संकलन आणि संपादन – निकिता देवासे
चक्रीघाट – मुलांना मिळाली शिकायची नवी वाट
– कोमल गौतम

चक्रीघाट बेड्याचे स्थलांतर झाल्यानंतर काही बेडे चांपा या गावाजवळ येऊन राहत आहे.
त्यातील काही मुलं आपल्या कुटुंबासोबत चांपा येथे राहतात, तर काही मुलं अजूनही आपल्या आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर फिरत आहे. चांपा गावात मुलांना नियमित शिकवायला सुरुवात केल्यापासून त्यांच्या वागण्यात आणि शिकण्यात सकारात्मक बदल दिसू लागला आहे. मुलं आता नियमितपणे वर्गात बसत आहे, लक्ष देऊन शिकताना दिसत आहे आणि दिलेला अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. हळूहळू त्यांचा आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे. मात्र जी मुलं अजूनही आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर आहे त्यांच्यात असा बदल दिसत नाही आहे.
सव्वा हा सध्या त्याच्या आजी आजोबासोबत चांप्याला राहत आहे. आणि त्याचा लहान भाऊ जगदीश अजूनही आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर राहतो. सव्वा आधी अभ्यासात रस घेत नव्हता आणि वर्गातही नीट बसत नव्हता. पण सध्या त्याच्यात बराच बदल दिसून येत आहे. तो नियमितपणे वर्गात बसत आहे, लक्ष देऊन शिकतो आहे आणि स्वतःहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतांनी दिसत आहे. शनिवार-रविवार सुट्टी असताना जेव्हा त्याचे वडील त्याला स्थलांतरित बेड्यावर घेऊन जातात, तेव्हा तो तिथे दुधाचा हिशोब करतानाही दिसतो. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनाही शिक्षणाचे महत्त्व समजू लागले आहे.
जगदीशच्या बाबतीतही अशीच एक गोष्ट घडली. त्याला चंपा येथे शिकायला पाठवण्यासाठी आम्ही त्याच्या आईला वारंवार सांगत होतो, पण सुरुवातीला त्यांनी त्याला शाळेत पाठवले नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्या स्थलांतरित झालेल्या बेड्यावर भेट दिली तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. जगदीशला शिक्षणाची संधी मिळाली नाही तर त्याचे किती नुकसान होऊ शकते, हे उदाहरण देऊन समजावून सांगितले.
या संवादानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी जगदीशला शिकण्यासाठी चांप्याला पाठवले. आता त्यालाही शिकण्याची संधी मिळत आहे. पुढे त्याच्यातही सकारात्मक बदल दिसतील, अशी आशा आहे.
असोला -पुन्हा शिकण्याची नवी सुरुवात
– जीवन ढोक

किसन हा दहावीमध्ये शिकत आहे; मात्र घरच्या काही जबाबदऱ्यांमुळे गेली दोन वर्षे तो नियमितपणे शाळेत जात नव्हता. त्यामुळे त्याचा अभ्यास खूप मागे पडला होता.
शाळेत नियमित उपस्थिती नसल्यामुळे शाळेतल्या अभ्यासातील अनेक गोष्टी त्याला समजत नव्हत्या. सुरुवातीला त्याला दहावीच्या परीक्षेबद्दल भीती वाटत होती आणि त्याला पुढे काय करायचं याबद्दल गोंधळ वाटत होता. परीक्षा देता येईल का, आपल्याला जमेल का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात भीती घालत होते.
मात्र त्याच्याशी सातत्याने संवाद साधत हळूहळू त्याला समजावून सांगितले की, प्रयत्न केल्यास आणि थोडी मेहनत घेतल्यास नक्कीच जमू शकते. त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला दररोज शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि नियमितपणे अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. हळूहळू त्यानेही अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
तो शाळेत नियमित जात नव्हता, पण माझ्या बेड्यावर घेतलेल्या क्लासमध्ये तो बऱ्याचदा उपस्थित असायचा. त्या क्लासमध्ये मी त्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांची पुस्तके वाचायला आणि व्यावहारिक गणिताची उदाहरणे सोडवायला दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचे मागील काही वर्षांचे प्रश्नपत्रिका त्याला सोडवायला दिल्या. मी स्वतः त्याच्या जवळ बसून त्याला समजावून सांगितले आणि त्याच्याकडून त्या प्रश्नांचा सराव करून घेतला. त्याला लहान-लहान उद्दिष्टे देत आणि ती पूर्ण केल्यावर त्याचे कौतुक करत त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.
आज तो आत्मविश्वासाने दहावीचे पेपर देत आहे. “सर, तुम्ही शिकवत आहात म्हणून मला थोडं समजू लागलं आहे,” असे तो म्हणाला. दोन वर्षे शाळेत न गेल्यामुळे सुरुवातीला त्याला अनेक अडचणी येत होत्या; पण आता तो हळूहळू अभ्यासात रस घेऊ लागला आहे. विशेषतः मराठी वाचन आणि समजून घेण्यात त्याची प्रगती दिसून येत आहे. आता तो अधिक लक्ष देऊन ऐकतो, वाचण्याचा प्रयत्न करतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
किसनचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी पुन्हा शिकण्याच्या प्रवाहात येऊ शकतात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांना साथ दिली, मुलांमध्ये आत्मविश्वासा निर्माण होऊ शकतो.
पुढील दिवसांमध्येही किसनला आणि इतर मुलांना अशाच प्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न राहील, जेणेकरून तेही शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतील.
ठणठण – झाडाखालील वर्ग – शिकण्याचा नवा अनुभव
– प्रगती बांडेबूचे

ठणठण येथून बेडा स्थलांतरित झाल्यानंतर तो कळमना गावाजवळ स्थलांतरित झालेला आहे. त्या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी आमच्याकडे नियमित वर्गखोली आणि काही साधने उपलब्ध नव्हती.
मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही झाडाखालीच एक ओपन क्लासरूम सुरू केली.
झाडाच्या सावलीत मुलांना बसवून शिकवताना वर्ग अधिक आकर्षक कसा करता येईल, याचा आम्ही विचार केला. त्यासाठी आम्ही झाडांवर विविध शब्दकार्ड, चित्रे आणि शैक्षणिक पोस्टर बांधले. झाडच आमच्या वर्गाचा जणू भिंत आणि फळा बनला आणि त्या माध्यमातून मुलांसाठी एक वेगळी शिकण्याची जागा तयार झाली.
या अॅक्टिव्हिटीमध्ये मुलांना झाडावर लावलेले शब्द वाचायला, शब्द शोधायला आणि त्या शब्दांपासून नवीन शब्द तयार करायला सांगितले. काही वेळा मुलांना त्या शब्दांपासून छोटे वाक्य तयार करायला देखील सांगितले. त्यामुळे मुलांनी खेळत-खेळत वाचनाचा सराव सुरू केला.
या प्रक्रियेत मुलांचा उत्साह खूप वाढला. मुलांना ही नवीन पद्धतीने शिकण्याची पद्धत खूप आवडली. ते झाडाजवळ जाऊन स्वतः शब्द वाचू लागले, एकमेकांना शब्द दाखवू लागले आणि नवीन शब्द तयार करण्याचा प्रयत्न करू लागले.
यामध्ये किसन हा विशेष उत्साहाने सहभागी होत होता. तो रोज झाडावर लावलेले शब्दकार्ड वाचते. इतकेच नाही तर सुट्टीच्या दिवशी देखील तो येऊन ते शब्द वाचत होता. त्यामुळे हळूहळू त्याला नवीन शब्द समजू लागले आणि तो त्या शब्दांपासून छोटे वाक्य तयार करू लागला. या उपक्रमामुळे मुलांसाठी झाडाखालील ही जागा जणू एक लायब्ररीच बनली. मुलांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते तिथे जाऊन कार्डवरील शब्द वाचतात.
या अनुभवातून असे दिसून आले की, मर्यादित साधने असली तरीही थोड्या कल्पकतेने आणि उत्साहाने मुलांचे शिक्षण प्रभावीपणे करता येते. झाडाखालील ही ओपन क्लासरूम मुलांसाठी शिकण्याचा एक आनंददायी आणि वेगळा अनुभव ठरला आहे.
इंटर्नशिप – एक परिवर्तनाचा प्रवास
निकिता, निखिल

सध्या इंटर्नशिप प्रोग्राम ची ४ थी बॅच सुरू आहे. या प्रोग्रामला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला Batch 1 मध्ये जवळपास 10 interns सहभागी झाले. या interns साठी हा अनुभव पूर्णपणे नवीन होता.
अनेकांना सुरुवातीला English communication, confidence आणि कामाची सवय या गोष्टींमध्ये अडचणी येत होत्या. तरीही त्यांनी शिकण्याची तयारी ठेवून या प्रवासाची सुरुवात केली.
यानंतर Batch 2 मध्येही 10 interns आणि Batch 3 मध्ये 12 interns सहभागी झाले. प्रत्येक batch सोबत आमचा approach अधिक स्पष्ट आणि मजबूत होत गेला. या प्रवासात Batch 4 मध्ये अचानक मोठी वाढ झाली आणि जवळपास 30 interns या कार्यक्रमात सहभागी झाले. ही वाढ फक्त संख्येत नव्हती, तर program बद्दलचा विश्वास आणि प्रभावही दर्शवत होती.
या संपूर्ण प्रवासात आमचा मुख्य भर interns ना सक्षम (empower) करण्यावर होता. त्यांच्या skills आणि कामाच्या quality वर सातत्याने काम करण्यात आले. इंग्रजी सुधारण्यासाठी आम्ही Speaking Club सुरू केला, जिथे interns ना नियमित बोलण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर दररोज छोटे-छोटे tasks देऊन त्यांच्या सरावावर भर दिला गेला, ज्यामुळे त्यांचा confidence हळूहळू वाढू लागला.
आम्ही interns ना ecosystem मधील placement opportunities सुद्धा उपलब्ध करून दिल्या. या संधींचा चांगला उपयोग करत 3 interns ची placement झाली, तसेच 6 interns CLR च्या English Project साठी निवडले गेले. ही यशस्वी उदाहरणे इतर interns साठीही प्रेरणादायी ठरली.
या संपूर्ण journey मध्ये interns नी ownership, teamwork, interdependency आणि observation यांसारख्या महत्त्वाच्या गुणांचा विकास केला. सुरुवातीला जे interns थोडे संकोचत होते, तेच पुढे जाऊन जबाबदारी घेऊ लागले, एकमेकांना मदत करू लागले आणि टीम म्हणून काम करू लागले.
त्याचबरोबर त्यांनी English language आणि communication skills मध्येही चांगली प्रगती केली. नियमित सराव, feedback आणि supportive environment यामुळे त्यांच्यातील बदल स्पष्टपणे दिसून येऊ लागला.
एकूणच, हा इंटर्नशिप प्रोग्राम फक्त शिकण्यापुरता मर्यादित न राहता interns ना स्वतःवर विश्वास ठेवणारे, जबाबदारी घेणारे आणि पुढील संधींसाठी तयार करणारे एक मजबूत व्यासपीठ ठरला. हा प्रवास केवळ कौशल्यविकासाचा नव्हता, तर व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.