ठणठण – Zero Gravity – आनंदाचा प्रवास
ठणठण – Zero Gravity – आनंदाचा प्रवास

ठणठण – Zero Gravity – आनंदाचा प्रवास

– मयूर गेडाम

भरवाड समुदायातील मुलांसाठी घरच्या कामांना सोडून बाहेर जाणं हे थोडी कठीण गोष्ट आहे.

त्यामुळे मुलांना घराबाहेर पडण्याच्या आणि नवीन ठिकाणी जाण्याच्या संधी खूप कमी मिळते. त्यांच्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा कुटुंबासोबतच, आपल्या ओळखीच्या परिसरातच जातो.

मुलांशी संवाद साधताना अनेक वेळा जाणवते की त्यांच्या स्वप्नांनाही मर्यादा आहेत, कारण त्यांनी अजून मोठं जग पाहिलेलंच नाही. जर त्यांना एकदा तरी अशा वेगळ्या वातावरणाचा अनुभव मिळाला, तर त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच बदल होईल, असा माझा विश्वास होता.

Zero Gravity या उपक्रमाबद्दल समजल्यावर मी ठरवलं की आपल्या मुलांना तिथे घेऊन जायचंच. हा निर्णय घेताना उत्साह होता, पण त्याचबरोबर अनेक जबाबदाऱ्या आणि आव्हानंही होती. सर्वात मोठं आव्हान होतं पालकांना तयार करणं. कारण इथे रात्रीला जायचे होते.

मी एक-एक पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली. काही पालकांच्या मनात भीती होती “मुलं इतक्या लांब कशी जातील?”, “त्यांची काळजी कोण घेणार?”, “काही अडचण आली तर?” अशा अनेक प्रश्नांनी ते चिंतेत होते. सुरुवातीला काही पालकांनी स्पष्ट नकार दिला. पण मी त्यांना शांतपणे समजावलं, त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना आश्वासन दिलं की त्यांच्या मुलांची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ.

दोन चारदा त्यांच्याशी बोलल्यावर हळूहळू त्यांच्या मनातील भीती कमी होऊ लागली आणि विश्वास वाढू लागला. काही पालकांनी होकार दिला आणि तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली.

प्रवासाच्या दिवशी मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. काही मुलं पहिल्यांदाच इतक्या लांब जात होती, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच थोडीशी भीतीही होती. पण तरीही ते खूप उत्साही होते. प्रवासादरम्यान ते सतत नवीन गोष्टी पाहत होते, प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते.

जेव्हा मुलं Zero Gravity मध्ये पोहोचली, आजूबाजूचं वातावरण, विविध activities, खेळ हे सगळं त्यांच्यासाठी अगदी नवीन होतं. सुरुवातीला काही मुलं थोडी घाबरलेली होती, पण हळूहळू त्यांनी स्वतःला त्या वातावरणाशी जुळवून घेतलं.

थोड्याच वेळात त्यांनी भीती विसरून मनापासून खेळायला आणि हसायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं हसणं हे सगळं पाहताना असं वाटत होतं की हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक खास क्षण बनत आहे.

त्या दिवशी त्यांनी फक्त खेळ आणि activities केल्या नाहीत, तर त्यांनी एक वेगळीच दुनिया अनुभवली जी त्यांच्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळी होती.

त्या दिवसाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली मुलांना स्वप्न पाहायला संधी दिली पाहिजे. आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणीतरी त्यांच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे. योग्य संधी आणि थोडीशी साथ मिळाली, तर हीच मुलं मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *