संकलन आणि संपादन – निकिता देवासे
चक्रीघाट – मुलांना शिक्षणाप्रती आवड निर्माण होऊ लागली आहे.
– कोमल गौतम

.चक्रिघाट बेडा आता स्थलांतरित होऊन पुन्हा आपल्या जागी परत आला आहे. पावसाळा लागल्यामुळे उन्हाळ्यात झालेलं स्थलांतर थांबून, आता सर्व कुटुंबं आपल्या झोपड्यांमध्ये परतली आहेत.
त्यांच्या झोपड्याही पुन्हा बांधून तयार झाल्या आहेत. त्याचबरोबर आमचं बेड्यावर वर्ग घेणंही पुन्हा सुरू झालं आहे. मागील वर्षीच्या स्थितीच्या तुलनेत यावर्षी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली आहे. मागच्या वर्षी, जेव्हा आम्ही बेड्यावर शिकवायला जायचो, तेव्हा मुलं फारशी उत्साहाने येत नव्हती. ते उशीर करत होती, काहीजण यायलाच टाळाटाळ करत होते. शिक्षणात फारशी रुची नव्हती. “मुझे नहीं पढ़ना”, “मुझे नहीं लिखना” असे बोलणं, एकमेकांशी भांडणं, मारामारी करणं असंच काहीसं वातावरण होतं. बऱ्याचशा अॅक्टिव्हिटींमध्येही ते सहभाग घेत नव्हते.
पण यावर्षीचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. मी आणि नविनता पहिल्याच दिवशी बेड्यावर पोहोचलो, तर मुलं आधीच आंघोळ करून, नीटनेटकं तयार होऊन बसलेली होती. त्यांनी आम्हाला पाहताच उत्साहाने सांगितलं “हम तो आपके पहले ही आ गए, मैडम। “हमें अभी पढ़ाओ!”
तेव्हा मला लगेच मागच्यावर्षीची परिस्थिती आठवली. उन्हाळ्यामध्ये ‘रिआज’ घरामध्ये घेतले गेलेले वर्ग, साहसी भेटी (adventure visits), बाह्यभेटी (external visits), आणि नव्या-नव्या गोष्टी शिकण्यासाठी दिलेल्या संधी यांचा मोठा वाटा आहे. या सगळ्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये केवळ शिकण्याची आवडच निर्माण झाली नाही, तर त्यांनी शिकण्याचा आनंदही अनुभवला.
आज पहिल्याच दिवशी मुलं स्वतःहून शिकण्यासाठी इतकी उत्सुक आहेत! त्यांची ही बदललेली वृत्ती पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशीपासून बेड्यावर वर्ग घ्यायला सुरुवात केली.
आता दररोज सकाळी १० वाजता मुलं उत्साहाने, हसत-खेळत शिकण्यासाठी तयार असतात.
पुस्तकांपलीकडचं शिक्षण, अनुभवातून मिळणाऱ्या शिकवणींचं महत्त्व, आणि गमतीशीर अॅक्टिव्हिटीजमुळे त्यांचं शिक्षणाकडे पाहण्याचं दृष्टीकोनच बदलला आहे.
त्यामुळे आज ही मुलं उत्साहाने वर्गात सहभागी होतात, प्रश्न विचारतात, आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शिकायला तयार असतात.
ठणठण – चिमुकल्यांसोबतची गोड मैत्री
-डेव्हिड सूर्यवंशी

पावसाळा सुरू झाला आणि काही महिन्यांपूर्वी हे लोक चाऱ्याच्या शोधात जंगलात राहायला गेले होते.
तिथे त्यांचा संपूर्ण समुदाय कुटुंबांसकट गायी पालनाच्या कामात गुंतलेला होता. आता पावसामुळे ते पुन्हा आपल्या जागी परतले आहेत. झोपड्याही नव्यानं उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर आम्हीही पुन्हा एकदा बेड्यावर शिकवायला जायला सुरुवात केली आहे.
माझ्याकडे Pre-Primary (पूर्व-प्राथमिक) वयोगटातील लहान मुलं आहेत. वयाने अगदी लहान – ३ ते ६ वर्षांदरम्यानची. त्यांच्या गोड निरागसतेसोबतच त्यांचं शिकणं ही एक खास आणि काळजीपूर्वक हाताळण्याची प्रक्रिया आहे.
मी नुकताच त्यांच्या सोबत काम करायला सुरुवात केली होती. मनात सतत एक प्रश्न घर करून होता – “मी या गोंडस चिमुकल्यांना कसं शिकवणार?”
थोडी भीती, थोडं संकोच… पण तरीही मी माझ्या सहकाऱ्यांसोबत त्यांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचलो. तेव्हा एक गोष्ट जाणवली मुलं मला पाहून थोडीशी घाबरलेली होती. त्या सगळ्या आपल्या ओळखीच्या ताईंना बिलगून उभ्या होत्या. मग मी ठरवलं, की आधी यांच्याशी ओळख करून घेणं गरजेचं आहे.
मी त्यांच्या घरांमध्ये जायला सुरुवात केली. कुटुंबीयांशी बोललो. हळूहळू संवादाचं पाऊल पुढे टाकत गेलो, आणि मुलांशीही हसतखेळत बोलायला लागलो. पूर्व-प्राथमिक वयोगटातील मुलांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी खेळ हीच खरी गुरुकिल्ली आहे. म्हणून मी खास असे खेळ निवडले, ज्यामध्ये नाव घेणं, हात-पाय हलवणं, गाणी म्हणणं अशा गोष्टी असतील – ज्या त्यांना रुचतील आणि शिकायला प्रवृत्त करतील.
थोड्याच वेळात ही मुलं खुलली. हसू लागली. त्यांना खूप मजा येऊ लागली. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून माझ्या मनातही खूप आनंद भरून आला. फक्त काही दिवस झाले, आणि मला जाणवायला लागलं की खूप मोठा बदल झाला आहे. मी बेड्यावर पोहोचतो ना, तेव्हा हीच मुलं मला पाहून धावत येतात! काहीजण तर माझा हात पकडून थेट आपल्या झोपडीपर्यंत घेऊन जातात. त्यात तुलसी, किन्जल, गोपी, जिगर, आरती, हरेष अशा कितीतरी नावांची गोड मुलं असतात प्रत्येकजण आपापल्या उत्साहात असल्याच दिसतं होत.
हळूहळू आमच्यातली मैत्री बहरायला लागली. आता मी बेड्यावर जातो, तेव्हा मुलं मला पाहताच झोपडीतून बाहेर येतात. आनंदाने बोलतात, खेळायला सुरुवात करतात. मी त्यांच्याशी खेळतो, त्यांच्या भावना समजून घेतो, त्यांना हसवतो… आणि आपसूकच त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊन जातो.
आज मी त्यांचा शिक्षक आहेच, पण त्यांच्यासारखाच एक मित्रही झालोय त्यांच्यासोबत खेळणारा, शिकवणारा… आणि स्वतःही सतत शिकणारा.
कधी शिकवता शिकवता मी स्वतःच बालपण जगायला लागलो – कधी वेळ गेला, कळलंच नाही!
या चिमुकल्यांना शिकवणं आणि त्यांच्याशी गोड मैत्री करणे हेच खरं शिक्षण आहे.
त्यांच्या निरागस हास्यात, त्यांच्या चमकणाऱ्या डोळ्यांत मला माझं स्वतःचं हरवलेलं बालपण परत मिळालं.
असोला–ओळखीपलीकडचं नातं – एक अनुभव
-प्राची बोरेकर

तीन आठवडे झाले, मी असोला सेंटरवर काम करत आहे. या प्रवासाची सुरुवातच इतकी सुंदर होती की, त्यातून पुढचा प्रत्येक दिवस काही ना काही शिकवणारा ठरतोय.
सुरुवातीला मी थोडी गोंधळलेली होते नवीन ठिकाण, अनोळखी माणसं, आणि मनात अनेक प्रश्न. पण जसजसे दिवस पुढे गेला, तसाच एक वेगळंच आपलेपण जाणवू लागलं.
कामाची सुरुवात आम्ही समुदायभेटीपासून केली.लोकांशी संवाद साधणं सुरुवातीला थोडं अडखळत होतं. “आपण बोलावं का?”, “ते आपल्याला स्वीकारतील का?” असे प्रश्न मनात होते. पण संवाद सुरू झाल्यानंतर हळूहळू आपुलकीची भावना निर्माण झाली. लोक हसून बोलायला लागले, त्यांचे अनुभव शेअर करू लागले आणि एक जवळीक तयार झाली.
एकदा बेड्यावर जायचं होतं आणि वाटेत दादाजी भेटले. ते म्हणाले, “बस, मी सोडतो.”त्या लहानशा लिफ्टने केवळ अंतरच कमी केलं नाही, तर मनांचीही जवळीक निर्माण झाली. त्या साध्या प्रसंगातून एक अनोळखी व्यक्तीशी “ओळखीपलीकडचं” नातं तयार झालं.
दरम्यान, आम्ही समुदायात जाऊन वेगवेगळ्या छान अॅक्टिव्हिटीज आणि गेम्स घेतले. लहान मुलांसाठी खेळ, गोष्टी, चित्रं काढण्याचे कार्यक्रम हे सगळं करताना आम्हालाही खूप मजा आली. लोक हसले, खेळले, मोकळे झाले, आणि त्या आनंदात आमचंही मन भरून आलं.
मुलांसोबतचा अनुभव तर आणखीनच खास होता. सुरुवातीला त्यांची नावं लक्षात ठेवणं थोडं अवघड वाटत होतं.त्यांनी आम्हाला ‘नवीन’ म्हणून पाहिलं, पण दोन-चारच दिवसांत ते आमच्यात मिसळायला लागले. त्यांच्यासोबतही आम्ही छान अॅक्टिव्हिटीज आणि नव-नवीन गेम्स घेतले. आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरं सांगायचं तर त्यांनीच आमच्याकडे येऊन आम्हाला आपलंसं केलं.
त्यांना अजून माझं नाव नीट म्हणता येत नाही.कोणी “प्राची” म्हणतं, कोणी “पाची”…पण त्यांच्या त्या निष्पाप प्रयत्नांमध्ये जो गोडवा आहे, तो माझ्यासाठी आनंद आहे. प्रत्येक दिवशी नवा अनुभव, नवा संवाद, नवं नातं तयार होतंय आणि यातूनच आमचा खरा प्रवास सुरू झालाय.
बोथली – शिकवताना शिकले
-रोहिणी कालभूत

माझं बोथली बेड्यावरील केंद्रावर काम सुरू होऊन आता एक महिना झाला आहे.
हा काळ छोटा असला तरी अनुभवांनी भरलेला आहे. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, नव्या गोष्टी समजून घेत आहे, आणि स्वतःत एक सकारात्मक बदल घडताना दिसतो आहे.
इथल्या मुलांना शाळेत जायला भीती वाटायची. शाळा त्यांच्या दृष्टीने एक भीतीचं ठिकाण होतं.
“शाळेत शिक्षक ओरडतील, शिक्षा करतील…” या भीतीमुळे मुलं शाळेकडे वळायला तयार नव्हती.
माझा खरा प्रवास इथून सुरू झाला फक्त शिकवण्याचा नाही, तर मुलांना पुन्हा शाळेच्या दिशेने वळवण्याचा. मी ठरवलं की आधी मुलांमध्ये विश्वास निर्माण करायचा. मी त्यांच्याबरोबर खेळायला लागले, गप्पा मारायला लागले, त्यांच्याच भाषेत संवाद साधायला सुरुवात केली.
ते आपले वाटायला लागले, आणि मीही त्यांच्यातलीच एक झाले.
या नंतर मी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलो. प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला. मुलं शाळेत का येत नाहीत? यावर चर्चा केली.
आणि “प्रत्येक घरी जाऊन मुलाला घेऊन शाळेत नेण्यास सुरुवात केली.”
आणि आता बरीच मुले आनंदाने शाळेत येतात. वर्गात बसतात, ऐकतात, उत्तरं द्यायचा प्रयत्न करतात. त्यांच्या डोळ्यांत आता भीती नाही, तर आत्मविश्वास दिसायला लागला आहे.
या दिवसांमध्ये मुलांना शिकवताना मी स्वतःही खूप काही शिकले आहे.संवाद म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर समजून घेणं असतं.
समजूत म्हणजे त्यांच्या जागी उभं राहून त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं. ही सगळी शिकवण मला रोज नव्यानं मिळते आहे.
ते शिकतात, आणि त्यांच्यासोबतच माझाही “शिकणे” आणि “शिकवण्याचा” प्रवास सुरू आहे.