संकलन आणि संपादन – निकिता देवासे
चक्रिघाट -Alumni मुलांनाही शिकण्याची जिद्द
– कोमल गौतम

मी बराच काळ प्राथमिक मुलांना शिकवते. परंतु आता मला alumni मुलांना शिकवायचं होतं म्हणजेच, त्या मुलांना जे आधी शिकले होते, पण आता काही काळ शिक्षण सोडलेले होते.
सुरुवातीला मनात थोडी भीती होती. एवढ्या मोठ्या मुलांना शिकवताना आत्मविश्वास कमी वाटत होता आणि मी स्वतःला प्रश्न विचारत होते “मी त्यांना काय शिकवणार? कसं शिकवणार?”
जेव्हा मी वाली, कल्लू, जीवन, महेश, किसन, आणि हंसा यांना शिकवायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनातले सर्व शंका कमी झाल्या. जसजशी मी त्यांना शिकवायला लागले, तसतसं त्यांच्याशी संवाद आणि विश्वासाचं नातं तयार होऊ लागलं.
मी सर्वप्रथम त्यांच्या कौशल्याची लेव्हल तपासली. काहींची पातळी चांगली होती, सर्वांनाच इंग्रजी शिकायचं होतं. ते वाचायला, लिहायला आणि बोलायला उत्सुक दिसत होते. सुरुवातीला त्यांना शिकवताना मला खूप काळजी वाटत होती, पण हळूहळू ते माझ्याशी स्वतःहून संवाद साधू लागले. आता ते स्वतःहून त्यांचा अनुभव, आणि विचार माझ्यासोबत शेअर करतात.
फक्त क्लासमध्ये शिकणे नाही, तर त्यांनी इतर उपक्रमांमध्ये देखील भाग घेऊ लागले. झोपडीसाठी पोस्टर बनवणे असो, पालक सभेत मत मांडणे असो किंवा इतर community activities असो ते सर्व ठिकाणी सक्रिय राहतात. त्यांच्या सहभागातून आणि आत्मविश्वासातून दिसतं की त्यांच्या शिकण्याची जिद्द कायम आहे.
आज त्यांचे क्लासेस चालू आहेत. जर त्यांना वेळ मिळत नसलाही, ते स्वतःहून येऊन म्हणतात, “दीदी, अभी हमको पढाओ ” त्यांच्या मनात शिकण्याची उत्सुकता अजूनही तितकीच प्रबळ आहे.
यावरून माझ्या लक्षात आले की, मुलांची जिद्द आणि शिकण्याची इच्छा योग्य मार्गदर्शन मिळालं तर किती प्रभावी ठरू शकते. छोटे प्रयत्न आणि विश्वासाच्या नात्यामुळे मुलांची प्रगती दिसून येते, आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात.
असोला– छोट्या शिक्षकांची मोठी तयारी
-प्राची बोरेकर

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या बेड्यावर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरू झाला, आणि आमच्या विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद पाहून मन खरंच आनंदाने भरून गेलं.
प्रत्येकाने आपापला विषय निवडला आणि सुंदर lesson plan तयार करून आले. तयारीत त्यांनी खूप मनातून प्रयत्न केले होते . त्यांच्या बोलण्यात, हावभावात आणि शिकवण्याच्या पद्धतीत आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.
त्या दिवशी मुलं खऱ्या अर्थाने शिक्षक बनली होती. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारलं, “मॅडम, तुम्ही activities कशा तयार करता? त्या कुठून आणता?”
तेव्हा मी त्यांना वेगवेगळ्या resources बद्दल सांगितलं त्यांची नावेही सांगितली, आणि त्या resources कशा शोधायच्या, कशा वापरायच्या हेही समजावून दिलं.
त्यांनी ठरवलं होतं की काय शिकवायचं, कसं शिकवायचं, आणि ते त्यांनी छान रितीने सादर केलं. कुणी उदाहरणं दिली, कुणी छोट्या activity घेतल्या, कुणी गोष्ट सांगितली त्यामुळे वातावर शिकवणीनं आणि हशांनी भरलेलं झालं.
जेव्हा मुलांनी स्वतःला “मी वर्षा मॅडम”, “मी प्राची मॅडम”, “आदित्य सर”, “गोलू सर”, “कंचन मॅडम”, “जानवी मॅडम” असं म्हणून ओळख दिली, तेव्हा त्या क्षणाचं सौंदर्य शब्दात सांगता येणार नाही. त्यांच्या डोळ्यांतला आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता.
मुलांनी शिक्षकाची भूमिका आत्मविश्वासाने निभावली. त्यांनी आधी ठरवलं की काय शिकवायचं आहे, आणि नंतर ते व्यवस्थित शिकवलं. प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला, काही मुलांनी उदाहरणे दिली, काहींनी छोट्या-छोट्या activity आयोजित केल्या, ज्यामुळे सर्वांसाठी दिवस खूप इंटरऐक्टिव्ह आणि मजेदार झाला.
त्या दिवशी जाणवलं मुलांना जबाबदारी आणि संधी दिली की ते केवळ शिकत नाहीत, तर शिकवतानाही स्वतःमधला नवा आत्मविश्वास शोधतात.
शिक्षक दिन फक्त शिक्षकांसाठी नव्हता, तर शिकण्याची आणि शिकवण्याची दोघांचीही सुंदर भेट होती.
सोनखांब-पालक सभा: स्वप्नांना पंख लावणारा अनुभव
– प्रीतम नेहारे

आजची पालक सभा ही खूप वेगळ्या पद्धतीने पार पडली. पालक सभेत नव्या पावलांची उंच भरारी घेऊन उडतोय अशी भावना दिसली. मुलांना उंच आकाश झेपावण्याची संधी मिळाली.
भविष्यात त्यांना काय करायचं आहे, त्यांना काय बनायचं आहे अशी संधी निर्माण करून प्रत्येक मुलाने आपली स्वप्नांची पावले टाकली. त्यांनी आपल्या पायवाटीचे विचार सुंदर शब्दांत मांडले.
स्वप्न फक्त मुलच नाहीत; आई-वडीलसुद्धा बघतात. पालकांसोबत राहून मुलांना काय घडवायचं आहे, त्यांना काय बनायचं आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी ही पालक सभा झाली.
पालक सभेचं उद्दिष्ट फक्त मुलांची स्वप्ने बघणं नव्हतं, तर त्यांना नवी ओळख, नवे विचार आणि नवी स्वप्ने देणं होतं. मुलांना काय येत आहे, मुलांमध्ये काय बदल झाला आहे, आणि त्यांना आता कशाची गरज आहे, कुठे सुधारणा करायला हवी, कुठे पाऊल टाकायला हवे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मागील वर्षापासून मीटरसाठी काही वेळा प्रक्रिया थांबलेली होती, पण शेवटी त्याला कलाटणी मिळाली. आज बेड्यातील प्रत्येक पालक मीटरसाठी पैसे देण्यासाठी तयार झाले आहे आणि प्रत्येकाने स्वतःच पाऊल उचललं.
मुलांनी आपल्या स्वप्नांची मांडणी केली. प्रत्येक पालक आपल्या मुलांसोबत उपस्थित होता. नेहमी दीदी यायच्या, पण या वेळी दोन्ही पालक हजर होते, हे खूप मोठी गोष्ट होती. रतन दीदी नी गुजराती मधून मुलांसाठी स्वप्ने लिहिली. की माझ्या मुलांनी काय बनायला पाहिजे किंवा त्यांच्या अपेक्षा काय आहेत, पालकांनी बाळगलेली स्वप्ने देखील प्रेरणादायक होती. उंच भरारी घेणाऱ्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मिळाली.
बेड्या वरील ज्यांना वाचता येतं त्यांनी मुलांनी लिहिलेली स्वप्ने वाचली आणि एकमेकांना वाचून सांगितले की, मुलांचं स्वप्न इंजिनिअर बनण्याचं आहे, घरच्या व्यापारात हातभार लावण्याचं आहे.
- गौरीच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन मिळालं.
- अजय वकील बनण्याचं स्वप्न पाहतोय.
- विक्रम डॉक्टर बनून बेड्यातील लोकांना मदत करेल.
- तेजल पोलिस बनण्याचं पाहतो.
- जय आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतो.
या सभेत मुलांना आणि पालकांना त्यांच्या स्वप्नांसाठी प्रेरणा मिळाली आणि त्यांना पुढे पाऊल टाकण्याची संधी मिळाली.
ठणठण–उत्साह शिकण्याचा
–मयूर गेडाम

भरवाड समुदायातील मुलांना शिकविण्याचे काम मी गेल्या काही महिन्यांपासून करत आहे.. सुरुवातीला मला वाटत होतं की मुलांना शिकविणे अगदी सोपी गोष्ट आहे.
फळ्यावर लिहून दाखवलं की ते पटकन शिकतील, वाचतील आणि लिहतील. पण प्रत्यक्षात ते तितकंसं सोपं नव्हतं. कारण या मुलांचं आयुष्य अगदी वेगळं आहे. शाळा आणि अभ्यास ही त्यांच्यासाठी एक वेगळीच दुनिया आहे. कामाच्या धकाधकीतसुद्धा त्यांना शिकायचं असतं, नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
मी प्राथमिक गटाच्या मुलांना शिकवतो. आणि जास्तीत जास्त माझ्या क्लासमध्ये मुलीच आहे. त्या मुलींना रोजचे काहीतरी काम असते आणि त्या कामांमुळे नियमित वर्गाला येणं कठीण होतं. “माँ गाँव गई हैं, इसलिए भाई-बहनों का ध्यान रखना पढ़ता है”। अशा प्रकारची कारणे मुली द्यायच्या. याचा परिणाम असा झाला की, ज्या मुली नियमित यायच्या त्या सुध्दा येत नव्हत्या. मग मी विचार केला की, या गैरहजेरीमुळे नियमित येणाऱ्या मुलांवर परिणाम होत आहे.
या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी प्रयत्न केला. मी रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावू लागलो, मुलींना शिकण्याची गरज का आहे हे सांगितलं. विविध प्रयत्नांनी मी त्यांना समजावलं. तसेच वर्गात मी त्यांच्या लेव्हलनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार क्लास प्लॅन तयार करायला लागलो. त्यांना आवडेल असे आणि रिअल लाइफशी कनेक्ट होणाऱ्या अॅक्टिव्हिटीज मी खूप वापरले, त्यामुळे त्यांच्यात बऱ्यापैकी बदल दिसू लागला.
यामुळे मुली शिकत होत्या आणि त्या इतक्या उत्साहाने घरी जाऊन सांगत होत्या, आज हमने यह सीखा, आज हमने यह गेम खेला।” माझी शिकवण्याची पद्धत त्यांना आवडू लागली. त्यामुळे त्या कामाला आणि शिक्षणाला योग्यरित्या संतुलन करायला शिकल्या. नियमित येतात आणि शिकण्याचा आनंद घेत आहेत.
त्यांचा डोळ्यातला उत्साह पाहून मला समजलं की, शिकण्याची इच्छा त्यांच्यात किती प्रबळ आहे! जेव्हा ते एखादं शब्द बरोबर वाचतात किंवा एखादं उदाहरण सोडवतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद फार मोठा असतो.