लर्निंग कंपॅनिअन्स गोष्टींचे हिरो
लर्निंग कंपॅनिअन्स गोष्टींचे हिरो

लर्निंग कंपॅनिअन्स गोष्टींचे हिरो

दुधाच्या गाडीने, अनोळखी रस्त्यावर

दोन मुलींनी नागपूर पासून १५० किलोमीटर, जंगलात, पूर्णपणे अनोळखी रस्त्यावर कधी दुधाच्या गाडीने, कधी बाईकवर प्रवास करण्याचे धाडस का केले?

चक्रीघाट बेडा इतरांचच्या तुलनेत खूप लवकर स्थलांतरित होतो. त्यामुळे खूप प्रयत्न करून देखील मुलं थोडंसं शिकायला लागली की स्थलांतरित व्हायची आणि एकही मूल किमान वाचण्याच्या लेवल पर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे किमान आपल्या प्रयत्नांनी पालकांमध्ये इच्छा आणि जाणीव निर्माण व्हावी म्हणून सुरुवातीला विक्रांत आणि अस्मिता नी स्थलांतरा दरम्यान बेडा कितीही दूर गेला तरी आठवड्यातून किमान एकदा त्यांच्यापर्यंत पोहोचणे, मुलांचा जुना अभ्यास पाहणे आणि नवीन देणे याची सुरुवात केली. नंतरच्या काही वर्षात तीच गोष्ट पल्लवी, आचल, कोमल आणि नवीनता नी सुरु ठेवली. त्यामुळे २०२४ मध्ये बेड्यावर पहिला ५-६ वाचता येणाऱ्या मुलांचा गट तयार झाला आणि फेलोंची जिद्द पाहून पालकांनी देखील मुलांच्या शिक्षणासाठी अधिक प्रयत्न सुरु केले.

जंगलातला प्रवास

रस्त्याने जंगली डुक्कर, वाघांची दहशत असताना भीतभीतसुद्धा पायल आणि पल्लवी रोज ३ किलोमीटरचा प्रवास का करत होत्या? कारण याच अंतरामुळे ठणठणमधील कान्हाचे मोठे भाऊ-बहिणी, आणि त्याआधीच्या २–३ पिढ्या वाचायला न शिकताच मोठ्या झाल्या. स्वतः कान्हा ११ वर्षांचा होऊनही वाचायला शिकलेला नव्हता.

पायल,पल्लवीच्या हिमतीमुळे शिक्षण कान्हाच्या वस्तीपर्यंत पोहोचले. आज कान्हा आत्मविश्वासाने वाचतो आहे, इंग्रजी शिकतो आहे आणि जनावरांचा डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतो आहे.

मुलींच्या शाळेसाठी मेहनत 

आधीच अंग मोडेपर्यंत काम असताना लक्ष्मीताईंनी अजून जास्त काम आपल्या अंगावर का घेतले?

प्रत्येक घरात जवळपास ६०-७० गाई असल्यामुळे भरवाड बेड्यावरील कुटुंबांमध्ये खूप जास्त काम असते. घरातील स्त्री-पुरुषांसोबत शाळकरी मुलींना देखील खूप कामाची जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे बऱ्याच वेळा मुलींना शाळेत जायला वेळ भेटत नाही किंवा उशीर होतो. आपल्या मुली, राधा आणि रिद्धीसोबतही असं होऊ नये म्हणून लक्ष्मीताईंनी त्यांची काही कामे स्वतःकडे घेतली आणि ती रोज वेळेवर शाळेत गेली पाहिजे याची काळजी घेतात.

आणि त्यामुळेच आज प्राथमिक शिक्षण पूर्ण करून राधा आणि रिद्धी हायस्कूल मध्ये जात आहेत.

खेळातून मैत्री 

एखाद्या वेळी मुलांच्या भांडणामुळे नाराज झालेल्या पालकांचे वाईट वाटणारे बोलणे ऐकूनही फील्ड न सोडता, त्यांची समजूत घालत वर्षा आणि कांचन पाय रोवून का उभ्या राहिल्या? 

“ही मुले कधीच एकत्र बसणार नाहीत, भांडणे होतील” या समजुतीमुळे भरवाड आणि पारधी समुदायांची मुले वर्षानुवर्षे शाळेत वेगळी ठेवलेली होती. आणि त्यातून थोडा कमी प्रभाव असलेल्या पारधी समुदायाची मुले शिक्षणापासून जास्तच वंचित राहिलेली. हे बदललेच पाहिजे या ठाम जाणिवेतून वर्षा आणि कांचन यांनी पुढाकार घेतला. समुदायांसोबत वाद होतील, नाराजी येईल हे माहीत असूनही त्याचा सामना करून संवाद साधण्याची हिंमत त्यांनी दाखवली. सामूहिक खेळांच्या माध्यमातून वर्षभरात पूर्ण चित्र बदलले. आज दोन्ही समुदायांची मुले एकमेकांचे मित्र-मैत्रीण आहेत, अभ्यास आणि खेळासाठी एकमेकांच्या घरी जातात. आणि त्यामुळेच सुहानी आणि रोशनी या पारधी समुदायातील पहिल्या मुली आहेत ज्यांनी यशस्वीपणे प्राथमिक शाळा पूर्ण करून माध्यमिक शाळेत जायला लागल्या आहेत.

किशोरचे हॉस्टेल 

आपल्या ठरवून दिलेल्या तासांच्या पलीकडे जाऊन, वेळ पडल्यावर स्वतःच्या जेमतेम पगारातून खर्च करून, कुणालने किशोर साठी हॉस्टेल च्या चकरा का मारल्या?

२०१९ मध्ये बेडयावर जवळपास एकही वाचणारं-लिहिणारं मूल नव्हतं. २ वर्षांच्या प्रयत्नाने मुलं लिहायला-वाचायला लागली आणि समूहातला पहिला मुलगा, किशोरला माध्यमिक शाळेसाठी शहरात हॉस्टेल मध्ये प्रवेश दिला. पण थोड्याच दिवसात अभ्यासातील challenge, पैसे आणि प्रोत्साहनाच्या अभावी किशोर घरी आला आणि आपले शिक्षण सुटणारच असा विचार करून बसला.

आपल्या ठरवून दिलेल्या तासांच्या पलीकडे जाऊन कुणाल ने स्वतः त्याच्यासाठी पैसे जमवले, किशोर आणि पालकांची समजूत घातली आणि स्वतः हॉस्टेल ला सोडून आला (आणि एकदा नव्हे तर पुन्हा-पुन्हा). त्यामुळे आज किशोर १०वीत आहे, आत्मविश्वासाने शिकतोय आणि काही विभागीय स्तरांवरच्या खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करत आहे.

मुलींसाठी शाळा 

रूढीवादी समज असलेल्या समूहातून कशी प्रतिक्रिया येईल या भीतीने न थांबता पल्लवी ने “मुलींना जवळच्या गावातल्या शाळेत पाठवायला पाहिजे” अशी चर्चा सुरू करण्याचे धाडस का दाखवले?

कारण ‘आपल्याला घरचे लोक शाळेत नाहीच जाऊ देणार असा विचार करून’ ठणठण बेडयावरची एकही भरवाड मुलगी ४थ्या वर्गानंतर शाळेत न गेलेली. २०२४ मध्ये पल्लवी ने बोलून तर पाहू अशी हिंमत दाखवली आणि पूर्ण समुदायात हळूहळू या विचाराने आणि चर्चेने वेग घेतला.

आणि एक दिवस बेड्यावर पोहोचली तर तिला अनपेक्षितपणे बातमी कळली, “आशा तो सुबह 8 बजे ही स्कूल गई है।” बेड्यावरच्या ५-६ मुली पहिल्यांदा नियमितपणे शाळेत जायला लागल्या आहेत.

एकट्या मुलीचे घर

आधी प्रतिक्षा आणि आता रोहिणीने एकट्याने गावात खोली करून राहण्याचे धाडस का केले?

गावात पुरेशा सोई नाहीत म्हणून बहुतेक वेळा (स्त्री आणि पुरुष दोन्ही) शिक्षक शहरात राहून रोज गावातल्या शाळेला प्रवास करणे पसंद करतात. त्यामुळे बरेच वेळा शाळा उशिरा उघडते, मुलांना पुरेसा चांगला वेळ मिळत नाही. आपल्या मुलांचे असेच नुकसान व्हायला नको ही लर्निंग कंपॅनिअन्स ची भूमिका प्रतिक्षा, रोहिणीने समजून घेतली. आणि त्यामुळे एकट्या मुली असून, सुरक्षिततेची भीती मनात असताना, गावात खोली शोधणे खूप अवघड असताना जिद्दीने गावात राहिल्या.

त्याचमुळे ज्या बोथली बेड्यावर २०२३ मध्ये एकही लिहिता-वाचता येणारे मूल नव्हते तिथली ८०% मुले वाचायला लागली आहेत.

दिवसाची शाळा, मग रात्रीची शाळा

दिवसभर मुलांना शिकवण्याचे काम झाल्यावर पुन्हा संध्याकाळी प्रगती आणि डेविड बेड्यावरील महिलांसोबत काम का करत होते?

प्रगती आणि डेविड नी जास्तीचा वेळ देऊन महिलांना स्वतःचं नाव लिहायला शिकवलं. बाहेरून एखादं document आल्यावर मला आता अंगठा करावा नाही लागणार तर मी स्वतःची सही करू शकेन या कल्पनेने महिलांमध्ये प्रचंड उत्साह तयार झाला.

त्यामुळे त्या स्वतः काहीतरी शिकण्यासाठी म्हणून उत्साहाने जमत आहेत आणि मुलांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *