फोटो बुलेटिन एप्रिल २०२६
फोटो बुलेटिन एप्रिल २०२६

फोटो बुलेटिन एप्रिल २०२६

संकलन आणि संपादन – निकिता देवासे

बोथली – एक वर्ष: आठवणी आणि शिकणं

– रोहिणी कालभूत 

बघता बघता बोथली बेड्यावर माझं एक वर्ष पूर्ण झालं. वेळ कसा गेला हे कळलंच नाही, पण या एका वर्षाने मला खूप काही दिलं.अनुभव, शिकणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसोबत जुळलेलं नातं.


हा प्रवास फक्त शिकवण्याचा नव्हता, तर शिकण्याचाही होता. या वर्षभरात मी मुलांना खूप काही शिकवलं, पण त्याच वेळी मुलांकडूनही खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या छोट्या छोट्या प्रगतीतून, त्यांच्या प्रयत्नांतून आणि त्यांच्या आनंदातून खूप काही जाणवलं.

मुलांची झालेली प्रगती, त्यांच्या वागण्यात आलेला आत्मविश्वास, पालकांचा वाढलेला विश्वास आणि त्यांचा मिळालेला support हे सगळं पाहताना मन खूप आनंदी होत होतं.

हे संपूर्ण वर्ष आम्ही खेळता-शिकता, गप्पा मारता, हसत-खेळत आणि खूप साऱ्या आठवणी तयार करत घालवलं. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत होता.

या सगळ्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी, मुलांनी काय शिकले हे सांगण्यासाठी आणि पुढचं वर्ष अजून जोमाने आणि उत्साहाने सुरू करू अशी खात्री देण्यासाठी आम्ही बेडा क्लोजिंग घेतली.

माझ्यासाठी हा दिवस खूप खास होता. कारण मी केलेल्या प्रयत्नांचे सुंदर परिणाम माझ्यासमोर उभे होते. पालकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास हे माझ्यासाठी खूप मोठं समाधान होतं.

मुलांसाठी आम्ही एक छोटंसं व्यासपीठ तयार केलं होतं, जिथे ते निर्धास्तपणे आणि मनापासून बोलत होते. काही मुलं थोडी लाजत होती, पण तरीही त्यांनी धैर्याने स्वतःचे विचार मांडले.

सगळ्यात खास क्षण ते होते, जेव्हा मुलांनी स्वतः बनवलेली cards हातात घेतली. ती वाचताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील चमक आणि स्वतःबद्दलचा अभिमान  हे पाहून मन खूप भरून आलं.

वर्षभरात आपण जे काही शिकलो, जे अनुभवले, त्याचे फोटो पाहताना मुलांचा उत्साह वेगळ्याच पातळीवर होता.
“मी ताईसोबत आहे”, “मी chess खेळत आहे”, “मी dance करत आहे”  असं म्हणत ते प्रत्येक फोटोशी स्वतःला जोडत होते.

हे सगळं सांगताना त्यांचा निरागस आनंद पाहून मला खूप समाधान वाटलं.

मुलांसोबत घालवलेला वेळ, एकत्र केलेला नाश्ता, डान्स, गेम्स आणि हशा यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं. तो दिवस फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर आपल्या सगळ्यांच्या आठवणींचा उत्सव होता.

आणि अशा प्रकारे आमची बेडा क्लोजिंग अतिशय आनंदात आणि यशस्वीरीत्या पार पडली.

हा प्रवास इथे संपत नाही…
पुढचं वर्ष आणखी नव्या उमेदीने, नव्या स्वप्नांसह आणि अधिक सुंदर आठवणींसह सुरू होईल, याची खात्री आहे. .

Read more
 

चक्रीघाट – आपलेपणाचा अनुभव

– कोमल गौतम 

आज जेव्हा मी रणूभाई यांच्या बेड्यावर भेट दिली, तेव्हा त्यांनी मला पाहताच हसून म्हटलं,
“दीदी, आप बहुत दिनों के बाद आये… हमें भी अच्छा लगता है जब आप आते हो. क्योंकि हमारे यहाँ आप जैसे बाहर के लोग नहीं रुकते. जो दीदी बच्चों को पढ़ाने आती हैं, वही दीदी हमारे यहाँ रुकती हैं.”


त्यांचे हे शब्द ऐकून मन खूप भरून आलं. त्यांच्या बोलण्यातली आपुलकी आणि प्रेम स्पष्ट जाणवत होतं.

चक्रीघाटवरून हा बेडा स्थलांतर झाल्यापासून आम्ही इथे भेट दिली नव्हती. इथे फक्त एकच मुलगा असल्यामुळे आणि काही इतर कारणांमुळे इथे येणं शक्य झालं नव्हतं. तरीही रणूभैया नेहमी आग्रहाने म्हणायचे,


“दीदी, आप एक बार बेडे पे जरूर आना.”

त्यांचा तो आग्रह आणि माझीही मनातली इच्छा.आज अखेर पूर्ण झाली.

आज मी या बेड्यावर गेले, आणि तिथे पोहोचताच एक वेगळीच शांतता आणि आपलेपणाची भावना जाणवली. दीदीसोबत भरपूर गप्पा झाल्या. त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल, मुलांबद्दल आणि इथल्या परिस्थितीबद्दल.

बेड्यावरील भैय्यांसोबतही अनेक विषयांवर मनमोकळं बोलणं झालं. त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या संघर्षांबद्दल आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल ऐकताना खूप काही समजत गेलं.

गप्पांच्या ओघात मी त्यांना सांगितलं की आता माझी fellowship संपली आहे. हे ऐकून त्यांनी खूप प्रेमाने आणि आपुलकीने उत्तर दिलं,
“ये आपका ही घर है दीदी… आप कभी भी यहाँ आने के लिए ज्यादा सोचना मत.”

त्यांचे हे शब्द मनाला खूप भिडले. त्या एका वाक्यात इतकं प्रेम, इतकी आपुलकी आणि इतका विश्वास होता की काही क्षण मी शब्दच हरवले.

आजचा हा अनुभव फक्त एक भेट नव्हती, तर एक नातं पुन्हा जाणवण्याचा क्षण होता.
या भेटीतून मला जाणवलं की आपण जिथे प्रेमाने, मनापासून काम करतो, तिथे आपलं एक घर तयार होतं. आणि ती माणसं आपली होऊन जातात.

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि कायम आठवणीत राहणारा आहे..

Read more

ठणठण – मायग्रेशनसोबत शिक्षणाची आशा

-डेविड सूर्यवंशी

मी आणि प्रगती सकाळी बेड्यावर पोहोचलो, तर बघतो तर काय  रेखा दीदी आणि विभा भैय्या त्यांच्या बंडीत सर्व सामान भरत होते. आम्ही दोघेही विचार करू लागलो की, इतक्या लवकर ते बाहेर का जात आहेत.


तेव्हा विभा भैय्या आणि रेखा दीदी यांनी सांगितले की, कळमना बेड्यावर गाईंच्या चाऱ्याची खूप समस्या जाणवत होती. विभा भैय्या सांगू लागले की, कळमना येथे रोज गाईंच्या चाऱ्यासाठी सुमारे सात हजार रुपयांचा खर्च येत होता. तसेच आता दूधही पूर्वीसारखे जास्त प्रमाणात मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या लहान मुलांनाही सोबत घेऊन दुसऱ्या ठिकाणी जावे लागत होते.

तिथे किसन आणि पुडूही होते. किसन आम्हाला सांगत होता की, “आता आम्ही कुही या गावाला आलो आहोत.” त्याची आई सांगत होती की, किसनला आता प्रत्येक गावाचे नाव वाचता येते. तो इंग्रजीमध्ये गावांची नावे वाचतो आणि नंतर आम्हाला सांगतो की, “या गावाचे नाव हे आहे.” तो आपल्या आईला आणि बेड्यावरील लोकांनाही गावाचे वाचलेले नाव सांगत असतो.

पूर्वी शांत आणि लाजरा वाटणारा किसन आता आत्मविश्वासाने बोलू लागला आहे. त्याला आता थोडंफार वाचता आणि लिहिता येऊ लागलं आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनाही शिक्षणाचं महत्त्व समजू लागलं आहे. रेखा दीदी सांगत होत्या की, “आता आम्ही आमच्या मुलांना नक्की शिकवणार. किसनला शाळेत पाठवायचा विचार करत आहोत. 

त्यांचे हे शब्द ऐकून आम्हाला खूप समाधान वाटले. सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, पण तरीही आपल्या मुलांनी शिकावं, पुढे जावं ही त्यांची इच्छा खूप प्रेरणादायी वाटली.

अशाप्रकारे आम्ही अनुभवलेली ही बेडा व्हिजिट आमच्यासाठी खूप खास ठरली. या भेटीतून आम्हाला समजलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची आशा आणि मुलांच्या भविष्याची स्वप्नं माणसाला पुढे जाण्याची ताकद देत असतात..

Read more
 

आसोला-बेडा मॅपिंगचा – अनुभव

– जीवन ढोक 

मी एक फेलो टीचर म्हणून असोला बेड्यावर काम करत आहे. माझा उद्देश या लोकांचे स्थलांतर समजून घेणे आणि ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणांचे लोकेशन माहिती करून घेणे आहे. त्यामुळे मी बेडा मॅपिंग करण्याचा प्रवास सुरू केला.

हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या. कधी मला जंगलातून जावे लागले, कधी नाल्यांतून गाडी काढावी लागली, तर कधी नदीच्या काठाने प्रवास करावा लागला. काही वेळा मी गाईं सोबत जंगलातही गेलो.

रस्त्यात शेतकरी मला सांगायचे की जंगलात वाघ आहेत, त्यामुळे जपून जा. तरीही मी भीती न बाळगता पुढे जात राहिलो.

कधी उन्हात लांब वेळ प्रवास करून मी मुलांपर्यंत पोहोचलो. मुलांना कसे शिकवायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता, कारण तिथे शाळा नव्हती. पण मी हार मानली नाही. मी झाडाखाली, बंडीच्या सावलीत आणि कधी मंदिराजवळ मुलांना शिकवायला सुरुवात केली.

या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले. भरवाड समुदाय कोणत्या भागात जातात, कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करतात आणि कोणत्या ठिकाणी थांबतात हे मला समजले.

तसेच मुलं स्थलांतराच्या काळात कशी शिकतात आणि कामही कसे करतात, हेही मला जवळून पाहायला मिळाले.

मी या सर्व ठिकाणांचे मॅपिंग करून एक नकाशा तयार केला. या प्रक्रियेमुळे मला केवळ शिक्षण देण्याचा अनुभवच नाही, तर जीवन समजून घेण्याची एक नवी दृष्टी मिळाली.

शेवटी मला एक गोष्ट जाणवली —
कोणतेही शिक्षण कधीच वाया जात नाही. अनुभवातून मिळालेले शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते..

Read more
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *