संकलन आणि संपादन – निकिता देवासे
चक्रीघाट – चक्रीघाट : धैर्य, संघर्ष आणि आशा
– नवींता डोंगरे

चक्रीघाट बेडे स्थलांतरित झालेले आहेत. त्यांच्या जीवनस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि मुलांना भेटी देण्यासाठी आम्ही migration visit साठी निघालो. चक्रीघाट बेडा गावापासून खूप दूर, दाट जंगलामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे तिथे पोहोचणे आमच्यासाठी सोपे नव्हते. आम्ही दुपारी प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात अनेक अडचणीनी आल्या. त्यांना सामोरे जात अखेर रात्री आठ वाजता आम्ही तिथे पोहोचलो.
रस्त्यातील प्रवास खूप भीतीदायक होता. जंगलातील अंधार, शांतता आणि अधूनमधून दिसणारे प्राणी यामुळे भीती जरा जास्तच वाटत होती. एका ठिकाणी तर आमच्या गाडीसमोर अचानक जंगली डुक्कर आला आणि काही वेळ तो रस्ता सोडायलाच तयार नव्हता. त्या वेळी मनात भीती वाढत चालली होती. थोड्या वेळाने त्या डुक्करणे रस्ता सोडला आणि आम्ही सुरक्षितपणे पुढे निघालो. बेड्याचा रस्ता शोधताना बराच वेळ गेला, कारण बेडा मुख्य गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर आत जंगलामध्ये होता. शेवटी आम्ही तिथे पोहोचलो, पण उशीर झाल्यामुळे फारस्या लोकांना भेटू शकलो नाही. त्यामुळे आम्ही रात्री बेड्यावरच थांबण्याचा विचार केला.
मध्यरात्री अचानक गायी उठून उभ्या राहिल्यामुळे जवळ एखादा प्राणी आला असावा असा भास झाला. काही वेळ खूप तणाव वाटत होता. पण नंतर सर्व काही शांत झाले. सकाळ होताच आम्ही प्रत्येक घरी भेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मुलांना worksheet दिल्या. त्या वेळी जसू दीदी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिति सांगत होत्या. गायी-वासरांसह सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागते , थांबण्यासाठी जागा मिळत नाही, पाण्याची सोय बघावी लागते, अशा अनेक संकटांना त्यांना रोज सामोरे जावे लागते. कधी कधी दिवसभर भटकंती करूनही राहण्यासाठी जागा मिळत नाही आणि शेवटी शेताच्या कडेला किंवा रस्त्याच्या बाजूला थांबावे लागते. तरीही त्या धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करत राहतात.
याच भेटीदरम्यान मला तेजलची आई भेटली. नुकतेच दीड महिन्याचं बाळ झालेलं असताना एवढ्या कठीण परिस्थितीत सतत प्रवास करणे तिच्यासाठी अत्यंत अवघड होते. स्वतःचा थकवा, बाळाची काळजी, घरची जबाबदारी, इतर मुलांची देखभाल आणि गायींची कामे हे सर्व ती शांतपणे सांभाळत होती. तिचा संघर्ष पाहून मन अक्षरशः हेलावून गेले. हे सगळ ऐकून आम्हाला रस्त्यात आलेली अडचणी खूप कमी वाटत होती.
मात्र मुलांना भेटल्यावर वातावरणात वेगळाच उत्साह जाणवला. ते आपल्या अनुभवांबद्दल आनंदाने बोलत होते जंगलातील प्राणी पाहणे, नवीन ठिकाणी जाणे, सतत बदलणारे आयुष्य अनुभवणे… या सगळ्यातूनही ते आनंद शोधत होते. कठीण परिस्थितीतही त्यांचे धैर्य आणि जगण्याची जिद्द खरोखर प्रेरणादायी होती.
हा संपूर्ण अनुभव आमच्यासाठी अत्यंत वेगळा, भावनिक आणि विचार करायला लावणारा होता. जंगलाच्या आत, मूलभूत सोयी-सुविधांपासून दूर राहूनही बेड्या -वरील लोक आशा, धैर्य आणि जिद्दीच्या बळावर जीवन जगत आहेत हे प्रत्यक्ष पाहणे हीच आमच्यासाठी मोठी शिकवण होती. त्यांच्या संघर्षाने मनाला स्पर्श केला आणि समाजातील अशा दुर्लक्षित जीवनाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची जाणीव करून दिली.
सोनखांब – शिकण्याचा आनंद आणि प्रयत्नांची नवी सुरुवात
– प्रीतम नेहरे

आज नवीन Qwater सुरू होऊन गणित शिकवण्याचा पहिलाच दिवस असला तरी सगळ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली. सुरुवातीला मी त्यांना वास्तव जीवनाशी संबंधित काही शाब्दिक गणिते दिली. प्रत्येकाने स्वतःहून गणिते सोडवण्याचा प्रयत्न केला. काही उत्तरे बरोबर आली, काही चुकली; मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित स्वतः सोडवण्याची उस्तुकता त्यांच्या मनात निर्माण होताना दिसत होती.
अजय मला गणित दाखवण्याच्या आधी एकच गणित दोनदा सोडवून पाहत होता. त्याला पाढ्यांमध्ये थोडी अडचण आली; पण त्यानंतर त्याने स्वतः पंधराचा पाढा तयार करून ते गणित सोडवले.
तेजलनेही गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. तिचे उत्तर जवळजवळ बरोबर येत होते; पण प्रश्न नीट न समजल्यामुळे ती थोडी गोंधळली. प्रश्न स्पष्ट समजला असता तर तिला नक्कीच जमलं असतं. तरीही तिचा प्रयत्न खूप चांगला होता. त्यानंतर मी तेजल आणि जय यांच्यासाठी वेगळं गणित दिलं आणि कोण आधी गणित सोडवेल दोघांमध्ये समोरासमोर स्पर्धा ठेवली. या टक्करमध्ये दोघांनीही खूप छान व लवकर गणिते सोडवली.
“दादा, गुणाकार दे, मी करून दाखवते,” असं म्हणत तेजलने आज चार गणिते सोडवली. स्वतः समजून घेण्याच्या दिशेने तेजलचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. तिचा शिकण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. ती सतत नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते. ती शिस्तबद्ध आणि आत्मप्रेरित असून बदललेल्या परिस्थितीत स्वतःला सहज जुळवून घेते. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ती समजून घेण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तिच्या कामात समतोल दिसून येतो.
याचबरोबर मी पहिली ते दुसरीच्या स्तरातील सोपी गणिते फळ्यावर लिहिली. विशाल आणि मयूर या दोघांनी ती गणिते अतिशय पटकन सोडवली. त्यांचा उत्साह इतका वाढला की ते अजून गणिते मागण्यासाठी स्वतःहून पुढे आले. विद्यार्थ्यांच्या या शिकण्याच्या आनंदाने वातावरण अधिकच प्रेरणादायी बनले.
आजची ही गणिते फक्त आजच्या दिवसापुरती नव्हती. उद्या पुन्हा नवीन गणिते, नवीन आव्हाने आणि ती सोडवण्याची नवी शर्यत नक्कीच रंगणार आहे.
ठणठण – नव्या आशेची पालकसभा
– डेविड सूर्यवंशी

आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण शाळेत पालकसभा आयोजित करण्यात आली होती. सर्व दीदींना त्यांच्या घरी जाऊन बोलावून घेतले. एकत्र आल्यानंतर वातावरण खूप आनंदी व उत्साहपूर्ण झाले होते. सुरुवातीला आम्ही दीदी लोकांना treasing च्या workheet दिल्या. आणि यात खूप वेगळी गोष्ट म्हणजे आम्ही या पालक सभेत त्यांच्या सही घेतल्या. त्या एकमेकांकडे पाहत सही करत होत्या. नंतर त्यांच्यासोबत एक अॅक्टिविटी घेतली त्यात त्यांना आकार च्या माध्यमातून भैय्यालोकांची चित्रे काढायची होती. खूप आनंदाने त्या या एकटीविटी मध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि हा आनंद सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यानंतर मी आणि प्रगतीने सर्व दिदीला मुल वाचायला कशी शिकलेली आहे, आणि मुले आता इंग्लिश वाचायला शिकत आहे. लहान मुले हिंदीतील शब्द वाचत आहे. यासोबत माहीने सगळ्यांसमोर वाचून दाखविले. सगळ्यांनी मिळून माहीचे व बाकी मुलांचे कौतुक केले.
आम्ही त्यांना प्रश्न केला की, तुम्हाला मुलांमध्ये कोणते बदल होतांना दिसत आहे हे विचारल्यावर रेखा दीदी सांगत होत्या की, आमची मुले खूप चांगल्या प्रकारे शिकत आहे. प्रगती मॅडम आणि सर तुम्ही आल्यापासून मुलांमध्ये खूप बदल दिसू लागला आहे. आता मुले मन लावून शिकत आहेत आणि त्यांच्या सोबतच आम्हालाही शिकण्याची संधी मिळत आहे. अक्षर काय असत, शब्द कसे तयार होतात आणि वाचायचे कसे, हे शिकण्याची त्यांची खूप उत्सुकता दिसून येत होती.
काली दीदी म्हणाल्या की, घरची खूप कामे असतात. तरीही सगळी कामे पूर्ण करून आम्ही शिकण्यासाठी नक्की येऊ, कारण आता शिकण्याची गोडी लागली आहे. वाली दीदींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्या म्हणाल्या की, आधी माहीला काहीच येत नव्हते. पण आता ती वाचायला शिकत आहे, हे पाहून खूप आनंद होतो.
मनिषा दीदींनीही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या रिंकूने आता खूप चांगले वाचायला सुरुवात केली आहे. ती स्वतःची कामे पूर्ण करून शिकायला जाते, हे पाहून त्यांना अभिमान वाटतो.
आज सर्व दीदींनी स्वतःच्या हाताने आपले नाव लिहिले आणि सर्वांनी मिळून आपल्या पतीचे चित्र काढले. सगळ्यांना खूप मजा आली. अशा प्रकारे शिकण्यात खूप आनंद मिळतो, आणि वेळ मिळाला तर आम्ही नक्की येऊ, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की शिक्षण फक्त मुलांसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. जेव्हा शिक्षक प्रेमाने शिकवतात आणि पालकही त्या प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा शिकणे आणि शिकवणे आनंददायी बनते. आज प्रत्येकाच्या डोळ्यांत आशा होती, चेहऱ्यावर हसू होते आणि मनात पुढे आणखी शिकण्याची प्रेरणा होती. ही पालकसभा म्हणजे नव्या स्वप्नांची, आत्मविश्वासाची आणि उज्ज्वल भविष्यातील सुंदर सुरुवात होती.
असोला – नितेशचा पुन्हा शाळेकडे प्रवास
– प्राची बोरेकर

नितेश हा वर्गातील चंचल, हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. तो पहिल्या वर्गात शिकतो. वर्गात तो नेहमी जे काही शिकवल्या जाते ते ऐकतो, काही समजले नाही तर प्रश्न विचारतो आणि दिलेला अभ्यास करतो. पण आता बऱ्याच दिवसापासून तो शाळेत नाही येत आहे. मी मुलांजवळ चौकशी केली पण खर कारण नेमकं काय आहे हे कळलं नाही. त्यामुळे तो शाळेत येत नसल्याने मला काळजी वाटू लागली. गेल्या दोन दिवसांपासून मी शाळेत जातांनी त्याला रोज आवाज देत होते. आणि त्याची चौकशी करत होते. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आज मी स्वतः त्याच्या घरी जाण्याचा विचार केला. त्याच्या घरी गेल्यावर मी त्याच्याशी आणि त्याच्या पालकांशी संवाद साधला. नितेश सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. तो थोडा संकोचलेला दिसत होता. शाळेत न येण्यामागचं कारणनही तो सांगत नव्हता. शाळेत येण्याबाबत त्याने थोडी हट्टाची भूमिका घेतली होती आणि तो येण्यास तयार नव्हता.
मी त्याला शांतपणे समजावून सांगितले की, शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नसून मित्रांसोबत खेळणे, गप्पागोष्टी करणे. नवीन गोष्टी शिकणे आणि समोर मोठ होऊन काहीतरी वेगळ करून दाखवण्याची संधी आपल्यालाला इथे मिळते. मी त्याला त्याच्या मित्रांची आठवण करून दिली, वर्गात होणाऱ्या मजेदार उपक्रमांविषयी सांगितले आणि तो वर्गात किती छान सहभाग घेतो याची जाणीव करून दिली.
माझा समजावण्याचा त्याच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाला. हळूहळू तो बोलायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसू लागला. तो म्हणाला, “रुको मॅडम मै अभी स्कूल के कपडे पहेनकर आता हू”। काही वेळातच त्याने शाळेची तयारी केली आणि माझ्यासोबत शाळेत यायला तयार झाला. शाळेत येताना तो आनंदाने म्हणाला, “मॅडम, मै अभी रोज स्कूल आऊंगा और अच्छे से पढाई करूंगा” हे ऐकून मला खूप छान वाटत होते. समाधान वाटत होते.
शाळेत आल्यानंतर सुरुवातीला तो थोडासा घाबरलेला होता. तो थोडा रडलाही; पण मी त्याला समजावले त्याचे काही मित्र पण माझ्यासोबत त्याला समजावत होते. काही वेळात आम्ही बालगीत म्हणायला सुरुवात केली. तो आनंदाने वर्गात सहभागी झाला आणि नेहमीप्रमाणे उपक्रमांमध्ये भाग घेऊ लागला.
हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आणि प्रेरणादायी होता. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केल्यास त्यांच्या मनात शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते आणि त्यांच्या शिक्षणप्रवासात सकारात्मक बदल घडवता येतो, याची जाणीव या प्रसंगातून झाली. अशा प्रत्येक छोट्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला.