संकलन आणि संपादन – पल्लवी शंभरकर
अशुद्ध पाण्यापासून शुद्ध विचारांकडे… विद्यार्थ्यांचा जलशुद्धीकरण प्रयोग!
– योगेश कांबळे

आसोला रियाजघर येथील विद्यार्थ्यांचा अभिनव जलशुद्धीकरण प्रकल्प… विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील संकल्पना नव्हे, तर आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याची आणि समस्या सोडवण्याची दृष्टी!
याच विचाराला कृतीची जोड देत आसोला रियाजघर येथील विद्यार्थ्यांनी सहज उपलब्ध साहित्याच्या मदतीने जलशुद्धीकरणाचे कार्यरत मॉडेल तयार केले. प्लास्टिकची बाटली, छोटे खडक, दगड, रेती, वाळू, कोळसा आणि कापूस अशा साध्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी एक साधे पण परिणामकारक जलशुद्धीकरण यंत्र तयार केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी अशुद्ध पाणी या मॉडेलमधून सोडून पाणी गाळण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. या प्रयोगादरम्यान त्यांनी प्रत्येक थराची भूमिका समजून घेतली. पाण्यातील अशुद्ध घटक वेगवेगळ्या स्तरांवर कसे अडवले जातात, याचे निरीक्षण करताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता वाढली.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांना ‘करून शिकणे’ या अनुभवातून विज्ञान समजून घेण्याची संधी दिली. त्याचबरोबर निरीक्षण, प्रयोगशीलता, चिकित्सक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता, सहकार्य आणि पर्यावरणीय संवेदनशीलता यांसारख्या कौशल्यांचा विकास झाला. पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण ठरला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांनी हे जाणले की मोठ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी मोठ्या साधनांची गरज नसते. योग्य विचार, प्रयोगशीलता आणि उपलब्ध साधनांचा कल्पक वापर यामुळेही प्रभावी उपाय शोधता येतो. या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या मनात केवळ विज्ञानाची समज निर्माण झाली नाही, तर आपल्या आसपासच्या समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्याची वृत्तीही विकसित झाली.
या प्रयोगातून एक सुंदर संदेश मिळाला— “विज्ञान शिकायचे नसते, ते अनुभवायचे असते; आणि समस्या पाहायची नसते, तर तिच्यावर उपाय शोधायचा असतो!” आसोला रियाजघरच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम म्हणजे विज्ञान, पर्यावरण आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम ठरला.
दुधाच्या गाडीतून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास
– नवीनता डोंगरे

चक्रीघाट बेड्यावरच्या मुलांना यावर्षी नियमित शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शाळा आणि बेड्यामधील मोठं अंतर ही आमच्यासमोरची सर्वात मोठी अडचण होती. रोज शाळेत ये-जा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती.
पण मुलांनी शाळेत जावं, शिकावं आणि त्यांचं भविष्य घडावं, ही इच्छा मात्र कायम होती. अशाच वेळी लाला भैय्या मदतीला उभे राहिले. शाळेसाठी वाहनाची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी स्वतःच्या दुधाच्या गाडीतून मुलांना रोज शाळेत आणणं आणि पुन्हा घरी पोहोचवणं स्वीकारलं. अशा प्रकारे एका दुधाच्या गाडीतून या मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला.
सुरुवातीला शाळेच्या दारात उभी राहिलेली मुलं घाबरलेली आणि संकोचलेली होती. पण रोज शाळेत जाण्याचा अनुभव वाढत गेला तसतसा हा संकोच कमी होऊ लागला. वर्गात बसणं, गाणी म्हणणं, शिक्षकांशी बोलणं आणि अभ्यासात सहभागी होणं या छोट्या-छोट्या अनुभवांतून त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दिसू लागला. शाळा त्यांच्यासाठी अनोळखी जागा न राहता हळूहळू आपलीशी वाटू लागली.
या बदलाचा परिणाम त्यांच्या वागण्यातही दिसू लागला. मुलांनी स्वतःहून अभ्यासाची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. मोठी भावंडं लहान भावंडांना वर्गात समजावून सांगू लागली, घरी त्यांना शिकवू लागली आणि त्यानंतर स्वतःचा गृहपाठही पूर्ण करू लागली. शिक्षण केवळ शाळेत होणारी गोष्ट न राहता त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू लागलं. पालकांच्याही दृष्टिकोनात बदल झाला आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांची जागरूकता वाढू लागली.
या बदलाचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे मुलांची उपस्थिती. सुरुवातीला केवळ ९ मुलं शाळेत येत होती; आज ही संख्या १६ मुलांपर्यंत पोहोचली आहे. जे मुलं आधी शाळेत यायलाही तयार नव्हते, ती आज इतर मुलांना शाळेत जाताना पाहून स्वतःहून शाळेच्या वाटेवर चालू लागली आहेत. एका मुलाच्या बदलातून दुसऱ्या मुलाला प्रेरणा मिळते आहे आणि शिक्षणाची ही साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे.
आज मागे वळून पाहताना जाणवतं की प्रवासाची सुरुवात जरी दुधाच्या गाडीतून झाली असली, तरी त्याचा खरा प्रवास मुलांच्या मनात झाला आहे. शाळेबद्दलचा संकोच आता आपलेपणात बदलला आहे; भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली आहे आणि शिकण्याची इच्छा त्यांच्या डोळ्यांत दिसते आहे. लाला भैय्यांची साथ, पालकांचा विश्वास आणि मुलांची शिकण्याची जिद्द यामुळे हा बदल शक्य झाला. दुधाची गाडी केवळ मुलांना शाळेत घेऊन जाण्याचं साधन ठरली नाही, तर ती त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे जाणाऱ्या प्रवासाची पहिली पायरी ठरली.
नवीन प्रवाह, नवा प्रवास आणि वाचनाची पहिली पायरी
– देवेंद्र राऊत

सोनखांब बेड्यावर काम करण्याची माझी सुरुवात ही एका नवीन प्रवाहाची सुरुवात होती. नवीन ठिकाण, नवीन मुलं आणि त्यांच्या शिकण्याच्या गरजा समजून घेत मी दररोज त्यांच्यासोबत वेळ घालवत होते.
प्रत्येक दिवस नवा अनुभव देत होता आणि मुलांसोबत काम करताना मलाही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या.
याच काळात माझी ओळख झाली इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या दोन गोड मुलींशी—जानवी आणि धुळी. सुरुवातीला त्यांना साधे, बिना-काना-मात्रेचे मराठी शब्द वाचणे आणि लिहिणे कठीण वाटत होते. अक्षरे ओळखणे, ती जोडून शब्द बनवणे आणि ते शब्द वाचणे यासाठी आम्ही दररोज थोडा-थोडा सराव करत राहिलो. खेळ, विविध कृती आणि वाचनाच्या छोट्या-छोट्या संधींमधून त्यांचा शिकण्याचा प्रवास हळूहळू पुढे सरकत होता.
काही दिवसांनी एक सुंदर क्षण आला… जानवी आणि धुळी स्वतःहून मराठी शब्द वाचू लागल्या आणि ते शब्द लिहूही लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि “मी हे करू शकते!” हा आत्मविश्वास पाहून मन भरून आलं. हा फक्त वाचनातील बदल नव्हता, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या प्रवासाची सुरुवात होती.
या आनंदात आणखी भर पडली, जेव्हा Z.P. शाळेतील गोखे सरांनी त्यांच्या वाचनाचे कौतुक केले. मुलींची प्रगती पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं—मोठे बदल नेहमी छोट्या-छोट्या पावलांनीच सुरू होतात. मुलांच्या प्रगतीमागे त्यांचा प्रयत्न, सातत्य आणि त्यांना मिळणारे प्रोत्साहन यांची मोठी भूमिका असते.
आज त्या काही शब्द वाचत आहेत… उद्या त्या पूर्ण वाक्ये वाचतील, गोष्टी वाचतील आणि कदाचित स्वतःच्या गोष्टीही लिहितील. ही फक्त सुरुवात आहे; पुढचा प्रवास अजून खूप सुंदर आणि मोठा आहे. त्यांच्या या छोट्याशा पावलांसोबत त्यांच्या मोठ्या स्वप्नांकडे जाणारा प्रवासही सुरू झाला आहे.
हीच आमची बिना भिंतीची शाळा…
– डेविड सूर्यवंशी

हा आहे आमचा चिमुकला दिनेश… थोडासा खोडकर, पण शिकण्याची प्रचंड उत्सुकता असलेला! इकडे-तिकडे फिरत, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन शिकत राहणे, हा त्याचा स्वभावच झाला आहे.
त्याला कुठून आणि कशातून अधिक शिकता येईल, याचा तो सतत शोध घेत असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, एखादी गोष्ट जाणून घेण्याची आवड आणि शिकण्याची धडपड नेहमीच दिसून येते. २०२५ मध्ये पाहिलेला दिनेश आणि आजचा दिनेश यात खूप मोठा फरक जाणवतो. आता तो अनेक नवीन गोष्टी अनुभवतो, शिकतो आणि एखादी अडचण आली की आम्हाला आवर्जून विचारतो. “सर, इसको क्या बोलते हैं?” असा अगदी प्रेमाने विचारलेला त्याचा प्रश्न आमच्यासाठी खूप आनंद देणारा क्षण असतो. आता तर दिनेशला काय शिकायचे आहे, हेही तो स्वतः सांगतो. त्याच्या डोक्यात नेहमी एकच धडपड असते—“आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल का?”
वाचन करताना तो दोन अक्षरी आणि सोपे शब्द वाचतो. पण त्याच्या मनात एक वेगळीच जिद्द आहे—“मला वाचन आलंच पाहिजे!” ही धडपड त्याच्या प्रत्येक प्रयत्नातून जाणवते. आणि आज तर तो सातवीच्या वर्गाचे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होता! हा आमचा छोटासा, गोंडस दिनेश वर्गात इकडे-तिकडे पाहत असतो; पण मी काय शिकवत आहे, याकडे त्याचे अगदी बारकाईने लक्ष असते. मला नेहमी वाटते की दिनेशने खूप काही शिकावे, नवीन गोष्टी अनुभवाव्यात आणि त्याच्या कुतूहलाला सतत नवी दिशा मिळावी.
आता हितेश शाळेत जातो आणि तो पूर्वीपेक्षा खूप शांत झाला आहे. तो मला सांगतो, “सर, मेरे स्कूल में बहुत मारते हैं. मैं इधर तुम्हारे पास पढ़ता था, तो तुम नहीं मारते थे. सर, मुझे अभी पढ़ना आ रहा है.” तेवढ्यात दिनेशही मध्येच म्हणतो, “सर, मुझे भी आ रहा है ना किशन जितना पढ़ना?” त्यावर मी हसत त्याला म्हणतो, “बहुत आ रहा है दिनेश, तेरेको पढ़ना!” माझं एवढं म्हणणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा असतो.
दिनेशला शिकवताना मला शिक्षकापेक्षा त्याचा एक मित्र बनून त्याला समजून घ्यायला जास्त आवडते. कारण त्याच्यासोबत शिकवताना मलाही खूप काही शिकायला मिळते—त्याची जिज्ञासा, त्याचा उत्साह, त्याची निरागसता आणि प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्याची धडपड. आमचा दिनेश हसत-खेळत शिकतो आणि शिकतानाच आम्हालाही खूप काही शिकवून जातो.
चार भिंती, बाकं, फळा आणि ठराविक वर्गखोली नसली तरी शिकण्याची इच्छा असेल, तर प्रत्येक जागा वर्ग होऊ शकते आणि प्रत्येक अनुभव हा एक नवा धडा ठरू शकतो. हीच तर आहे आमची… “बिना भिंतीची शाळा!”
बेड्यावरचा माझा प्रवास — शिकवताना शिकण्याचा प्रवास
– दिपांशु देवासे

बेडा हा माझ्यासाठी नवीन होता आणि तेथील मुलंही माझ्यासाठी नवीन होती. सुरुवातीला मुलांच्या मनात माझ्याबद्दल अनेक प्रश्न होते, तसेच माझ्याही मनात त्यांच्याशी कसं जुळवून घेता येईल, याबद्दल अनेक विचार होते.
त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस थोडे आव्हानात्मक होते. मात्र, हळूहळू त्यांच्याशी संवाद साधत गेलो आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत गेलो.
बेड्यावर रोहित, कुलदीप, आशिष हे प्री-प्रायमरीचे विद्यार्थी, तर गोपाल, जयपाल, सेजल, राधा, भाऊ आणि रूपा हे प्राथमिक वर्गातील विद्यार्थी आहेत. सुरुवातीला या मुलांना अभ्यासाची फारशी ओळख नव्हती. त्यांच्यापासून शाळा खूप लांब असल्यामुळे नियमित शाळेत जाणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाची एक वेगळी आणि सोपी वाट तयार करणे गरजेचे होते.
नियमित अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मुलांमध्ये अभ्यासाबद्दलची उत्सुकता आणि सहभाग हळूहळू वाढताना दिसू लागला. मुलं आवडीने अभ्यास करू लागली आणि शिकताना त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढू लागला. त्यांच्या छोट्या-छोट्या प्रगतीकडे पाहून पालकांनाही आनंद वाटू लागला. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि शिकण्याची इच्छा माझ्यासाठीही प्रेरणादायी ठरली.
सुरुवातीच्या अडचणींनंतर हळूहळू प्रत्येक मुलासोबत माझं एक वेगळं नातं आणि बॉण्डिंग तयार झालं. अभ्यासासोबतच गप्पा, खेळ आणि रोजच्या संवादातून मुलं माझ्याशी जोडली गेली. आता त्यांच्यासोबत शिकवताना मला केवळ शिक्षक असल्यासारखं वाटत नाही, तर त्यांच्यासोबत शिकणारा एक मित्र असल्यासारखं वाटतं. त्यांच्या प्रत्येक छोट्या बदलातून मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळतं.
हा प्रवास अजूनही सुरू आहे. प्रत्येक महिन्यात या मुलांसोबत काहीतरी नवीन शिकायला, त्यांच्यातील बदल अनुभवायला आणि त्यांच्यासोबत नवं नातं जोडायला मिळत आहे. शिकवताना मी त्यांना जितकं शिकवतो, त्यापेक्षा ते मला आयुष्याकडे पाहण्याच्या अनेक गोष्टी शिकवतात. या पुढील प्रवासातही मुलांच्या शिकण्याच्या आणि प्रगतीच्या अनेक सुंदर गोष्टी अनुभवायला मिळतील, अशी मनापासून आशा आहे.