दुसऱ्या समुदायात मिसळण्याचा छोटासा प्रयत्न
दुसऱ्या समुदायात मिसळण्याचा छोटासा प्रयत्न

दुसऱ्या समुदायात मिसळण्याचा छोटासा प्रयत्न

– कल्याणी दडमल, प्रगती गोडघाटे, विराज गायकवाड

“मांस – मच्छी खाने वाले लोग अच्छे नहीं होते। हम कभी मांस, मच्छी और हड्डियों को हाथ भी नहीं लगाते।” हे मुलांच्या बोलण्यात नेहमी यायचे. घरात मोठ्या मंडळींचं हेच मत असल्यामुळे ते मुलांमध्येही येत असेल, हे कल्याणीला जाणवायचं. मांसाहार करणारे लोक चांगले नाही, ही भावना मुलांमध्ये स्पष्टपणे दिसत होती. हाड, मास-मच्छी यांची नावे घेतली तरी मुलांना ते नकोसे वाटायचे. वर्गामध्ये मांसाहार करणाऱ्या मुलांसोबत एकत्र बसायला, त्यांच्याशी मैत्री करायला मुले तयार नव्हती.याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर दिसायचा. मास-मच्छी खाणारी माणसेही आपल्यासारखीच असतात, हे मुलांना समजावून सांगणे गरजेचे होते. परंतु, मुलांना हे कसे समजवायचे, हा मोठा प्रश्न कल्याणीपुढे होता. ती सतत मुलांच्या विचारात बदल व्हावा यासाठी प्रयत्नशील असायची. परंतु, परिणाम काही दिसेना.
मुलांना नवनवीन विषयाचे ज्ञान मिळावे, यासाठी त्या-त्या विषयातील अनुभवी व्यक्तींना बेड्यावर बोलविले जाते. नितीन हा व्यवसायाने डॉक्टर. तो एके दिवशी बेड्यावर वर्ग घ्यायला आला. त्याने आपल्यासोबत हात-पा य आणि दातांची हाडे आणली होती. हाड-मास, मच्छी यासंबंधी मुलांचे काय विचार आहे, यावर आधीच कल्याणी आणि नितीनचे बोलणे झाले होते. नितीनला भीती वाटली की मुलांसमोर हाडे दाखवावे की नाही? परंतु मुलांचा वर्ग तर घ्यायचा होता. यासाठी नितीनने वर्गाची सुरुवात आरोग्य, स्वच्छता या गोष्टींपासून केली. नंतर हळुवारपणे नितीन हाडांचा विषयावर आला. तो बोलला, “मेरे पास इंसान की हड्डी है, लेकिन आपको तो डर लगता, नहीं तो मैं आपको दिखाता।” हे ऐकल्यानंतर मुलांचे चेहरे पाहण्यासारखे होते. “हड्डी को देखेंगे लेकिन,उसे कभी नहीं छुएंगे,” असं राम म्हणाला. वर्गातील बाकी मुलं पण असंच बोलू लागली. काही वेळाने सर्वजण नितीनने आणलेली माणसाची हाडे पाहू लागली. त्यातील चार वर्षाच्या रोहितने तर एक हाड आपल्या हातात घेतले. रोहितला बघून रामने पण हिम्मत करून तेच हाड हातात पकडले आणि लवकर सोडले. एकमेकांना बघून प्रत्येक मुल ती हाडे बघायची आणि हळुवारपणे हातात पकडत होती. यामध्ये श्रद्धा ने तर कमालच केली. दातांचा साच्या बिनधास्त हातात धरून तोंडाला लावून बघितला. आणि घरी आईला दाखवायला घेऊन आली. श्रद्धाची आई मोठ्या उत्साहाने ती हाडे पाहून कल्पना करत होती की, ही सगळी हाडे शरीरातील कुठल्या अवयवांची असतील ? कोणती असतील? काही वेळापूर्वी जी मुले हातात हाडे पकडायला पण तयार नव्हती त्याच हाडांनी आता ते दांडिया खेळायला लागले. हाड, मास-मच्छी यांच्या नावावर जी मुले किळस काढतात, घरापासून मांसाहार करणाऱ्या लोकांबद्दल भेदभावाचे विचार ठेवतात, अशा मुलांनी हातात हाडे पकडणे ही खूप मोठी गोष्ट होती. अनेक दिवसापासून होत असलेल्या प्रयत्नांची ही छोटीशी झलक मुलांमध्ये या दिवशी दिसून आली.

bharwad #children #Education #fellowship #learning companions #learning companions fellowship #nomadic community

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *