– प्राची बोरेकर

आज आम्ही मायग्रेशन बेड्यांवर मुलांना भेटायला गेलो होतो. खूप दिवसांनी त्यांना भेटायची आणि पाहायची संधी मिळाली, त्यामुळे मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद होता.
रस्ता नीट माहीत नव्हता, तरीही कोणाला विचारत, शोधत आम्ही शेवटी आमच्या मुलांपर्यंत पोहोचलो. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो प्रवासही खूप खास वाटत होता, कारण प्रत्येक पावलागणिक त्यांना भेटायची ओढ वाढत होती.
आम्हाला पाहून सुरुवातीला मुलं थोडी लाजत होती, थोडी दूरच उभी राहून आमच्याकडे बघत होती. जणू त्यांना अजून खात्रीच वाटत नव्हती की आपण खरोखर त्यांना भेटायला आलो आहोत. शीतल तर आधी आमच्या जवळ आलीच नाही. ती अजून खूप लहान आहे. फक्त तीन वर्षांची. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसत होता. पण आम्ही तिच्याशी हळूहळू बोललो, हसलो, तिला आपल्यात घेतलं… आणि मग काही वेळातच तीही हसत हसत आमच्याकडे आली.
मग तर सगळंच वातावरण बदलून गेलं. सगळ्या मुलांनी मिळून खूप खेळलो, गप्पा मारल्या, हसलो आणि मनमुराद मजा केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खूप काही सांगून जात होतं. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये एक वेगळंच आपलेपण जाणवत होतं. जणू काही आपण त्यांच्यापासून कधी दूरच नव्हतो.
आम्ही त्यांना भेटून जितके आनंदी झालो, तितकेच तेही आम्हाला पाहून खुश झाले होते. त्यांच्या त्या निरागस आनंदाने आमचं मन पूर्णपणे भरून आलं. त्या क्षणांमध्ये वेळ कसा गेला हेच कळलं नाही. पण परत येण्याची वेळ आली तेव्हा मात्र मन तयारच होत नव्हतं. असं वाटत होतं की अजून थोडा वेळ तिथेच थांबावं, अजून थोडं खेळावं, अजून थोडं बोलावं… कारण तो वेळ खूप मौल्यवान वाटत होता.
आजच्या त्या भेटीतून एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली कधी कधी कोणाला मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडं प्रेम दिलं तरी त्यातून खूप मोठा आनंद निर्माण होतो.