Fellow Story –  Ashish Tekam
Fellow Story – Ashish Tekam

Fellow Story – Ashish Tekam

मी आशिष चोकाराम टेकाम, मूळचा नागपूर जिल्ह्यातील पालासावळी या छोट्याशा गावचा आहे. सध्या मी लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिप (2025–2027 cohort) चा फेलो असून कल्पकता एज्युकेशन फाउंडेशन, सिरसी येथे कार्यरत आहे.

लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपमध्ये येण्याआधी मी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत होतो. त्या काळात मला जाणवलं की लहान मुलांना शिकवणं म्हणजे जणू आपण आपलंच बालपण पुन्हा जगत असतो. मात्र कंत्राटी कार्यकाळ संपल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला पुढे काय? मला मुलांसोबतच काम करायचं होतं, पण कसं आणि कुठे, हे कळत नव्हतं.

अशातच सोशल मीडियावर मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपबद्दल माहिती मिळाली. ती मला माझ्यासाठी एक प्रकारची सुवर्णसंधी वाटली. अवघ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत फेलोशिपची निवड प्रक्रिया पार पडली.

जेव्हा मला कळलं की माझी निवड कल्पकता एज्युकेशन फाउंडेशन येथे झाली आहे, तेव्हा आनंद तर नक्कीच झाला; पण त्याचबरोबर मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले. मला तर लहान मुलांसोबत थेट शिकवण्याचं काम करायचं होतं, आणि कल्पकता वाचनालयात फक्त पुस्तकांची देवाणघेवाणच होत असेल, असा माझा गैरसमज होता. पण म्हणतात ना “Don’t judge a book by its cover.” हाच विचार मनात आणून मी फेलोशिप स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा शोध घेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. अगदी पहिल्याच दिवसापासून मला मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मुलांना शिकवताना मी स्वतःही अनेक नवीन गोष्टी शिकत गेलो. हे सगळं करत असताना माझा खरा आनंद नेमका कशात आहे, हे मला कळत गेलं.

फेलोशिप जॉईन केल्यापासून माझ्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत, मग ते pedagogy, वैयक्तिक विकास किंवा वैचारिक स्तरावर दिसून येत आहे. मुलांच्या भावविश्वात रमून, त्यांना हसत-खेळत शिकवणं आणि गरजेनुसार नवी कौशल्ये आत्मसात करणं, हे सगळं मला लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपमध्ये शिकायला मिळालं.

एकंदरीत सांगायचं झालं, तर माझ्यासारख्या सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होण्यामागे लर्निंग कंपॅनियन्स फेलोशिपचा फार मोठा वाटा आहे.

Learning Companions Fellowship 2026-28 ची निवड प्रक्रिया सुरु आहे.
अधिक माहितीसाठी खालील नोंदणी फॉर्म भरा.
https://forms.gle/TXu1BRXnMfU3fzg79

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *