फोटो बुलेटिन नोव्हेंबर २०२५
फोटो बुलेटिन नोव्हेंबर २०२५

फोटो बुलेटिन नोव्हेंबर २०२५

संकलन आणि संपादन  – निकिता देवासे

चक्रिघाट  शिकण्याची ओढ

– नविनता डोंगरे

मी मालीला प्रथम बेड्यावर भेटले होते. माली तेरा वर्षांची असून तिच्या डोळ्यात शिकण्याची ओढ दिसत होती.

सुरुवातीला मी pre-primary ला शिकवत असल्यामुळे ती माझ्याशी फारशी बोलायची नाही. आम्ही तिच्या घरी नेहमी जात असू, तिच्या घरी गेल की ती दररोजच्या वापरात येईल असे प्रश्न ती मला आणि कोमल ताईला विचारायची. त्यावर आम्ही तिला म्हणायचो ”तुला जमेल तो वेळ काढ, आम्ही शिकवू तुला”.

मालीचा दिवस खूप व्यस्त असतो. सकाळी उठून घरची धुनी, भांडी करणे, मग गाईंना चारा देणे. शेण उचलणे ही सगळी तिची दिवसभराची कामे असते. काही दिवसापासून हळूहळू परिस्थितीत बदल दिसत आहे. आणि आता ती दिवसभराची कामे करूनही ती दुपारी वेळ काढून माझ्याकडे शिकायला येते. क्लासमध्ये ती तिच्या भाऊ-बहीणींसोबत बसते.

तिला भाषा आणि गणित शिकायचं आहे. ती नेहमी सांगते,“मॅडम, हम जब बाजार में जाते हैं ना, तो मुझे गिनती आनी चाहिए कितना सामान हुआ, कितने रुपये देने हैं, और कितने वापस लेने हैं.”ती कधीकधी असंही विचारते, “मॅडम, मेरे को आयेगा क्या? मै कर पाऊँगी? मेरे से होगा ना?”
तेव्हा मी तिला समजावते, “माली, तुला येतं. फक्त नियमित प्रॅक्टिस कर. आता ती भाषा आणि गणित दोन्ही समजू लागली आहे. तिची पावले हळूहळू पुढे जात आहेत.

मालीची आईही आता म्हणायला लागली आहे,
“मॅडम, मेरी माली को अच्छे से पढ़ाना. वो घर पर भी पढ़ती है । और होमवर्क करती है।”
हे ऐकून मला खूप आनंद होतो. पालकांना माझ काम दिसत आहे की, मी तिला कश्याप्रकारे शिकवत आहे तिच्यात कसा बदल होत आहे, आणि हे सर्व मला समाधान देत आहे. ती नेहमीच विचारते,
“मेरे को आयेगा मॅडम? आज मै कर पाई क्या?”
मी तिला नेहमी सांगते, “जितकी प्रॅक्टिस करशील तितकं तुला येईल.”

आता तिची शिकण्याची जिद्द दिसत आहे. ती बऱ्याच शब्दांचे वाचन करते, नवीन कल्पना सांगते. तिचं पुस्तक वाचणं, कथा ऐकणं, शब्द लिहिण्याचा प्रयत्न सगळं ती स्वतःहून करते. मी दिलेला गणिताचा अभ्यास पूर्ण करून दाखवते. तिचा हा प्रयत्न पाहून खूप छान वाटत आहे. तिच्या मेहनतीतून दिसतं की तिची जिद्द नक्कीच तिला पुढे घेऊन जाईल.

Read more

सोनखांब- सोनखांब सेंटरमध्ये TFI टीमची प्रेरणादायी भेट

– प्रीतम नेहारे 

आज सोनखांब सेंटरला TFI टीमने भेट दिली. या क्षणाची आम्ही सगळेच वाट पाहत होतो. सकाळपासूनच सेंटरमध्ये एक खास हलकल्लोळ जाणवत होता.

मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती, आणि आमच्या मध्ये त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. तर समुदायातील वडील मंडळी व महिलांमध्ये एक वेगळीच आपुलकी जाणवत होती. बेड्यावरील शिक्षणाबद्दलची विचारसरणी आणि मुलांच्या शिकण्याबद्दलचा आत्मविश्वास हे सगळं त्यांना दिसावं, अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा होती.

साऱ्या तयारीत रतन दीदींची भूमिका खासच होती. आज त्यांचे वैयक्तिक महत्त्वाचे काम असूनही, सेंटरवर कोणी भेट देत आहे म्हणून त्या स्वतः थांबल्या. आजच्या दिवसाची त्यांची जबाबदारी जणू दुप्पट वाढली होती. स्वयंपाक, व्यवस्था, पाहुणचार… सगळं त्या अगदी मनापासून करत होत्या. मुलांसाठी आणि समुदायासाठी ही त्यांची मोठी जबाबदारी होती. समुदायाच्या पाठिंब्यामुळे हे अधिकच महत्त्वाचे ठरले. त्याचप्रमाणे लाला, जो सहसा घरी राहत नाही, त्याने स्वतःहून बासुंदी बनवली. अजयने TFI टीमला इंग्रजीची एक स्टोरी वाचून दाखवली.. तो फक्त 4थीत असूनसुद्धा इंग्रजी वाचतो. या अनुभवाचा इतका चांगला परिणाम झाला की त्याने आता लायब्ररीमधून पुन्हा चार पुस्तके वाचनासाठी नेली आहेत.

Tech for India ची पूर्ण टीम येणे ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. स्वतः शाहीन मिस्त्री TFIच्या संस्थापिका यांनी समुदायातील आदर, प्रेम आणि आत्मीयता अनुभवली. TFI टीमकडून आम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या मुलांकडून, समुदायाकडून, आणि स्वतःकडूनही.
सोनखांब सेंटरला आज भेट देणारे लोक फक्त पाहुणे नव्हते; ते होते स्वप्नांना चालना देणारे, प्रेरणा देणारे, आणि शिक्षणाला एक नवी दिशा दाखवणारे साथीदार.

दिवस संपला पण त्याचं सौंदर्य आमच्या मनात अजूनही ताजं आहे. आणि कदाचित पुढच्या अनेक वर्षांपर्यंत राहीलही.

Read more

बोथली -मुलांच्या हास्याने भरलेली दिवाळी

-रोहिणी कालभूत

भारवड समाज म्हटला की, हा समाज स्थलांतरित होऊन आपले जीवन व्यतीत करणारा म्हणून ओळखला जातो. गुरांची काळजी घेत, पाण्याच्या आणि कुरणाच्या शोधात हा समाज सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी जात राहतो.

त्यामुळे वर्षभराच्या प्रवासात ते फारसे सण-उत्सव साजरे करू शकत नाहीत. पण यंदा मात्र चित्र वेगळं होतं. आम्ही मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी “दिवाळी वीक सेलिब्रेशन” हा आठवडाभराचा उपक्रम राबवायचं ठरवलं.

या उपक्रमात सर्व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. दिवाळीच्या आठवड्यात दररोज नवे उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. जसे की रांगोळी स्पर्धा, दिवा सजावट, आकाशकंदील बनवणे इत्यादी. “आज हम क्या करणे वाले है ? आज कोणसी स्पर्धा है ? ”त्यांचा हा निखळ उत्साह वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता. प्रत्येक स्पर्धेत मुलांनी अतिशय मन लावून सहभाग घेतला. काही मुलं रांगोळीच्या रंगांशी खेळत होती, काही दिव्यांना जुन्या मण्यांनी, कागदी फुलांनी सुशोभित करत होती. त्यांच्या लहान-लहान हातांतून तयार होणाऱ्या वस्तूंमध्ये खूप सर्जनशीलता आणि निरागस आनंद दडलेला दिसत होता.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. मुलांनी आपल्या शाळेच्या बेड्यावर रंगीबेरंगी रिबन आणि फुलांनी सुंदरपणे सजावट केली होती. प्रत्येकाने नवीन आणि रंगीबेरंगी कपडे परिधान केले होते. कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ज्यांनी दिवा सजावट, आकाश कंदील आणि ड्रॉईंग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट काम केले होते, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. मुलांनी गाणी गायली, नाच सादर केला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट नाश्ता आणि मिठाईचे वाटपही करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षीची दिवाळी मुलांसोबत आनंद, रंग आणि उत्साहात साजरी करणं माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

Read more

ठणठणमहाराज बागचा सफर

–पल्लवी शंभरकर

या आठवड्यात आम्ही मुलांना adventure visit साठी बाहेर घेऊन जायचे होते. बेड्यावरील मुलींसाठी घराच्या बाहेर पडणं ही काही सोपी गोष्ट नाही.

घरकामं करणे. आणि लहान भावंडांची जबाबदारी असते. पण सर्व मुलींना बाहेर जायचे होते. माझ्या वर्गात रिद्धी नावाची एक मुलगी आहे. नेहमी उत्सुक, शिकण्याची आणि काहीतरी नवीन पाहायची ओढ तिला असते. ती नेहमी मला म्हणायची, “मॅडम, मुझे महाराजबाग देखना है चलो ना! रिद्धीच्या या शब्दांत एक निरागस बाहेरच्या जगाला पाहण्याची, काहीतरी शिकण्याची, स्वतःसाठी एक छोटंसं पाऊल टाकण्याची इच्छा दिसत होती. बाहेर फिरायला जायचं हा उत्साह दिसत होता. मी ठरवलं हा उत्साह मरू द्यायचा नाही.

एक दिवस मी सर्व एक दिवस मी वर्गातच विचारलं, “महाराजबाग कौन कौन चलेगा?” त्यामध्ये मुलींचा सहभाग खूप छान होता. त्यानंतर मी सर्व मुलांना म्हटले आपण महाराजबाग जाऊया. पण फक्त मी सोबत असणार. आपण सर्वांना घरी पालकांना सांगायचे आहे, परवानगी मागायची आहे. आणि तिकिटाचे पैसे तुम्हालाच आणायचे आहे. या सर्व गोष्टी झाल्या की मी एकदा पालकांशी बोलेल.

दोन दिवसात सर्व मुलांनी पैसे गोळा केले आणि त्यानंतर दिवस ठरवण्यात आला. ज्या दिवशी महाराजबाग जायचे होते. त्यादिवशी सर्व ठरलेल्या वेळेस स्वच्छ कपड्यांत, चमकत्या चेहऱ्यांसह तयार होऊन शाळेजवळ जमले होते. जेव्हा आम्ही महाराज बागेच्या गेटसमोर पोहचलो, तेव्हा रिद्धीच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मावणारा नव्हता.
कारण हा फक्त सफर नव्हता तर त्यांनी स्वतःसाठी घेतलेला एक निर्णय होता. आणि हे सर्व करत असताना मला समजले की, हीच त्यांची खरी शिकण्याची सुरुवात आहे.

Read more

From Learning to Leading –आमची इंटर्नशिप जर्नी

-निखिल, निकिता

आमच्या इंटर्नशिप program ची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सुरूवातीला आम्ही या उपक्रमाचा आकर्षक पोस्टर तयार करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.

त्यानंतर विविध WhatsApp ग्रुपमध्ये इंटर्नशिपची सर्व माहिती पाठवून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
याचबरोबर, आम्ही अनेक महाविद्यालयांना भेट दिली, तिथे विद्यार्थ्यांसाठी सेशन्स घेतली आणि या संवादातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात नोंदणी (Registration) मिळाली. विद्यार्थ्यांचा वाढलेला प्रतिसाद पाहून आम्हालाही आणखी प्रेरणा मिळाली.

या इंटर्नशिपमध्ये आम्ही विविध कौशल्यांवर काम केले. English Speaking, Data Course, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, Video Editing, Poster Making, मुलांना शिकवणे आणि समुदायासोबत काम करणे. प्रत्येक सोमवारला आम्ही Offline Internship Day आयोजित केला आणि त्या माध्यमातून इंटर्न्सना विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष Exposure दिला. हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला, कारण त्यांनी सैद्धांतिक गोष्टींबरोबरच प्रत्यक्ष काम कसं असतं हेही शिकायला सुरुवात केली.

English Speaking साठी आम्ही दररोज लहान-मोठे Task दिले आणि Speaking Club सुरू केला. त्यामुळे इंटर्न्समध्ये इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढला, संकोच कमी झाला आणि त्यांची इंग्रजीची भीती हळूहळू दूर झाली.
Communication Skill शिकण्यासाठी वेळ, सातत्य आणि सराव आवश्यक असतो. म्हणूनच आम्ही खेळ, मजेशीर उपक्रम आणि हसत-खेळत होणाऱ्या कार्यशाळांच्या माध्यमातून Communication वर प्रभावीरीत्या काम कसे करता येते हे इंटर्न्सना शिकवले. या पद्धतीमुळे शिकणं सोपं आणि आनंददायी झाले.

अशा पद्धतीने आम्ही आमचा पहिली Batch यशस्वीरीत्या पूर्ण केला. सध्या आमचे अजून दोन Batch सुरू आहेत आणि पुढील महिन्यात चौथी Batch सुरू होणार आहे. दर Batch सोबत आम्ही अधिक अनुभव, अधिक आत्मविश्वास आणि अधिक Reflections घेऊन पुढे जात आहोत.

या इंटर्नशिपमधून आम्हाला प्रथमच नेतृत्व करण्याची, एखाद्या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली.
या अनुभवातून आम्ही Leadership, Decision-Making Ability, Teamwork, Adaptability यांसारख्या महत्त्वाच्या गुणांचा विकास करू शकलो.
जसे इंटर्न्स नवीन कौशल्ये शिकत आहेत, तसंच आम्हालादेखील या प्रक्रियेत स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर काम करण्याची मौल्यवान संधी मिळत आहे.

Read more

One comment

  1. Tejasvini N.

    What a great stories, so inspiring and learning oriented.
    Creativity and work both are equally balanced and measurable as well.
    Even Teams writing skills are in another level.
    Congratulations all the team members, thank you for inspiring stories and your doing grate work.

Leave a Reply to Tejasvini N. Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *