फोटो बुलेटिन डिसेंबर २०२५
फोटो बुलेटिन डिसेंबर २०२५

फोटो बुलेटिन डिसेंबर २०२५

संकलन आणि संपादन  – निकिता देवासे

असोला – वाचनाची आवड लावणारा प्रवास

– मिनानाथ दडमल

आज मी बेड्यावरील काही मुलांना नागपूर बुक्स एक्झिबिशनला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हा केवळ एक प्रवास नव्हता, तर मुलांच्या आयुष्यात वाचनाची नवी दारं उघडणारा अनुभव ठरणार होता.

सुरुवात झाली मुलांच्या घरी जाण्यापासून. मी प्रत्येक मुलाला विचारलं, “नागपूरमध्ये होणाऱ्या बुक्स एक्झिबिशनला जायचंय का?” हा प्रश्न ऐकताच त्यांच्या डोळ्यात उत्साह चमकला. सगळ्यांनी एकाच आवाजात “हो!” म्हटलं. पण मला माहीत होतं मुलांची तयारी पुरेशी नव्हती; पालकांची परवानगी मिळणं तितकंच महत्त्वाचं होतं.

काही पालक सुरुवातीला संकोचलेले दिसत होते. त्यांची काळजी साहजिकच होती. मी त्यांच्याशी शांतपणे संवाद साधला. या कार्यक्रमातून मुलांना काय मिळेल, पुस्तकांची ओळख कशी होईल, वाचनाची आवड कशी वाढेल हे सगळं मी समजावून सांगितलं. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा संकोच कमी झाला.
काही पालकांचा तर प्रतिसाद खूपच सकारात्मक होता. “मुलांनी घराबाहेर जाऊन अशा गोष्टी अनुभवल्याच पाहिजेत,” असं ते म्हणाले. तो विश्वास आणि पाठिंबा मनाला खूप आनंद देणारा होता.

नंतर आजचा दिवस उजाडला. आम्ही सगळे बुक्स एक्झिबिशनला पोहोचलो. आजूबाजूला पुस्तकांचे स्टॉल, रंगीबेरंगी मुखपृष्ठं आणि वाचनाचं वातावरण यात मुलं हरखून गेली होती. स्टॉलवर फिरताना एखादं पुस्तक हातात घेऊन एखादं मूल आनंदाने म्हणायचं, “सर, हे पुस्तक आम्ही आधी वाचलंय!”
तो अभिमानाचा स्वर ऐकून मन भरून यायचं.

मुलांना खूप पुस्तकं घ्यायची इच्छा होती. मात्र पैशांची मर्यादा होती. त्यांनी थोडीच पुस्तकं घेतली, पण त्यांच्या डोळ्यांतला आनंद अमाप होता. पुस्तक हातात घेतल्यावर जणू त्यांना एखादा खजिना सापडला होता. घरी परतल्यावर त्यांनी घेतलेली पुस्तकं मला वाचून दाखवली. वाचताना त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता, चेहऱ्यावर आनंद होता. त्या क्षणी जाणवलं हा प्रवास खरंच सार्थकी लागला.

हा दिवस, हा अनुभव, आणि मुलांच्या डोळ्यांत चमकणारा आनंद हा सगळा अनुभव माझ्यासाठी कायमचा संस्मरणीय आणि अर्थपूर्ण ठरला.

Read more

चक्रिघाट  मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा निर्णय

– कोमल गौतम

चक्रीघाट बेड्यावरील लाला काका यांनी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने एक दूरदर्शी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला.

स्थलांतराच्या आयुष्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य राहात नव्हते. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केल्याने मुलांना शाळा आणि अभ्यासात स्थिरता मिळत नव्हती. हे लक्षात घेऊन लाला काकांनी चांपा येथे एका जागी थांबण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मुलांचे शिक्षण नियमितपणे सुरू राहील आणि ते मुख्य प्रवाहात येतील.

चांपा गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लाला काकांनी आपला बेडा स्थिर केला. या ठिकाणी आम्ही दोघे फेलो नवीनता आणि मी मुलांना शिकवण्यासाठी नियमितपणे जात आहोत. येथे आम्हाला शिक्षणाची एक नवी सुरुवात करावी लागली. दररोज मुलांचे वर्ग घेणे, त्यांच्यासाठी नवीन उपक्रम राबवणे आणि शिकण्याची आवड निर्माण करणे हे सर्व इथे शक्य झालं.

चक्रीघाट बेड्याच्या तुलनेत चांपा येथे मुलं अधिक एकाग्र आणि शिकण्यात सहभागी होताना दिसत आहेत. यामागचं प्रमुख कारण म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठीच त्यांना इथे थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे “आपण इथे शिक्षणासाठी थांबलो आहोत, तर आपण शिकायलाच हवं” ही भावना त्यांच्या मनात तयार होत आहे. चक्रीघाट बेड्यावर असताना मुलांचे वर्ग घेणे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. अनेक वेळा मुलं वर्गात येत नसत किंवा घरकामांमध्ये गुंतलेली असायची. अशा परिस्थितीत शिक्षणात सातत्य राखणं कठीण होतं. मात्र चांपा येथे चित्र पूर्णपणे वेगळं दिसून येत आहे.

आम्ही बेड्यावर पोहोचताच मुलं एका जागी गोळा होतात, आपापली कामं लवकर पूर्ण करतात आणि वेळेवर वर्गात सहभागी होतात. ही शिस्त आणि उत्साह मुलांच्या शिक्षणातील सकारात्मक बदल दर्शवतो. त्यांच्या शिकण्याच्या पातळीतही लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. या प्रक्रियेत पालकांचाही सक्रिय सहभाग दिसून येतो. लाला काका रात्री मुलांना गृहपाठ देतात, विशेषतः गणिताची उदाहरणं सोडवायला लावतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांची तपासणी करतात. पालक आणि शिक्षकांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे.

चांपा येथे सुरू झालेली ही शैक्षणिक वाटचाल केवळ मुलांच्या शिक्षणापुरती मर्यादित न राहता त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी ठरत आहे. ही नवी सुरुवात आशादायी असून पुढील काळात अधिक सकारात्मक बदल घडवेल, अशी खात्री वाटते.

Read more

ठणठण – जबाबदाऱ्यांच्या आड उमललेलं शिक्षण

– पल्लवी शंभरकर

रिद्धी तेरा वर्षांची आहे. तिच्या दिवसाची सुरुवात कामानेच होते आणि दिवसाचा शेवटही कामातच होतो.

सकाळी डोळे उघडताच तिच्यासमोर अभ्यासाची वही नसते, तर जबाबदाऱ्यांची यादी असते. घरकाम, जनावरांची काळजी, लहान भावंडांकडे लक्ष हे सगळं तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे.

ती ज्या समुदायात राहते, तिथे वयात आलेल्या मुलींना शिकायला जाण्याची परवानगी नसते. शिक्षण हे मुलींसाठी गरजेचं मानलं जात नाही. उलट, “आता जबाबदारी वाढली” असं म्हणून त्यांना घराच्या चौकटीत अडकवलं जातं. मुलींचं आयुष्य लहानपणापासूनच काम, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेलं असतं. घर, गाई, वासरं हाच त्यांचा रोजचा संसार असतो. शिकणं हे स्वप्न असतं, पण वास्तव मात्र वेगळंच असतं.

रिद्धी दररोज वासरांना चारायला नेते. ऊन असो, पाऊस असो काम थांबत नाही. वेळ तिचा नसतो. तिचा दिवस तिच्या इच्छेनुसार नाही, तर कामाच्या गरजेनुसार चालतो. तरीही या सततच्या कामाच्या ओघातून ती थोडासा वेळ काढते हा वेळ तिने कुणाकडून मागितलेला नसतो; तो तिने स्वतःसाठी मिळवलेला असतो.

रिद्धीसाठी शिकणं म्हणजे ठराविक वेळ, ठराविक जागा किंवा ठराविक तासांची गोष्ट नाही. संधी मिळेल तेव्हा, जिथे मिळेल तिथे ती शिकते. वासरं चारत असताना जेव्हा ती मला पाहते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच उजाळा येतो. ती वासरांना एका ठिकाणी थांबवते, जवळची वही आणि पुस्तक काढते. पंधरा- वीस मिनिटांत जेवढं मिळेल तेवढं शिकते. मध्ये-मध्ये वासरांकडे लक्ष देते, पुन्हा वहीकडे वळते. तिची नजर कधी पुस्तकावर, कधी जबाबदाऱ्यांवर असते. पण दोन्ही काम सांभाळण्याचा तिचा प्रयत्न सतत सुरू असतो.

तिला माहीत आहे. आज नाही शिकलं, तर उद्या पुन्हा कामच असणार आहे. वेळ थांबणार नाही, पण शिकायचं थांबवलं तर तिचं स्वप्न मागे पडेल. रिद्धीला कुणी जबरदस्तीने शिकायला बसवलं नाही. कोणी तिला “शिकायलाच हवं” असं सांगितलेलं नाही. तरीही तिची शिकण्याची इच्छा खूप खोलवर रुजलेली आहे. ती आतून येते स्वतःसाठी काहीतरी करण्याची, स्वतःला बदलण्याची.

आज रिद्धी A, E, I, O, U या सर्व स्वरांवरचे CVC शब्द वाचू आणि ओळखू शकते. cat, bat, pen, sit, top, run हे शब्द तिने शाळेच्या वर्गात बसून नाही, तर कामाच्या मधल्या त्या पंधरा- वीस मिनिटांत शिकले आहेत. हे शब्द दिसायला छोटे असले तरी तिच्यासाठी ते आत्मविश्वासाचं मोठं पाऊल आहेत. प्रत्येक शब्दासोबत तिचा आत्मविश्वास थोडा वाढतो, आणि तिचं स्वप्न थोडं जवळ येतं.

ही कथा फक्त रिद्धीची नाही. अनेक रिद्धी आजही कामाच्या ओझ्याखाली शिकण्याची छोटी-छोटी दारं शोधत आहेत. संधी मिळाली, थोडी साथ मिळाली, तर कोणत्याही परिस्थितीतून शिकणं शक्य आहे हे रिद्धी रोज, शांतपणे पण ठामपणे दाखवून देते.

Read more

सोनखांब – पालक सभा

– प्रीतम नेहारे

वर्ष संपत चाललं आहे आणि बदल घडत आहेत. काम किती झालं, काय झालं हे सगळेच पाहतात; पण नेमकं पालकांना त्यांच्या मुलांना काय यायला पाहिजे आणि काय नाही, हे ठरवणं खरंच कठीण असतं.

मी आतापर्यंत अनेक पालक सभा घेतल्या आहेत; मात्र ही पालक सभा माझ्यासाठी वेगळी आणि अर्थपूर्ण ठरली.

या सभेत मी पालकांना विचारलं की गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या मुलांमध्ये कोणते चांगले बदल जाणवले. उत्तरं जरी थोडी तुटक-फुटक होती, तरी ती खूप काही शिकवणारी होती. लहान मुलांमध्ये होत असलेला बदल स्पष्टपणे दिसत होता. मुलं लिहायला आणि वाचायला लागली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या दीड वर्षांची मुलंही शाळेत येऊन नीट बसतात, खेळतात आणि वातावरणाशी जुळवून घेतात.

हे काम करताना वर्षं झाली आहेत. जुलैपासून सुरू झालेला हा प्रवास आता कुठेतरी थांबणार आहे, अशी जाणीव काही दिवसांपासून होत आहे. इथे शिकलेली प्रत्येक गोष्ट आठवत आहे. प्रत्येक क्षण अधिकाधिक अविस्मरणीय वाटत आहे.

तब्बल दीड तास पालक सभा चालली. तेव्हा एक दीदी लगेच म्हणाल्या, “भैया, हमें तुम पर विश्वास नहीं है क्या?” मी त्यांना सांगितलं, “नाही दीदी, तसं नाही. पण आपण जे काम करतो, त्याबद्दल सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारायलाच हवं. प्रश्न विचारल्यावरच कामाला गती येते आणि काम अधिक परिणामकारक होतं.”

पण पालक इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, “भैया, आमच्या मुलांना सगळं वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. मुलांनी भांडण करू नये.” मी त्यांना समजावलं की, “दीदी, आपण मुलांना असं वातावरण देतो जिथे त्यांना स्वतःच्या गरजा कळायला हव्यात. एखादी गोष्ट किंवा वस्तू हवी असल्यास ते मागतात, कधी भांडतातही. हाच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा भाग आहे. ”त्यावर ते म्हणाले, “हा भैया, पर हमारी बात समझने को होना।” पालकांच्या अपेक्षा इथे संपत नाहीत, त्या हळूहळू वाढत जातात. पालकांनी मुलांच्या वह्या तपासल्या. जानवी, जी आधी लिहायला टाळाटाळ करायची, ती आता लिहू लागली आहे. धुळी, विशाल यांसारखी मुलं, जी आधी फक्त अक्षरं वाचायची, ती आता मात्राही वाचू लागली आहेत.

एका गोष्टीवरून तक्रारही आली होती. पण जानवीने आधीच मला सांगितलं होतं, “भैया, आज मैंने मोबाइल देखा, पढ़ाई नहीं की।” पालक सभा संपल्यानंतर जानवीची आई मला म्हणाली, “भैया, मेरी लड़की कुछ नहीं करती, थोड़ा समझाओ।” मी त्यांना सांगितलं, “दीदी, ही गोष्ट जानवीने आधीच मला सांगितली आहे.”

अशा गमतीदार आणि मजेदार प्रसंगांमधून हा प्रवास घडत आहे. पालक आता अधिक सजग झाले आहेत, हे स्पष्टपणे जाणवत होतं. या सभेत आपुलकी, प्रेम आणि काळजी यांचा अनुभव आला. वर्ष पुढे सरकत आहे आणि हा प्रवास कुठेतरी विराम घेणार आहे, अशी भावना मनात येत होती. मुलांशी माझी जवळीक वाढत आहे आणि मीही त्यांचा अधिक होत चाललो आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला कदाचित एक वर्षही अपुरं पडेल, अशी शिकवण मला इथे मिळत आहे.

कळत नकळत आपण त्यांच्या आयुष्याचा भाग बनलो आहोत. काम भरपूर केलं, तितकीच फजितीही झाली. पण हा प्रवास अजून पूर्ण व्हायचा आहे. गमती-जमती अजून बाकी आहेत.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *