चक्रीघाट – अंगठ्यापासून सहीपर्यंत
चक्रीघाट – अंगठ्यापासून सहीपर्यंत

चक्रीघाट – अंगठ्यापासून सहीपर्यंत

– नविनता डोंगरे

आज आम्ही नेहमीप्रमाणे गावाबाहेर भरवाड बेड्यावर गेले होतो. सूर्य खूप तापत होता. सगळीकडे उकाडा जाणवत होता आणि मोकळ्या जागेत बसणं कठीण झालं होतं.

त्यामुळे आम्ही मुलांचा क्लास घेण्यासाठी सावली शोधत होतो. बराच वेळ शोधल्यानंतर एका मोठ्या झाडाखाली थोडासा गारवा मिळाला आणि तिथेच आम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली.

इतक्यात तिथे एक पोस्टमॅन काका आले. त्याच्या हातात एक पार्सल होतं एका मुलाच्या वडिलांसाठी औषध आलेलं होतं. पोस्टमॅन म्हणाला,“यावर सही करायला कोण आहे?”

सगळे मोठे लोक एकमेकांकडे बघू लागले. नेहमीसारखंच अंगठा लावायची सवय होती.

पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं.

सवा मुलगा हळूच उठला.
त्याने पोस्टमॅनकडून पेन घेतलं… थोडा वेळ कागदाकडे बघितलं… आणि मग त्याने स्वतःचं नाव लिहिलं.

थोडं वाकडं-तिकडं होतं… पण ती त्याची पहिली सही होती.

त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो शब्दांत सांगता येणार नाही. त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास दिसत होता “मीही करू शकतो” हा विश्वास.

आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांत अभिमान दिसत होता. त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच समाधानाची भावना होती. त्या छोट्याशा सहीने एक छान बदल घडवला होता.

त्या छोट्याशा सहीमध्ये फक्त नाव नव्हतं, तर त्याचा आत्मविश्वास होता. अंगठ्यापासून सहीपर्यंतचा हा प्रवास फक्त एका मुलाचा नव्हता, तर शिक्षणाने कसा बदल घडू शकतो याचा जिवंत अनुभव होता.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *