संकलन आणि संपादन – निकिता देवासे
सोनखांब – मयूर, धुळी आणि जानवी यांची वाढती प्रगती
– प्रीतम नेहरे

शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येक मुलाची गती वेगळी असते. काही मुलांना गोष्टी लवकर समजतात, तर काहींना थोडा वेळ लागतो.
मात्र योग्य वेळ, सातत्य आणि मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक मुलामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो.
मयूरला मागील वर्षापासून मात्रा आणि अक्षरांचा अभ्यास करणे जड जात होते. मयूर खूप चंचल असल्यामुळे त्याला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि अभ्यास समजून घेण्यात कठीण जात होते. पालक आणि शाळेतील शिक्षक त्याच्याशी सतत संवाद साधत होते, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. तरीही, तो दिलेला अभ्यास प्रामाणिकपणे करत होता; फक्त त्याला समजायला थोडा अधिक वेळ लागत होता. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मार्गदर्शनामुळे आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. मयूर आता मात्रा वाचन करू लागला आहे आणि त्याला गणितातील मूलभूत संकल्पना देखील समजू लागल्या आहेत.
धुळी ज्या पद्धतीने शिकत आहे, त्याचप्रमाणे तिचा विकासही होत आहे. सुरुवातीला तिला काही गोष्टी समजायला वेळ लागत होता, पण आता तिचा आत्मविश्वास वाढतांना दिसतो. सध्या तिला मात्रा वाचन चांगल्या प्रकारे करता येते. गणितातही ती बेरीज आणि वजाबाकी अचूकपणे सोडवू शकते. तिच्या शिकण्यात झालेला हा बदल तिच्या मेहनतीचा आणि नियमित सरावाचा परिणाम आहे.
जानवीला सुरुवातीला लिहिता येत नव्हते आणि अक्षर ओळखही मर्यादित होती. यामुळे तिच्यासाठी शिकणं अधिक कठीण होत होतं. मात्र, सराव आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आता तिच्यात लक्षणीय बदल झाला आहे. तिला अक्षरांची आणि अंकांची ओळख झाली आहे आणि ती शब्द आणि पाढे वाचू शकते. तिची प्रगती मागील तुलनेत खूप वाढली आहे. आज तिचे वडीलसुद्धा आनंदाने सांगतात की ती आता स्वतः लिहू लागली आहे ही तिच्या प्रगतीची मोठी खूण आहे.