकरण केले जाते. याउपर कोणी आजारी पडल्यास सार्वजनिक दवाखान्यात त्याची उत्तम देखभाल होते. दळणवळणाची साधने सार्वजनिक मालकीची असून ती बिनबोभाट कामे करतात. ह्या सार्वजनिक संस्थांमध्ये टपाल, रेल्वे, बस वगैरे ह्या सेवा पैसे कमवण्यासाठी केल्या न जाता सामान्य जनतेच्या उपयोगासाठी किंवा त्यांच्या सोयींसाठी केल्या जातात. सर्व देश म्हणजे देशाचे सर्व नागरिक एकमेकांसाठी जेथे आप-आपली कामे नीट करतात तेथे प्रत्येक माणूस श्रीमंत असतो. काही अत्यंत श्रीमंत आणि काही अत्यंत दरिद्री अशी स्थिती तेथे नसते. आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक श्रीमंती आहे तेथे साहजिकच विषमता कमी असते. सर्वच संपत्ती सार्वजनिक मालकीची झाली तर सगळ्यांचीच समान श्रीमंती राहते. खाजगी मालकीची गरज नष्ट होऊ शकते. प्रत्येकाने पैशाकडे न पाहता एकमेकांची कामे केली तर खाजगी मालकी नष्ट होऊ शकते. सगळेच सार्वजनिक याचा अर्थ सगळ्यांचा त्या वस्तूंवर आणि सेवांवर समान हक्क असतो.

आमच्या देशात अश्या सार्वजनिक संस्था उदा. सार्वजनिक शाळा, सार्वजनिक दवाखाना, सार्वजनिक पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक स्वच्छता अभियान ही इंग्रजांचे आगमन होईपर्यंत कुठल्याही भारतीय किंवा हिंदुस्थानी राजांच्या राजधानीत निर्माण झाली नाही. आज अश्या संस्था असूनही या संस्थांपासून सर्वांना लाभ घेता येत नाही किंवा संस्थांना तो देताही येत नाही. इंग्रजांनी येथे आल्यानंतर म्युनिसीपालट्या स्थापन केल्या. म्युनिसीपालट्यांचे काम काय तर, स्वच्छता, शिक्षण, साफसफाई, यांसारखी कामे सर्वांसाठी करायची, ती करण्याला जो खर्च येईल तो कराच्या रूपाने गोळा करायचा. या संस्थेला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतात. मराठीत स्थानिक स्वराज्य संस्था असे नाव आहे. आपल्या इथल्या अश्या सार्वजनिक संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होऊन बसली आहेत. याचे कारण असे की ह्या संस्था कश्यासाठी निर्माण करायच्या आणि चालवायच्या हे आम्हाला अजून कळलेच नाही. आमच्या डोक्यात त्याबाबत पूर्ण अंधकार आहे.

सार्वजनिक श्रीमंती म्हणजे काय हे हिंदुस्थानच्या लोकांना माहीत नव्हते आणि माहीत नाही म्हणजे आजही कळलेले नाही. हे माझे विधान फार धाडसाचे आहे. आमच्या देशी संस्थानिकांनी मोठमोठी कामे केली याची उदाहरणे भरभरून दिली जातील. अहिल्याबाई होळकर ह्या राणीने ठिकठिकाणी नद्यांवर घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंची सोय केली, सयाजीराव गायकवाड ह्यांनी मोठमोठ्या पुस्तकालये निर्माण केली, विद्वानांना आश्रय दिला. शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या, ही सगळी सार्वजनिक हिताची कामे केली, असे माझ्या लक्षात आणून दिले जाईल, पण एखाद्या प्रदेशातील जनतेने स्वतःहून एकमेकांच्या सोयीसाठी कामे करणे वेगळे आणि राजाने आपल्या प्रजेसाठी कामे करणे वेगळे असे मला सांगावयाचे आहे.

पेशव्यांनीसुद्धा कात्रज घाटात जलाशय निर्माण करून तेथून कुंभारी नळांनी पाणी गावात आणले आणि काही पेठांमध्ये हौद पाण्याने सतत भरलेले राहतील अशी सोय केलेली होती, असे मी ऐकतो. पण ही कामे राज्यकर्त्याने प्रजेसाठी केलेली होती. जनतेने स्वतःसाठी केलेली नव्हती.

आज सरकारने मध्यंतरी ज्या सेवा सार्वजनिक पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचे पुन्हा खाजगीकरण होत आहे. नागपूरच्या पाणीपुरवठ्याचे काम महानगरपालिकेने खाजगी ठेकेदाराला करण्यासाठी दिलेले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांनी विजेचे वितरण करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका दिला. पोस्ट ऑफिसपेक्षा कुरीयरच्या सेवा जास्त विश्वासार्ह होत चालल्या आहेत. सार्वजनिक दवाखान्यांची वासलात लागली आहे. आणि खाजगी दवाखान्यांची चलती आहे. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर केवळ अंधाधुंदीच! तेथेही झपाट्याने खाजगीकरण झालेले आहे. पुष्कळश्या महाविद्यालयांत आणि शाळांतदेखील शिकवलेच जात नाही. आज सगळेजण आपापले खिसे कसे भरता येतील ह्याच्याच फिकिरीत आहेत. अण्णा हजारे आणि त्यांच्या चमूने भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यांचे लक्ष वरिष्ठ राजकारण्यांकडे केंद्रित केले. वरिष्ठ राजकारणी आणि सर्वसामान्य भारतीय जनता हे सारे एकाच स्वभावाचे आहेत; सार्वजनिक श्रीमंती म्हणजे काय हे समजण्याचे इंद्रिय कोणाहीपाशी नाही, हे कोणीच लक्षात घेतले नाही. आपल्या देशातल्या समस्या पैसा ओतल्याने सुटणार नाहीत. आपल्या देशवासीयांचा पुष्कळसा पैसा स्विस बँकेत आहे असे म्हणतात. तो पैसा इथे आला तर येथे प्रचंड चलनवाढ होईल. दुसरे काहीच घडणार नाही. जी किराणा मालाची दुकाने परदेशी भांडवलाच्या साह्याने चालवण्याची नुकतीच परवानगी दिली गेली, त्यांसाठी लागणारा पैसा आम्हाला देशातल्या देशात उभा करता येणार नाही असे मुळीच नाही. आपल्या देशात श्रीमंत माणसांची म्हणजे वैयक्तिक श्रीमंतांची संख्या मुळीच कमी नाही. रग्गड पैसा आहे, पण आपल्याला एकमेकांसाठी कामे करण्याची सवय नाही ह्याचे कारण ती दृष्टीच आपल्याला प्राप्त झाली नाही. ह्या करोडो लोकांच्या देशात दोनचार जणांना ती दृष्टी असून काही फरक पडू शकत नाही. आपल्या देशासमोरच्या समस्या सार्वजनिक श्रीमंती निर्माण करण्याने काही प्रमाणात सुटणार आहेत.

माणसाला जी श्रीमंती येते ती तीन-चार प्रकारांनी येते. (१) सार्वजनिक वस्तूंची निर्मिती व त्यांचा वापर, (२) श्रमविभाजन, (३) उपभोग्य वस्तूंची विपुल मात्रेत उपलब्धता आणि वाटप, (४) आणि प्रत्येकाला फावला वेळ (Leisure) मिळणे.

श्रमविभाजन केल्याशिवाय श्रीमंती येत नाही ह्याचे कारण असे की सगळी कामे एका माणसाला करता येत नाहीत. तसे त्याने करायचे ठरवले आणि स्वतःकरता अन्नोत्पादन करणे, स्वतःचे कपडे विणणे, स्वतःचे घर बांधणे, या मूलभूत गोष्टी खूप आटापिटा करून त्याला करता आल्या तरीही स्वतःकरता वाहन, दळणवळणाची साधने इ. गोष्टी करणे त्याला अशक्यच होईल. या सार्‍याकरता श्रमविभाजन झाल्यामुळेच त्याला विविध प्रकारच्या सोयींचा उपभोग घेणे शक्य झाले आहे.

उपभोग्य वस्तूंच्या विपुल निर्मितीचा मुद्दा समजून घेताना थोडा इतिहास बघावा लागेल आणि ग्रामोद्योग व यांत्रिक उत्पादन यामुळे पडणारा फरक समजून घ्यावा लागेल.

आपण खादीचे उदाहरण घेऊ. हाताने केलेल्या सुताचे हाताने विणलेले वस्त्र म्हणजे खादी. खादीच्या उत्पादनाला मर्यादा आहेत कारण येथे उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी मानवी श्रमांचे प्रमाण वाढवत न्यावे लागते. ह्याउलट मिलमध्ये कपडा निर्माण करताना माणसाचे श्रम कमी-कमी होत जातात. हाताने सूत कातताना जास्तीत जास्त बारा चात्या एक मनुष्य कातू शकतो. मिलमध्ये सहाशे-आठशे चात्या एक माणूस चालवतो. हे फक्त खादीच्या बाबतीत झाले. पण प्रत्येकच वस्तूच्या उत्पादनासाठी जेव्हा यंत्रे असतात आणि ती यंत्रे फिरविण्यासाठी वाफेची, विजेची किंवा आणखी इतर ऊर्जा वापरली जाते त्यावेळी त्या वस्तूंच्या उत्पादनासाठी मानवाची शक्ती व वेळ कमीत कमी खर्च होते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की माणसाला बहुतेक सगळ्या वस्तू त्याच्या श्रमांशी तुलना केल्यास जवळ-जवळ मोफत मिळू लागतात.

आज बहुतेक सर्व वस्तू खूपच कमी मानवी श्रमांत विपुलतेने उपलब्ध झाल्या आहेत. माणसाचे श्रम तेवढेच आणि वापरासाठी अनेक वस्तू उपलब्ध, कमी श्रमाच्या मोबदल्यात जास्त वस्तू वापरायला मिळणे ही फार मोठी श्रीमंती आहे. ही श्रीमंती औद्योगिक क्रांतीमुळे शक्य झाली आहे. तुम्ही झोपेत असतानाही उत्पादन सुरू राहिल्याने श्रीमंती येत असते. ही कोणतीच श्रीमंती जवळ असलेल्या पैशाने किंवा सोन्याने येत नाही. आपली श्रीमंती आपल्याजवळ किती पैसा किंवा सोने आहे यापेक्षा घरोघरी पंखे, वाहने अशा किती वस्तू वा गोष्टी कुठल्याही जास्तीच्या श्रमाशिवाय उपलब्ध झाल्या आहेत त्यावर मोजली जावी. ह्याचाच अर्थ असा की आपल्या व्यवहारातून पैसा आपण हटवला आणि वस्तूंचे उत्पादन आणि वाटप चालू ठेवले तरी चालण्यासारखे आहे. आम्ही निष्कारण पैशाचे माध्यम वापरत आहोत आणि विषमता निर्माण करीत आहोत. असो.

मानवी श्रमांच्या मोबदल्यात आपली श्रीमंती मोजायची आहे हे लक्षात घेतले की सकाळपासून रात्रीपर्यंत कामाला ज्यांना जुंपून घ्यावे लागते अशा महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने आणि उंची वस्त्रे असली तरी त्या अत्यंत दरिद्री आहेत असे म्हणावे लागते. त्यांचे दैनंदिन श्रम जोपर्यंत कमी होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे दारिद्र्य कमी होणार नाही. त्यांना बाहेर नोकर्‍या करण्याची गरज न पडतासुद्धा उपभोग्य वस्तू त्यांच्याकरता उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसे न झाल्यास, त्यांची जी वाढीव आय आहे तिचा त्यांचे श्रम कमी करण्यात त्यांना काहीच उपयोग होत नाही. आपल्या संपूर्ण समाजाला याबाबतीत काय करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

One comment

  1. Pingback: Photo Bulletin – June 2021 – Learning Companions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *