तरुण तेजांकित आणि पुरस्कारांबद्दल आमचा दृष्टिकोन
तरुण तेजांकित आणि पुरस्कारांबद्दल आमचा दृष्टिकोन

तरुण तेजांकित आणि पुरस्कारांबद्दल आमचा दृष्टिकोन

लोकसत्ता तर्फे देण्यात येणाऱ्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी यावर्षी सामाजिक विभागात माझी निवड झाली. सर्वप्रथम, शालेय वयापासून चांगल्या पत्रकारितेचं प्रतीक म्हणून ज्याच्यावर विश्वास आहे अशा लोकसत्ता सारख्या माध्यमाकडून आपल्या कामाची दखल घेतली जावी, ही अतिशय सुखावणारी भावना आहे. त्यासाठी लोकसत्ता टीमने मला पात्र समजावं याबद्दल मनापासून कृतज्ञता.

खरं तर अगदी आत्तापर्यंत लर्निंग कंपॅनिअन्समध्ये आम्ही पुरस्कार या गोष्टीला जाणीवपूर्वक टाळत आलो होतो. त्यामागे पुरस्काराची संकल्पना, प्रक्रिया आणि तिच्याभोवतीचं आपलं सामूहिक मनोविश्व याबद्दलचे काही अनुभव, निरीक्षणं आणि विचार होते. त्यामुळे समाज म्हणून पुरस्कारांच्या उपयुक्ततेपेक्षा त्यांच्या काही नकारात्मक बाजू अधिक गंभीर वाटत होत्या. त्या समजून घेणं आणि त्यावर उपाय शोधणं अधिक महत्त्वाचं वाटत होतं.

आज त्या यादीतला जाणीवपूर्वक फक्त एकच मुद्दा इथे मांडतो आहे. कारण तो मला सर्वात महत्त्वाचा वाटतो, आणि मोठ्या यादीत हरवून जाऊ नये असं वाटतं. बाकीच्या गोष्टी गरज, वेळ आणि इंटरेस्टनुसार आपण बोलूच.

मला एक नेमका प्रसंग आठवतो. मी मनातल्या मनात एका सेशनची तयारी करत दुचाकीवरून एका शाळेकडे जात होतो. तिथल्या शिक्षकांसमोर १–२ कल्पना मांडायच्या होत्या. त्या यशस्वीपणे राबवल्या गेल्या, तर मुलांना वर्गात खूप इंटरेस्ट वाटेल आणि त्यांच्या शिकण्याची गती वाढेल, अशी मला खात्री होती. त्या शक्यतांचा विचार करताना मला प्रचंड excitement वाटत होती. शिक्षकांनाही ही excitement वाटेल अशा पद्धतीने मांडणी कशी करायची, याचा मी विचार करत होतो.

पण एका क्षणी जाणवलं — मला जितकी excitement वाटत आहे, तितकीच त्या शिक्षकांनाही वाटेल याबद्दल मला पूर्ण confidence येत नव्हता. ते का, याचा विचार-करता करता एक गोष्ट लक्षात आली. या प्रक्रियेतून चांगले outcomes आले, तर त्यातून मला आणि त्या शिक्षिकेला दोघांनाही काही आनंद, ओळख आणि कौतुक मिळेल. पण मला मिळणाऱ्या गोष्टी जशा मला दिसत होत्या आणि जशा मला उत्साहित करत होत्या, साधारण तशाच आणि तितक्याच गोष्टी त्या शिक्षिकेला मिळणारच नव्हत्या. तर मग त्यांना तीच excitement आणि त्यासाठी तितकीच मेहनत करण्याची इच्छाशक्ती कशी निर्माण होईल असा प्रश्न पडला. आज एक संस्था म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो की ज्या भरवाड समुदायात १०% पेक्षा कमी मुलांना वाचता येत होतं, तिथल्या ५ वस्त्यांमध्ये आज ७०% पेक्षा जास्त मुलं वाचत आहेत आणि पुढच्या गोष्टी सक्षमपणे शिकत आहेत. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही तयार केलेलं स्थानिक नेतृत्व नागपूर आणि परिसरातील साधारण २०–२५ संस्थांमधून विदर्भात गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवत आहे. आमच्या प्रक्रियेत जोडले गेलेले युवा अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही दोन वर्ष टिकून हे काम प्रत्यक्षात आणत आहेत. कदाचित याचमुळे बऱ्याच मित्रांना आमच्या कामाचं कौतुक वाटतं, आणि लोकसत्तासारखं माध्यमही आमच्या कामाची दखल घेतं. 

पण या प्रत्येक गोष्टीमागे कितीतरी छोट्या-मोठ्या अचाट पराक्रमकथा आहेत? स्थलांतरामुळे आपल्या मुलींनी शिक्षणाला मुकू नये म्हणून बोथली बेडयावरील रिद्धीच्या आईने स्वतःच्या कामासोबत आणखी दोन मुलींचं कामही अंगावर घेतलं, आणि मुली मागे आजीआजोबांसोबत राहतील असा हट्ट धरून त्यांची शाळा सुरू ठेवली.

सोनखांबमधला जेमतेम ८–९ वर्षांचा अजय, शिक्षकांनी केलेल्या छोट्या-छोट्या कौतुकाने भारावून गेला आणि इतका वाचत सुटला की जिथे पाच वर्षांपूर्वी साधं हिंदी वाचणारा मुलगाही सापडत नव्हता, तिथे हा ८–९ वर्षांचा मुलगा इतक्या सफाईदारपणे इंग्रजी वाचायला आणि समजायला शिकला आहे, हे पाहून थक्क व्हायला होतं.

प्रतीक्षा, रोहिणीसारख्या शहरात किंवा तुलनेने सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुली — ज्या गावात त्यांना काम करायचं आहे तिथे रूम मिळणं जवळपास अशक्य, सुरक्षिततेची भीती, अशा परिस्थितीतही त्या मुलांना शिकवण्यासाठी गावात एकट्याने राहण्याचं धाडस करतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की जिथे दोन वर्षांपूर्वी एकही वाचता येणारं मूल नव्हतं, तिथे ८०% मुलं वाचायला लागतात.

दिव्या (बदललेलं नाव)च्या आईला वाटतं की माझ्या मुलीचं शिक्षण झालं पाहिजे, तिला चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे; आणि म्हणून तिचं लग्न होऊ नये यासाठी ती घरच्यांशी, पूर्ण समाजाशी भांडते.

जवळपास प्रत्येक मुलाचं शिक्षण सुरू राहण्यामागे अशी काहीतरी हिमतीची, जिद्दीची, पराक्रमाची गोष्ट आहे. आणि त्या सगळ्यांच्या जोरावरच मी अभिमानाने सांगू शकतो की इतक्या आव्हानात्मक परिस्थितीतही आम्ही इतकं सुंदर काम उभं करू शकलो आहोत.

या मुद्द्याची दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे — आमची दोस्ती. एकच काम करताना माझा आणि रिद्धीच्या आईचा, अजयचा, प्रतीक्षाचा, रोहिणीचा भावनिक अनुभव जर वेगळा असेल, तर आम्ही एकत्र काम तर करू; पण आमची दोस्ती होणार नाही. आणि लर्निंग कंपॅनिअन्सच्या कामात आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दोस्ती.

कारण आम्ही जगणं ज्या पद्धतीने समजतो, त्यात भरवाड समाजासोबतचं काम हे मुलांनी कुठेतरी पोहोचण्याबद्दल नाही, नोकरीला लागण्याबद्दल नाही. सर्वात आधी ते मुलं, शिक्षक, समुदाय आणि आम्ही — सगळ्यांनी मिळून काही सुंदर, मजेदार, रोमांचक गोष्टी करण्याबद्दल आहे. ते आत्ताचा क्षण जगण्याबद्दल आहे.

आपण रोमांच अनुभवण्यासाठी खाचखळग्यांचे डोंगर चढायला जातो. तिथे आपण “अरे यार, हा डोंगर थोडा सरळ असता तर जास्त मजा आली असती” असं म्हणत नाही. त्या प्रवासातले खाचखळगेच त्याची खरी मजा असतात. त्या अर्थाने “मुलं शिकत नाहीत”, “चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतोय” हे आमच्यासाठी फक्त दूर करून टाकायचे प्रश्न नाहीत. ते आमच्यासाठी खेळाचं मैदान आहेत. ते एकत्र पार करताना जो मेंदूचा कस लागतो, धैर्य आणि सहनशीलतेची परीक्षा होते, जे एकत्र क्षण मिळतात, जी धमाल होते — ते अनुभवणं हा आमच्या कामाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही जगतो. त्यातून आमच्यातल्या कोणीतरी चांगलं गणित शिकलं, कालपेक्षा आज जास्त पैसे कमवायला लागलं — हे त्या कामाचं by-product आहे.

आणि यासाठी एकेक milestone पार केल्यावरचं सेलेब्रेशन, कौतुक हा या मजेचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि तो एकत्र. लर्निंग कंपॅनिअन्स मध्ये त्रैमासिक, वार्षिक आढावा कार्यक्रमांमध्ये आम्ही ‘परफॉर्मर ऑफ द इयर” किंवा “फेलो ऑफ द इयर” असे कोणतेही वैयक्तिक पुरस्कार देत नाही. त्याऐवजी आम्ही एकत्र बसतो, प्रत्येकाला त्याने केलेल्या कामाबद्दल सांगायला २-३ मिनिटांचा वेळ देतो, सारं काही बाजूला ठेवून ते ऐकतो आणि जे आवडलं त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीचं नंतर वेळ मिळेल तेव्हा जवळ जाऊन कौतुक करतो. आणि आमचा मागील ५-६ वर्षांचा अनुभव आहे की या व्यक्त होण्याच्या जागा आमच्या सर्वांच्या सर्वात आवडीच्या जागा आहेत, सर्वात जास्त समाधान आणि excitement देणाऱ्या जागा आहेत. आजपर्यंत कोणीही हे विचारलेलं नाही की आपण बेस्ट परफॉर्मर चे अवॉर्ड वगैरे आपल्या संस्थेत का देत नाही.

त्यामुळे आमच्यासाठी कोणतीही गोष्ट एकट्याने करावी लागणं ही फार चांगली feeling नाही — अगदी ती स्टेजवर जाऊन पुरस्कार घेण्याची असली तरी. त्याची खरी मजा तेव्हाच आहे, जेव्हा माझी माणसं माझ्या बाजूला उभी असतात. आणि नुसती समोर बसून टाळ्या वाजवायला नाही, तर स्टेजवर, सोबत, हात उंचावून ओरडायला.

म्हणून ज्या दिवशी मला हा पुरस्कार मिळणार आहे हे कळलं, तेव्हा डोक्यात पहिली कल्पना हीच आली की लोकसत्ताला विनंती करावी — आम्हा सगळ्यांना तिथे उपस्थित राहता येईल का? मग दोन-चार मित्रांना फोन करून प्रवासासाठी पैसे जमवावेत, आणि पूर्ण टीमला एकत्र बसमध्ये भरून मुंबईच्या दिशेने निघावं.

काल, दिनांक ३१ मार्च रोजी हा सोहळा पार पडला. या निमित्ताने खूप चांगल्या मंडळींना भेटता आलं, आमचं काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं, पुढे हे काम नेण्यासाठी नवे साथीदार भेटण्याची शक्यता निर्माण झाली, आणि खूप कौतुकही मिळालं.

पण या सगळ्या प्रक्रियेत सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट एकच होती — आम्ही तो क्षण ७-८ जणांनी एकत्र अनुभवला. लोकसत्ताच्या टीमने आमची भावना समजून घेतली. पूर्ण टीम ला नाही नेता आलं, पण एका विचाराची सुरुवात झाली, आणि खूप समाधान देणारी सुरुवात झाली. देवेंद्र गावंडे सरांनी आठवणीने आमची request टीम पर्यंत पोहोचवली. इतक्या मोठ्या कार्यक्रमाच्या धांदलीतही ते लक्षात ठेवून गिरीश कुबेर सरांनी पुरस्काराच्या वेळी आवर्जून टीमचा उल्लेख केला. त्यामुळे तो आनंद मला स्टेजवर माझ्या टीमसोबत घेता आला. आम्ही टीम म्हणून पूर्ण कार्यक्रमात वावरलो, एकत्र धमाल केली, दोन दिवस फिरलो, गप्पा मारल्या, एकत्र जीवाची मुंबई केली. तो आमचा खरा पुरस्कार आहे. आणि तोच आमच्या ऊर्जेचा खराखुरा स्रोत आहे. ही भावना समजून, एका वेगळ्या विनंतीला प्रतिसाद दिल्याबद्दल लोकसत्ताच्या टीमचे मनापासून आभार. आणि या निमित्ताने अशीही आशा वाटते की आपल्या माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अजून अधिक आत्मीय, आपुलकीचे, समावेशक आणि candid मार्ग शोधत राहू. याच विषयावर बोलण्यासाठी, वाद घालण्यासाठी, आणि शक्य असेल तिथे एकत्र कृती करण्यासाठी — हे निमंत्रणही.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *