संकलन आणि संपादन – निकिता देवासे
सोनखांब-गौरीची प्रेरणादायी गोष्ट
– प्रीतम नेहारे

गौरीला लहानपणापासूनच शिकायची खूप आवड होती. तिने इयत्ता ७ वी यशस्वीरीत्या पूर्ण केली. शिक्षणाचा नकार असतानाही तिला शिकत राहायचं होतं. ती आता ८ वीमध्ये गेली आहे , पण घरच्यांना तिला पुढे शिकवायचं नव्हतं.
इथूनच तिच्या खऱ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.
आई-वडिलांनी अनेकदा नकार दिला होता, पण गौरी मात्र ठाम होती “मला शिकायचंच आहे!” घरच्यांचं म्हणणं असं होतं, “आता तिला घरकाम शिकायला हवं. आमची मुलगी मोठी झाली आहे. तिचं शिक्षण इथेच थांबावं. आता फक्त मयूर आणि तेजल यांनाच शिकवायचं आहे.” असेच दिवस जात होते. पण तिला कुणीही शाळेत दाखला करून द्यायला तयार नव्हतं. घरच्यांच्या मनात शिकवायचं काहीच ठाम नव्हतं. गौरीला वाटायचं “माझी स्वप्नं इतकी लहान नाहीत. मी नक्की काहीतरी वेगळं करणार.”
याच वेळी आमचा ‘रियाज घर प्रकल्प’ सुरू झाला. मुलांना भेटायला बेड्यावर गेलो असताना, गौरीचा दाखला करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली. तिच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं ही पहिली पायरी होती. त्यांना समजावणं अवघड होतं, पण अशक्य नव्हतं. आम्ही सातत्याने प्रयत्न केले, तिची TC व इतर कागदपत्रे मिळवली आणि अखेर तिला मेटपांजरा येथील शाळेत ८ वी ला दाखल केलं.
आज गौरी नियमित शाळेत जाते, रोज नवीन काहीतरी शिकते. तिला शिकताना, घरी अभ्यास करताना आणि तिची प्रगती पाहून तिचे आई-वडील अभिमानाने म्हणतात –
“मेरी बेटी की पढ़ाई रुकनी नहीं चाहिए!”
हळूहळू घरचं वातावरणही बदललं. सुरुवातीला शिकण्याला विरोध करणारेच आता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आई-वडिलांना जाणवलं की मुलीचं शिक्षण थांबवणं म्हणजे तिची स्वप्नं हिरावून घेणं होय. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानता सामोरं गेलं, तर यश नक्कीच मिळतं. गौरीची कहाणी याचं जिवंत उदाहरण आहे.
आज ती स्वतःहून शाळेत जाते, शिकते आणि स्वप्न रंगवते. तिचं स्वप्न आहे मोठं होऊन शिक्षिका बनायचं.
नक्कीच तिच्या या स्वप्नांना पंख मिळतील !
चक्रिघाट-मुलांचा उकळवाही शाळेतील अनुभव
– नविनता डोंगरे

आतापर्यंत आम्ही मुलांना बेड्यावर बसवून शिकवत होतो. पण आता आम्हाला वाटलं की मुलांना प्रत्यक्ष शाळेत नेऊन शिकवलं पाहिजे. म्हणून मुलांना शाळेत घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली.
बेड्यावर पोहोचल्यानंतर आम्हाला पाहून मुलांना खूप आनंद झाला. पहिल्यांदाच शाळेत जाणार असल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता.
शाळेचे नव-नवे कपडे घालून मुले आम्हाला दाखवत होती. छान तयारी केलेली असल्याने मुले खूप सुंदर दिसत होती. प्रत्येक मुलाकडे पाहताना मन आनंदाने भरून जात होतं. मुलांच्या चेहऱ्यावरच्या भावना अतिशय सुंदर होत्या. पालकही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सुक होते. त्यांना बघून असं जाणवत होतं की मुलांना तर शिकायचं आहेच, पण पालकही आपली कामं बाजूला ठेवून मुलांना शाळेसाठी तयार करत होते. शाळेत मुलांना घेऊन जाताना पालकांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता.
सगळी मुले तयारी करून बसली होती आणि आता गाडी येण्याची वाट पाहत होती. गाडीची वाट पाहत असताना मुले उत्साहाने म्हणत होती “मॅडम, गाडी कधी येणार?” हे ऐकून खूप छान वाटत होतं. मुलांचे पालकही मुलांना शाळेत पाठवताना प्रेमाने सांगत होते – “स्कूल में अच्छे से रहना, पढ़ाई करना.” हे ऐकताना मन भरून आलं.
गाडी आल्यावर मुलं खूप खुश झाली. गाडीत बसण्यासाठी सगळ्यांनी छोटीशी धावपळही केली. गाडीत बसल्यावर मुले आपसात गप्पा मारू लागली “स्कूल में जाएंगे तो नए दोस्त बनेंगे!” मोठी मुले लहानग्यांना समजावत होती “स्कूल में शांत रहना, मस्ती करू नका.” तरीसुद्धा मनात एक प्रश्न सतत येत होता “मुलं शाळेत एकत्र राहतील का? भांडण तर नाही करतील ना?” पण दिवस जसजसा पुढे गेला, तसं हे प्रश्न हळूहळू नाहीसे झाले.
शाळेत गेल्यावर मुले शांतपणे शिक्षकांचे बोलणे ऐकत होती, एकमेकांबरोबर खेळत होती, नवीन गोष्टी शिकत होती. नव्या मित्रमैत्रिणी बनवून त्यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. खास गोष्ट म्हणजे मुलांनी कुठेही हट्ट केला नाही “हे आम्ही खाणार नाही” असं न म्हणता त्यांनी स्वतः प्लेट घेतली, बसून छान जेवले आणि नंतर स्वतःची प्लेट स्वतः धुतली.
सगळे मुलं एकत्र मिसळून, खेळून आणि शिकून खूप खुश झाली. घरी जायची वेळ झाली तेव्हा closing मध्ये सगळ्यांनी एकाच आवाजात सांगितलं
“आज स्कूल में आकर बहुत अच्छा लगा. अब हम रोज स्कूल आएंगे!”
असोला-राखीचा उत्सव – शिकण्याची नवी दिशा
– प्राची बोरेकर

राखी जवळ येत होती आणि आम्हा सर्वांना खूप उत्सुकता होती आम्हालाही आणि आमच्या मुलांनाही! साधारणपणे आपण तयार राख्या विकत आणतो, पण यावेळी काहीतरी वेगळं करायचं होतं.
म्हणून आम्ही आणि मुलांनी ठरवलं “ राखी आपणच बनवायची.” मग काय आम्ही आणि आमची मुलं एकत्र मिळून ‘Let Rakhi be a celebration of creativity’ या सुंदर कल्पनेवर आधारित हा प्रकल्प सुरू केला.
सुरुवातीला थोडी भीती वाटत होती “आपल्याला राखी बनवता येईल का?” पण जसजशी सुरुवात झाली, तसतसं वातावरण खूप रंगतदार होत गेलं. रंगीत कागद, मोती, चमचमत्या लेस, रिबिन्स हे सगळं पाहून मुलांचे डोळेच चमकून गेले. प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार राख्या बनवायला सुरुवात केली. मुलांची सर्जनशीलता आणि उत्सुकता अगदी स्पष्ट दिसत होती. कोणीतरी फुलांच्या आकाराची राखी करत होतं, कोणीतरी कार्टून पात्र काढत होतं, तर एखादं मूल अक्षरं लिहून आपली राखी वेगळी बनवत होतं. त्यांचा उत्साह बघून आम्हालाही खूपच छान वाटलं. खरं सांगायचं तर त्यांच्या राख्या आमच्यापेक्षा खूप सुंदर आणि आकर्षक बनल्या.
या प्रक्रियेत एक गंमतही घडली, आम्ही राखी बनवताना अनेकदा चुका केल्या, पण मुलांनीच आम्हाला शिकवलं, मार्गदर्शन केलं. जणू भूमिका उलटल्या होत्या आम्ही विद्यार्थी आणि ते शिक्षक! त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून आमचा थकवाही निघून गेला. या उपक्रमातून आम्हालाही खूप काही शिकायला मिळालं संयम, टीमवर्क,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “एकत्र काम करण्याचा आनंद.”
राख्या तयार झाल्यावर दुसरा टप्पा सुरू झाला. त्या विकायचा. आधी वाटलं “राख्या विकणं एवढं सोपं असेल का?” पण मुलांचा उत्साह पाहून आम्ही संयम बाळगला. शाळा सुटली होती, उन्हं प्रचंड होती, तरीही मुलांची उर्जा अगदी वाहत होती. आम्ही सर्वांनी मिळून राख्यांचा छोटासा स्टॉल बेड्यावर लावला. त्या क्षणी मुलांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.
लोकं येत होते, राख्या बघत होते, आणि मुलं गोड आवाजात हाक मारत होती. “दिदी, भैया, राखी लो! बहुत अच्छी राखी है, बच्चों ने बनाई है!”
त्यांची ती निरागसता आणि आत्मीयता पाहून अनेकांनी आनंदाने राख्या घेतल्या.
हळूहळू आमच्या बर्याचशा राख्या विकल्या गेल्या. प्रत्येक वेळी कोणी राखी घेतल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दांत सांगता येत नव्हता. ते क्षण आमच्या मनात कायमचे कोरले गेले.
हा संपूर्ण अनुभव आमच्यासाठी खूप आनंददायक आणि शिकवणारा ठरला. सुरुवातीला वाटलेला प्रश्न “राखी कशी विकायची?” हळूहळू प्रयत्न करत यखुप मोलाची दार होता व्यूचि ते वाक्य म्हणजे मुलांचे भविष्याचे उघडणार स्वप्न होत. या छोट्या छोट्या वाळ्यातुन मुलांच भविष्य व शाळेतून मोठ्या शविची पायरी होत.
या प्रकल्पातून आम्हाला हे उमगलं की खरी राखी म्हणजे फक्त धागा नाही, तर नात्यांना जपण्याची, प्रेम व्यक्त करण्याची आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याची एक सुंदर संधी आहे.
हा अनुभव आमच्या आठवणीत कायमचा राहील कारण राखी विकून आम्ही फक्त पैसे कमावले नाहीत, तर एकत्र येऊन आनंद, आत्मविश्वास आणि नवी शिकवण मिळवली. मोलाची दार होता व्यूचि ते वाक्य म्हणजे मुलांचे भविष्याचे उघडणार स्वप्न होत. या छोट्या छोट्या वाळ्यातुन मुलांच भविष्य व शाळेतून मोठ्या शविची पायरी होत.
बोथली-एक अनोखी पालक सभा
-रोहिणी कालभूत

बेड्यावर काम सुरू होऊन एक महिना झाला होता, पण अजून पालकांसोबत बसून नीटसं बोलणं झालं नव्हतं. त्यामुळे पालक सभा आयोजित करण्याचं ठरवलं.
या सभेत मी, एक शिक्षक म्हणून, पहिल्यांदाच सर्व पालकांशी संवाद साधणार होते. मनात उत्सुकता आणि कुतूहल होतंच, पण थोडीशी भीतीही होती आईवडील कसा प्रतिसाद देतील? त्यांना काय वाटेल? मुलांसाठी कितीही धावपळ असली तरी पालक आपल्या वेळातून थोडा वेळ काढून वेळेवर उपस्थित राहिले. त्यांच्या साठी काही छोट्या ऍक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या जसं की बलून गेम, ग्लास गेम. मनात शंका होती. हे मोठे लोकं हे खेळ खेळतील का?
पण जेव्हा सर्वांनी मनापासून सहभाग घेतला, तेव्हा काही क्षणांसाठी असं वाटलं की मोठी माणसंही लहान मुलांसारखी आनंदात रमून गेली आहेत.
खेळांनंतर पालक सभेची सुरुवात झाली. एकेक करून मी सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांची शिकण्याची गोडी याबद्दल माहिती दिली.
हे ऐकताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती आपल्या मुलांचं काहीतरी चांगलं सुरू आहे, ही खात्री त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काही पालकांनी प्रश्न विचारले, काहींनी शंका व्यक्त केल्या, आणि आम्ही त्यांची समाधानकारक उत्तरं दिली.
सभेच्या शेवटी, एक दीदी म्हणाल्या, “दीदी, आप बच्चों को जैसे भी पढ़ाओ, हम आपके साथ हैं… सिर्फ बच्चे पढ़ने चाहिए और आगे बढ़ने चाहिए!”
त्यांचं हे वाक्य माझ्यासाठी एक विश्वासाचं नातं बनून राहिलं. या पालक सभेनंतर एक वेगळंच नातं पालकांशी जुळलं विश्वासाचं, सहकार्याचं आणि एकत्र प्रगती करण्याचं.
ठणठण-अजय आणि स्वप्नांची शाळा
– प्रगती बांडेबुचे

गेल्या सहा आठवड्यांपासून मी ठणठण बेड्यावर भरवाड समुदायातील मुलांना शिकवत आहे. दररोज या शाळेत येताना माझ्या मनात वेगवेगळे विचार असतात.
आज काय शिकवायचं, मुलं कशी प्रतिक्रिया देतील, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायला मिळेल का. इथं रोज नवे अनुभव, नवे प्रसंग अनुभवायला मिळतात.
ही शाळा एका छोट्याशा झोपडीत आहे. तारेच्या भिंती, ताडपत्रीचे छप्पर आणि मातीचा जमिनीत बसलेला वर्ग. बाहेर उन्हाचा तडाखा, पावसाचे थेंब किंवा वाऱ्याची झुळूक असो या झोपडीच्या आत मात्र रोज नवे जग उभं राहतं. कारण या झोपडीमध्ये रोज मोठी स्वप्नं जपणारी डोळे चमकत असतात.
आज माझ्या वर्गात थोडासा गोंधळ सुरू होता. मुलं खेळत होती, कोणीतरी चिडवायचं, तर कोणी गाणी गुणगुणायचं. मी त्यांना शांत करण्यासाठी प्रश्न विचारला,
“तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे?” क्षणभर वर्गात शांतता पसरली. मुलं एकमेकांकडे बघू लागली. मग अजय नावाचा एक मुलगा हळूच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थोडा संकोच होता, पण तो आत्मविश्वासाने म्हणाला,
“मुझे यहाँ से पढ़कर बड़े स्कूल जाना है। फिर मुझे पुलिस बनना है।”
त्याच्या या साध्या पण ठाम शब्दांनी संपूर्ण वर्गात एकदम ऊर्जा पसरली. किसन, संजू, हरेश एकामागोमाग एक मुलं उभी राहू लागली. कुणी डॉक्टर बनायचं म्हणालं, कुणी शिक्षक, तर कुणी इंजिनिअर. त्या क्षणी असं वाटलं, जणू एका छोट्याशा झोपडीतून उगवलेली ही स्वप्नं आकाशाला भिडत आहेत. भिंती जरी तारेच्या असल्या, तरी त्या स्वप्नांच्या आड काहीच भिंती नव्हत्या. मुलांच्या बोलण्याने मला जाणवलं त्यांच्याकडे साधनं कमी असली, तरी त्यांची जिद्द आणि स्वप्नं मात्र मोठी आहेत. त्यांच्या डोळ्यांतला आत्मविश्वास माझ्यासाठी सर्वात मोठा धडा होता.
त्या क्षणी वर्गातील गोंधळ नाहीसा झाला. हशा-खेळ थांबला आणि सगळे पुन्हा एकाग्रतेने अभ्यासात रमले. झोपडीतील शांत वातावरणात फक्त वही-खडूचे आवाज घुमू लागले. मला मात्र मनातून एकच भावना जाणवत होती ही मुलं नक्की त्यांची स्वप्नं पूर्ण करतील. कारण स्वप्नं मोठी असतात, पण त्याहूनही मोठं असतं त्यांना पूर्ण करण्याचं धैर्य.