संकलन आणि संपादन – पल्लवी शंभरकर
ठणठण – १५ ऑगस्ट – मुलांच्या शिकण्याचा आणि नेतृत्वाचा सुंदर अनुभव
– प्रगती बांडेबूचे

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेड्यावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या celebration चे सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे सर्व मुखिया आणि पालकांची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीत सिद्धू भैया आणि मफला भैया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालक आणि समुदायातील लोक एकत्र आले होते, त्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साह आणि आपलेपणा जाणवत होता.
या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले ते मुलांनी सादर केलेले नाटक. काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ व्यक्तीकडून मुलांना “क्या पढ़ रहे हो? कुछ नहीं पढ़ने को आता है” अशी प्रतिक्रिया मिळाली होती. ही गोष्ट मुलांच्या मनाला लागली आणि त्यांच्याशी त्याचा एक वेगळाच connect झाला. “आम्हीही शिकत आहोत, आम्हालाही येत आहे आणि आम्ही जे शिकतोय ते दाखवू शकतो,” या विचारातून मुलांनी नाटक सादर करण्याचा निर्णय घेतला.
कान्हा, साबू, पूजा, आशा, किंजल, काजल, रिद्धी आणि नरेश या मुलांनी नाटकात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पूजाने मॅडमची भूमिका साकारली, तर कान्हाने Student Leader ची भूमिका प्रभावीपणे निभावली. नाटकाच्या माध्यमातून मुलांनी केवळ संवाद सादर केला नाही, तर त्यांच्या शिकण्याचा प्रवास, प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वासही सर्वांसमोर व्यक्त केला.
नाटकातून मुलांना एक महत्त्वाचा संदेश समुदायापर्यंत पोहोचवायचा होता — “तुम्ही आम्हाला जे म्हणता, त्यातूनच आम्ही शिकतोय. आम्हीही प्रयत्न करतोय आणि आम्हालाही खूप काही येत आहे.” हा संदेश मुलांनी अतिशय आत्मविश्वासाने सर्वांसमोर मांडला. सुरुवातीला शिकताना केलेले छोटे-छोटे प्रयत्न आज संपूर्ण समुदायासमोर स्वतःला व्यक्त करण्याच्या आत्मविश्वासात बदललेले पाहायला मिळाले.
या दिवसाचा आणखी एक सुंदर भाग म्हणजे सिद्धू भैयांचा मुलांसोबतचा सहभाग. त्यांनी मुलांना शिक्षणाबद्दल motivation दिले आणि त्यांच्या पारंपरिक लाठी-काठी खेळाबद्दलही मार्गदर्शन केले. मुलांसोबत त्यांचा हा संवाद आणि सहभाग यामुळे मुलांना आपल्या समुदायातील मोठ्यांकडून शिकण्याची आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी मिळाली.
१५ ऑगस्टचा हा दिवस त्यामुळे केवळ ध्वजारोहण आणि celebration पुरता मर्यादित राहिला नाही. तो मुलांच्या learning, leadership, confidence आणि community connection चा अनुभव देणारा एक सुंदर दिवस ठरला. “आम्हालाही येत आहे” हा विश्वास मुलांनी त्या दिवशी केवळ शब्दांत नाही, तर आपल्या कृतीतून दाखवून दिला.
आसोला – राखी सेलिब्रेशनचा सुंदर अनुभव
– प्राची बोरेकर

आज आम्ही मुलांसोबत राखी बनवण्याचा उपक्रम घेऊन राखी सेलिब्रेशन करण्याचे ठरवले. पण सुरुवातीला आमच्यासमोर एक छोटी अडचण होती—राखी बनवण्यासाठीचे साहित्य आमच्याकडे नव्हते.
मागच्या वर्षीचे काही साहित्य शाळेत ठेवलेले आहे एवढे मात्र आम्हाला माहीत होते. बराच वेळ शोधल्यानंतर ते साहित्य सरांच्या ऑफिसमध्ये सापडले आणि आम्ही लगेच राखी बनवायला सुरुवात केली.
आमच्याकडे काही सुंदर स्टोन्स होते; मात्र ते राखीवर चिकटवण्यासाठीचे नव्हते. मुलांना मात्र राखीवर स्टोन्स लावायचे होते. तेव्हा मुलांनी स्वतःच एक भन्नाट उपाय शोधला. त्यांनी घरी जाऊन जुन्या कपड्यांवरील स्टोन्स शोधले आणि ते राखी बनवण्यासाठी घेऊन आले. मुलांची ही कल्पकता आणि समस्या सोडवण्याची पद्धत पाहून आम्हालाही खूप आनंद झाला.
मुलांसोबत राखी बनवताना खूप मजा आली आणि त्यांच्या creativity चा सुंदर अनुभव आम्हाला घेता आला. रोज आपण मुलांना काही ना काही शिकवतो; पण आज राखी बनवताना मुलांनीच आम्हाला राखी बनवायला शिकवले. शाळेतील मॅडमनीसुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यांच्या creative पद्धतीतून आम्हालाही काहीतरी नवीन शिकायला मिळाले.
मुलं उत्साहाने म्हणत होती, “रुको मॅडम, ऐसा नहीं… ऐसा बनाओ, मैं सिखाती हूँ तुमको!” या एका वाक्यातच आजच्या दिवसाचा खरा अर्थ दडलेला होता. आपण मुलांना शिकवतो, पण त्याच वेळी मुलंही आपल्याला खूप काही शिकवत असतात.
आजच्या राखी सेलिब्रेशनमधून आम्हाला जाणवले की, शिक्षण हे केवळ शिकवण्याचे माध्यम नाही, तर एकमेकांकडून शिकण्याची प्रक्रिया आहे. मुलांची creativity, problem-solving skills आणि स्वतःहून काहीतरी करण्याची तयारी आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
आजचा दिवस मुलांसोबत आनंद, creativity आणि सुंदर आठवणींनी भरलेला होता. या छोट्याशा उपक्रमातून मुलांनी आम्हाला शिकवलेली गोष्ट मात्र खूप मोठी होती—शिकण्याची संधी नेहमीच दोन्ही बाजूंनी असते.
सोनखांब – “मीही करू शकतो!” – मयूरच्या शिकण्याचा सुंदर प्रवास
– देवेंद्र राऊत

मयूर हा इयत्ता तिसरीत शिकणारा शांत आणि गोड मुलगा आहे. सुरुवातीला त्याच्यासोबत काम करताना जाणवले की, तो शिकण्याचा प्रयत्न करत होता; मात्र शिकवलेली गोष्ट लक्षात ठेवणे आणि पुन्हा आठवणे त्याच्यासाठी कठीण जात होते.
तिसरीत असूनही त्याला मूलभूत अंक ओळखण्यात आणि इंग्रजी वाचनात अडचणी होत्या. त्यामुळे प्रश्न होता—मयूरला त्याच्या गतीने कसे शिकवायचे?
या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याच्यासाठी त्याच्या गरजेनुसार एक छोटा Learning Plan तयार केला. गणितात अंक ओळखण्यापासून सुरुवात केली, तर इंग्रजीमध्ये Phonics Sounds आणि CVC Words चा नियमित सराव सुरू केला. सुरुवातीला छोट्या-छोट्या गोष्टी अनेक वेळा घ्याव्या लागत होत्या; पण सातत्याने केलेल्या सरावामुळे मयूर हळूहळू त्या समजू लागला.
हळूहळू बदल फक्त त्याच्या अभ्यासातच नाही, तर त्याच्या वागण्यातही दिसू लागला. तो नियमित शाळेत येऊ लागला, वेळेवर गृहपाठ करू लागला आणि वर्गातील उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊ लागला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने स्वतःहून छोटी पुस्तके हातात घेऊन वाचण्यास सुरुवात केली.
आज मयूर ५० पर्यंतचे अंक ओळखतो आणि CVC Words सहज वाचतो. पूर्वी “मला जमत नाही” अशी भावना असलेला मयूर आता स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करतो. पुस्तक वाचण्यासाठी आता त्याला कोणी सांगण्याची गरज पडत नाही; तो स्वतःहून पुस्तक घेतो आणि वाचायला सुरुवात करतो.
मयूरचा हा प्रवास एक महत्त्वाची गोष्ट शिकवून जातो—प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. मुलाला त्याच्या गतीने शिकण्याची संधी, योग्य पद्धत, सातत्य आणि विश्वास दिला, तर त्याच्यातील क्षमता नक्कीच पुढे येते.
मयूर अजूनही शिकत आहे, पण आता त्याच्या डोळ्यांत एक नवीन आत्मविश्वास दिसतो—“मीही करू शकतो!”
चक्रीघाट – भरवाड समुदायातील मुली झाल्या शिक्षिका
– जीवन ढोक

भरवाड समुदायातील कुटुंबांचे जीवन स्थलांतराशी जोडलेले आहे. साधारणपणे दर तीन महिन्यांनी कुटुंबे गायी-गुरांसोबत स्थलांतर करतात आणि मुलंही त्यांच्यासोबत जातात. त्यामुळे मुलांचे शिक्षण सातत्याने सुरू ठेवणे हे नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे.
मात्र, यावर्षी चक्रीघाट बेड्यावरील मुलांच्या शिक्षणात एक सुंदर बदल पाहायला मिळाला.
सुरुवातीला वर्गात व्यवस्थित न बसणारी, शिक्षकांचे न ऐकणारी आणि सतत इकडे-तिकडे फिरणारी मुलं आता नियमितपणे वर्गाला येऊ लागली. सातत्याने घेतलेले वर्ग, प्रेमाने केलेले मार्गदर्शन आणि शिक्षणाची प्रेरणा यामुळे मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि शिकण्याची आवड निर्माण होऊ लागली. या बदलामध्ये Student Leader उपक्रमाचाही महत्त्वाचा वाटा राहिला.
या उपक्रमातून भरवाड समुदायातील काही मुली स्वतः शिकण्यासोबतच आपल्या लहान भावंडांना रात्री अभ्यास शिकवू लागल्या. त्या स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असतानाच आपल्या भावंडांच्या शिक्षणातही मदत करू लागल्या. त्याचा परिणाम जगदीश आणि दिनेश यांसारख्या मुलांच्या शिकण्यातही दिसून आला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने या मुलींना स्वतः शिक्षिकेची भूमिका पार पाडण्याची संधी मिळाली. त्यातील वालीने शिक्षकांचे निरीक्षण करून मराठीचा Activity Based Learning वर्ग घेतला. तिने मुलांना गोलामध्ये बसवून विविध कृतींच्या माध्यमातून शिकवले. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी जी मुलगी स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेत होती, तीच आज इतर मुलांना शिकवत होती. मुलांनीही तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि उत्साहाने सहभाग घेतला.
वालीचा हा अनुभव केवळ एका दिवसाचा उपक्रम नव्हता, तर तिच्या आत्मविश्वासाच्या आणि नेतृत्वगुणांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. “मी शिकते आणि इतरांनाही शिकवते” या भूमिकेतून या मुलींनी स्वतःच्या शिक्षणासोबत आपल्या समुदायातील इतर मुलांसाठीही शिकण्याची नवी वाट तयार केली आहे.
या परिवर्तनासाठी Learning Companion संस्था गेल्या चार-पाच वर्षांपासून चक्रीघाट बेड्यावर सातत्याने शिक्षणासाठी काम करत आहे. फेलो आणि शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाशी जोडण्याचे आणि त्यांना नेतृत्वाच्या संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज भरवाड समुदायातील या मुली केवळ विद्यार्थी नाहीत, तर शिक्षिका, मार्गदर्शक आणि इतर मुलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
जुनापाणी – बदलाची चाहूल… शाळेकडे धावणारी पावलं!
– दिपांशु देवासे

बेड्यावरची आमची छोटीशी शाळा आता मुलांच्या दिवसाचा एक सुंदर भाग बनली आहे. काही काळापूर्वी शाळेत येणे ही मुलांसाठी सहज गोष्ट नव्हती; पण आज शाळेत येण्यासाठी त्यांच्यात स्वतःहून उत्साह दिसतो.
शाळेत येण्यापूर्वी स्वच्छ अंघोळ करून, छान कपडे घालून यायची सवयही मुलांना लागली आहे.
आम्ही बेड्यावर पोहोचताच आमचा आवाज ऐकून मुलं दूरूनच शाळेकडे धावत येतात. चेहऱ्यावर हसू आणि उत्साह घेऊन ती जवळ येतात आणि आनंदाने “Good Morning!” म्हणतात. त्यांच्या या छोट्याशा स्वागतामध्ये शाळेबद्दल निर्माण झालेली आपुलकी स्पष्टपणे जाणवते.
पूर्वी शाळा म्हणजे फक्त शिकण्याची जागा होती; पण आता मुलांसाठी ती आनंदाने येण्याची, मित्रांसोबत वेळ घालवण्याची आणि काहीतरी नवीन शिकण्याची आपलीशी जागा बनली आहे. शाळेत येण्याची ही इच्छा त्यांच्या शिकण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या बदलामागे मुलांसोबत सातत्याने केलेले काम, प्रेमाने केलेले मार्गदर्शन आणि त्यांना आनंददायी शिकण्याचे अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. छोट्या-छोट्या सवयींमधून मुलांमध्ये जबाबदारी, आत्मविश्वास आणि शिकण्याची सकारात्मक वृत्ती निर्माण होत आहे.
आज बेड्यावर मुलांची शाळेकडे धावणारी पावलं पाहताना जाणवतं की हा फक्त शाळेत येण्याचा बदल नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये झालेल्या एका सुंदर परिवर्तनाची चाहूल आहे.
या छोट्याशा शाळेतून आज मोठ्या स्वप्नांची सुरुवात होत आहे.
ठणठण – खरंच, बालपण खूप महाग असतं!
– डेविड सूर्यवंशी

“खरंच, बालपण खूप महाग असतं!” माझ्या वर्गातील मुलांकडे पाहताना ही भावना पुन्हा पुन्हा मनात येते. पाऊस असो किंवा कडक ऊन, ही मुलं शाळेची साथ कधीच सोडत नाहीत.
त्यांच्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक प्रश्नातून आणि छोट्या-छोट्या अनुभवांतून मला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. वेगवेगळ्या वयोगटातील ही मुलं माझ्यासाठी फक्त विद्यार्थी नाहीत, तर माझीच मुलं आहेत.
माझ्यासाठी मुलांना शिकवणे म्हणजे फक्त पुस्तकातील गोष्टी सांगणे नाही, तर त्यांच्या मनातील विचार आणि भावना बोलून बाहेर आणणे आहे. मुलांनी जास्तीत जास्त बोलावे, प्रश्न विचारावेत आणि स्वतःचे अनुभव सांगावेत, यासाठी मी त्यांच्यासोबत सतत संवाद साधतो. या संवादातून त्यांच्या भाषेचा विकास होताना दिसतो आणि हाच समृद्ध भाषेचा पाया पुढे त्यांच्या वाचन-लेखनासाठी मजबूत होत जातो.
आमच्या वर्गाची सुरुवातही मुलांच्या छोट्या-छोट्या नियमांपासून होते. एक टाळी वाजली की मुलांनी हाताची घळी करून बसायचे—हा आमच्या वर्गाचा सोपा नियम! त्यानंतर गप्पांची वेळ. आज काय जेवण केले? कोणती भाजी होती? घरून किती पोळ्या खाऊन आलात? काही मुलं भरभरून सांगतात, तर काही अगदी थोडक्यात बोलतात. पण प्रत्येकाचं बोलणं महत्त्वाचं असतं. कधी कधी मुलं मलाही विचारतात, “सर, तुमने खाना खा लिया?” आणि मग माझं उत्तरही त्यांच्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं.
गप्पांनंतर गाणी, खेळ आणि वेगवेगळ्या कृती सुरू होतात. आज मुलांनी खूप उत्साहाने गाणी म्हटली. काही मुलं मोठ्याने गात होती, काही शांतपणे ऐकत होती; पण आनंद मात्र सगळ्यांच्याच चेहऱ्यावर होता. एका झाडाखाली बसून शिकताना मुलं वेगवेगळ्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत होती. अगदी छोटे-छोटे दगड गोळा करून प्रत्येकाने आपल्या गोठ्यासमोर उभं राहून फोटो काढण्याचीही हौस केली. “सर, फोटो डालो ना हमारी!” हा त्यांचा निरागस आग्रह मनाला आनंद देऊन गेला.
शिकण्यासोबतच मुलांना त्यांचं बालपण जगताही यावं, यासाठी आम्ही पारंपरिक खेळही खेळतो—“आपली तुपली, गुळाची पापडी, धम्मक लाडू…” अशा खेळांमध्ये मुलं मनसोक्त सहभागी होतात. या खेळांमधून त्यांना फक्त आनंद मिळत नाही, तर एकमेकांशी बोलणे, ऐकणे, आपले विचार व्यक्त करणे आणि आत्मविश्वासाने सहभागी होणेही शिकायला मिळते.
या मुलांसोबतचा प्रत्येक दिवस मला एक गोष्ट शिकवतो—शिक्षण हे फक्त वर्गात किंवा पुस्तकांमध्ये नसतं; ते गप्पांमध्ये, खेळांमध्ये, गाण्यांमध्ये आणि मुलांच्या छोट्या-छोट्या अनुभवांमध्येही असतं. आज माझी मुलं अधिक बोलकी होताना दिसतात आणि त्यांच्या या बदलात मला माझ्या प्रयत्नांचं खरं समाधान मिळतं.