– कोमल गौतम

आज जेव्हा मी रणूभाई यांच्या बेड्यावर भेट दिली, तेव्हा त्यांनी मला पाहताच हसून म्हटलं,
“दीदी, आप बहुत दिनों के बाद आये… हमें भी अच्छा लगता है जब आप आते हो. क्योंकि हमारे यहाँ आप जैसे बाहर के लोग नहीं रुकते. जो दीदी बच्चों को पढ़ाने आती हैं, वही दीदी हमारे यहाँ रुकती हैं.”
त्यांचे हे शब्द ऐकून मन खूप भरून आलं. त्यांच्या बोलण्यातली आपुलकी आणि प्रेम स्पष्ट जाणवत होतं.
चक्रीघाटवरून हा बेडा स्थलांतर झाल्यापासून आम्ही इथे भेट दिली नव्हती. इथे फक्त एकच मुलगा असल्यामुळे आणि काही इतर कारणांमुळे इथे येणं शक्य झालं नव्हतं. तरीही रणूभैया नेहमी आग्रहाने म्हणायचे,
“दीदी, आप एक बार बेडे पे जरूर आना.”
त्यांचा तो आग्रह आणि माझीही मनातली इच्छा.आज अखेर पूर्ण झाली.
आज मी या बेड्यावर गेले, आणि तिथे पोहोचताच एक वेगळीच शांतता आणि आपलेपणाची भावना जाणवली. दीदीसोबत भरपूर गप्पा झाल्या. त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल, मुलांबद्दल आणि इथल्या परिस्थितीबद्दल.
बेड्यावरील भैय्यांसोबतही अनेक विषयांवर मनमोकळं बोलणं झालं. त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या संघर्षांबद्दल आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल ऐकताना खूप काही समजत गेलं.
गप्पांच्या ओघात मी त्यांना सांगितलं की आता माझी fellowship संपली आहे. हे ऐकून त्यांनी खूप प्रेमाने आणि आपुलकीने उत्तर दिलं,
“ये आपका ही घर है दीदी… आप कभी भी यहाँ आने के लिए ज्यादा सोचना मत.”
त्यांचे हे शब्द मनाला खूप भिडले. त्या एका वाक्यात इतकं प्रेम, इतकी आपुलकी आणि इतका विश्वास होता की काही क्षण मी शब्दच हरवले.
आजचा हा अनुभव फक्त एक भेट नव्हती, तर एक नातं पुन्हा जाणवण्याचा क्षण होता.
या भेटीतून मला जाणवलं की आपण जिथे प्रेमाने, मनापासून काम करतो, तिथे आपलं एक घर तयार होतं. आणि ती माणसं आपली होऊन जातात.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि कायम आठवणीत राहणारा आहे..[/read_more