संकलन आणि संपादन – निकिता देवासे
चक्रीघाट – मुलांना मिळाली शिकायची नवी वाट
– कोमल गौतम

चक्रीघाट बेड्याचे स्थलांतर झाल्यानंतर काही बेडे चांपा या गावाजवळ येऊन राहत आहे.
त्यातील काही मुलं आपल्या कुटुंबासोबत चांपा येथे राहतात, तर काही मुलं अजूनही आपल्या आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर फिरत आहे. चांपा गावात मुलांना नियमित शिकवायला सुरुवात केल्यापासून त्यांच्या वागण्यात आणि शिकण्यात सकारात्मक बदल दिसू लागला आहे. मुलं आता नियमितपणे वर्गात बसत आहे, लक्ष देऊन शिकताना दिसत आहे आणि दिलेला अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. हळूहळू त्यांचा आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे. मात्र जी मुलं अजूनही आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर आहे त्यांच्यात असा बदल दिसत नाही आहे.
सव्वा हा सध्या त्याच्या आजी आजोबासोबत चांप्याला राहत आहे. आणि त्याचा लहान भाऊ जगदीश अजूनही आई-वडिलांसोबत स्थलांतरित बेड्यावर राहतो. सव्वा आधी अभ्यासात रस घेत नव्हता आणि वर्गातही नीट बसत नव्हता. पण सध्या त्याच्यात बराच बदल दिसून येत आहे. तो नियमितपणे वर्गात बसत आहे, लक्ष देऊन शिकतो आहे आणि स्वतःहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतांनी दिसत आहे. शनिवार-रविवार सुट्टी असताना जेव्हा त्याचे वडील त्याला स्थलांतरित बेड्यावर घेऊन जातात, तेव्हा तो तिथे दुधाचा हिशोब करतानाही दिसतो. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनाही शिक्षणाचे महत्त्व समजू लागले आहे.
जगदीशच्या बाबतीतही अशीच एक गोष्ट घडली. त्याला चंपा येथे शिकायला पाठवण्यासाठी आम्ही त्याच्या आईला वारंवार सांगत होतो, पण सुरुवातीला त्यांनी त्याला शाळेत पाठवले नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्या स्थलांतरित झालेल्या बेड्यावर भेट दिली तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. जगदीशला शिक्षणाची संधी मिळाली नाही तर त्याचे किती नुकसान होऊ शकते, हे उदाहरण देऊन समजावून सांगितले.
या संवादानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी जगदीशला शिकण्यासाठी चांप्याला पाठवले. आता त्यालाही शिकण्याची संधी मिळत आहे. पुढे त्याच्यातही सकारात्मक बदल दिसतील, अशी आशा आहे.